पिंपरी : मानलेल्या बहिणीवर अत्याचार, संतप्त भावाने नराधमाला संपवले; हिंजवडी येथील घटना

पिंपरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : बहीणीवर सहकाऱ्याने लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याच्या रागातून मानलेल्या भावाने वीट डोक्यात घालून तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ५) भूमकर वस्ती, वाकड येथील भामा पर्ल सोसायटीत घडली. या घटनेचा हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत
निकेतकुणाल विजयकुमार सिंह (२८, रा. भुजबळवस्ती, वाकड), असे खून झालेल्याचे नाव आहे. लोकेंद्र किशोरसिंह (२८, रा. दत्त मंदिर रोड, वाकड, मूळ रा. राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अंकुशराव झोल यांनी बुधवारी (दि. १०) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची मानलेली बहीण आणि मृत निकेतकुणाल सिंह हे एकाच कंपनीत नोकरीला होते. दरम्यान, ३ एप्रिल रोजी रात्री कंपनीतील सहकारी पार्टीसाठी एकत्र जमले होते. पार्टीनंतर पीडित तरुणी सहकारी निकेतकुणाल याच्या फ्लॅटवर थांबली. दरम्यान निकेतकुणाल याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण घटनेची माहिती पीडित तरुणीने तिचा मानलेला भाऊ लोकेंद्र किशोरसिंह याला दिली.
यानंतर संतापलेल्या अवस्थेत लोकेंद्र हा निकेतकुणाल याच्या फ्लॅटवर गेला. तेथे दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी लोकेंद्रने सोबत आणलेली वीट निकेतकुणालच्या डोक्यात मारली. यामध्ये निकेतकुणाल जखमी झाला. त्यानंतर त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. दरम्यान, रात्री झोपेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हिंजवडी पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
जीव संपवण्याचा करण्याचा प्रयत्न
या घटनेनंतर आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होईल व आपली बदनामी होईल, अशी भिती निकेतकुणालच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे रुग्णालयातून घरी आल्यानंतर निकेतकुणाल याने गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्नही केला. त्याच्या गळ्याभोवती व्रण आढळूल्याचे पोलिसांच्या तपसातून पुढे आले आहे. त्यामुळे, पोलिसांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याची नोंद केली आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात निकेतकुणाल याच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे कारण समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी सखोल चौकशी केली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला.
Latest Marathi News पिंपरी : मानलेल्या बहिणीवर अत्याचार, संतप्त भावाने नराधमाला संपवले; हिंजवडी येथील घटना Brought to You By : Bharat Live News Media.
