अंबाजोगाई : जवळगावच्या प्रकरणाचा उलगडा : प्रेमप्रकरणातून घडवला गेला जिलेटीनचा स्फोट; आरोपीस अटक

अंबाजोगाई, Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील जवळगाव येथील जिलेटीनने टपरी उडवून देण्याची घटना प्रेम प्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे. बर्दापूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा उलगडा केला असून आरोपीस अटक करण्यात आले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जवळगाव येथे पानटपरी चालक अशोक भालेराव याच्या टपरीमागे स्फोटक लावून त्याचे वायर धनंजय शिंदे यांच्या शेतात नेण्यात आले होते. त्याला करंट देवून 8 एप्रिल रोजी टपरीत स्फोट घडवून आणला गेला. यात अशोक भालेराव हा जखमी होण्याबरोबरच टपरीचे नुकसान झाले. या प्रकरणात बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व गुन्हा अज्ञात आरोपीने स्फोटकाचा वापर करुन गुन्हा केलेला असल्याने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई अनिल चोरमले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, प्रभारी अधिकारी ठाकुर यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. तसेच घटनास्थळी बॉम्ब शोधक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली तेव्हा सदर प्रकरणात जिलेटीनच्या कांड्यांचा वापर करुन वायरद्वारे करंट देवून स्फोट करुन सदरची पानटपरी उडविण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस पथकाने परिसरातील स्फोटक विक्री व जिलेटीन स्फोटकाचे सहाय्याने विहिर खोदकाम करणारे इसमांची माहिती घेण्यात सुरुवात केली.
आरोपीचा शोध घेत असतांना तपास पथकांना माहिती भेटली की, गावातील एका महिले सोबत अशोक भालेराव याचे प्रेम संबंध होते, सदर महिलेचे दोन वर्षापुर्वी गावातील शेख चाँद शेख बक्शु याचे सोबत प्रेमसंबंध होते. त्याअनुषंगाने पथकाने शेख चाँद शेख बक्शु याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदरचा प्रकार केला नसल्याचे प्रथम सांगितले. त्यानंतर स्थागुशा पथकाने यामध्ये तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा शेख चाँद शेख बक्शु यानेच केला असल्याची खात्री पटली तेव्हा इसम नामे शेख चाँद याचेकडु अधिक विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. सदरचा गुन्हा करण्यासाठी आरोपीने शेख मोहसिन शेख अहेमद (रा.बर्दापुर) याचेकडुन दिड महिन्यापुर्वी तीन जिलीटीनच्या कांडया घेतल्या होत्या व दोन महिन्यापुर्वी एक जिलेटीन कांडी शेख अनिस शेख सिंकदर (रा.भारज) याचे मार्फतीने सचिन दगडु शिंदे (रा.भारज) याचेकडुन घेतली असल्याचे सांगितले. त्यानुसार तपास पथकाने शेख मोहसिन, शेख अनिस व सचिन शिंदे यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांनी शेख चाँद यास जिलेटीनच्या कांडया दिल्याचे कबुली दिली. सदर गुन्हयात मुख्य आरोपी नामे शेख चाँद याचेसह इतर तीन आरोपींना अटक करण्यात आलेली असून पुढील तपास पो.स्टे.बर्दापुर करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अपर पोलिस अधिक्षक चेतना तिडके, उपविपोअ अनिल चोरमले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे, सपोनि महेंद्रसिंग ठाकुर, सपोनि ज्ञानेश्वर कांबळे, पोउपनि संजय तुपे, पोउपनि सुशांत सुतळे, पोउपनि सिध्देश्वर मुरकुटे, पोउपनि प्रमोद यादव, बीडीडीएस पथकाचे पोउपनि दाभाडे, ग्रेपोउपनि शिवाजी राठोड, तसेच पो.ठा.बर्दापुर व स्था.गु.शा. पथकातील अंमलदार यांनी केली आहे.
Latest Marathi News अंबाजोगाई : जवळगावच्या प्रकरणाचा उलगडा : प्रेमप्रकरणातून घडवला गेला जिलेटीनचा स्फोट; आरोपीस अटक Brought to You By : Bharat Live News Media.
