प्रचाराच्या रंजक गोष्टी ! गावोगावी भिंती रंगवून केला जात असे उमेदवारांचा प्रचार!
राजेंद्र कवडे-देशमुख
बावडा : पूर्वी आतासारखी प्रसिद्धीची विविध माध्यमे नसल्याने गावोगावी चुन्याने रंगवलेल्या भिंती याच निवडणूक प्रचाराचे प्रमुख साधन होत्या. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाली की कार्यकर्त्यांचे पहिले काम असे, ते म्हणजे गावोगावच्या भिंती आपल्या पक्षाच्या नावे चुना लावून आरक्षित करणे. परिणामी, त्या वेळी एखाद्या गावामध्ये कोणाच्या प्रचाराच्या भिंती जास्त आहेत, त्यावरून त्या गावात कोणत्या उमेदवाराचा जोर अधिक आहे, असा अंदाज घेतला जात असे.
सन 1952 ते साधारणतः सन 1995 पर्यंत गावोगावी चुन्याने प्रचाराच्या भिंती रंगवून उमेदवाराचा प्रचार केला जात असे. निवडणुकीमध्ये उमेदवारी जाहीर झाली की, रातोरात उमेदवारांकडून गावोगावच्या भिंती चुना लावून किंवा रंगाची उभी-आडवी रेष ओढून पक्षाचे कोपर्यात नाव टाकून भिंती आरक्षित केल्या जात. नंतर या आरक्षित भिंतीवर पेंटरकडून पक्षाचे नाव, मतदारसंघाचे नाव, उमेदवाराचे नाव, निवडणूक चिन्ह, निवडणूक दिनांक व वेळ लिहिली जाई. त्यामुळे निवडणूक काळात पेंटरला व त्यांचे हाताखाली काम करणार्या बिगारी कामगारांना महत्त्व प्राप्त होई. त्यावेळी पांढरा चुना लावलेल्या भिंतीवर बहुतेकदा लाल रंगाने अक्षरे लिहून व चिन्हाचे चित्र काढून रंगवल्या जात. त्यामुळे भिंती आकर्षक दिसून मतदारांचे लक्ष वेधून घेत. नागरिक या रंगवलेल्या भिंती थांबून वाचत व त्यांना निवडणुकीत कोण उभे आहे याची माहिती होई.
पूर्वीच्या काळी पाचटाच्या कुडाची अथवा मातीच्या भिंतींची घरे जास्त होती. सिमेंटने बांधकाम केलेल्या दगडाच्या भिंती तुरळक होत्या. त्यामुळे या दगडाच्या भिंती शोधून, त्या रंगवून निवडणुकीचा प्रचार केला जाई. टीव्ही, फोन, फ्लेक्स, सोशल मीडिया आदी प्रचार साधनांचा शोध त्याकाळी लागलेला नव्हता. त्यामुळे मतदारांना मोठ्या गावात येणार्या वृत्तपत्रांवर आणि रेडिओवरील बातम्यांवर निवडणुकीच्या माहितीसाठी अवलंबून राहावे लागे. आचारसंहितेचा त्यावेळी जास्त दबदबा नसल्यामुळे एका निवडणुकीत रंगवलेल्या भिंती या पुढील निवडणूक येईपर्यंत तशाच राहात. नंतर पुढच्या निवडणुकीत त्यावर चुना लावून नवीन उमेदवारांचा प्रचार केला जाई. जनतेलाही रंगवलेल्या भिंतीवरूनच उमेदवाराचे नाव, चिन्ह, मतदान कधी आहे हे समजले जाई.
अशाप्रकारे पूर्वीच्या काळी निवडणूक प्रचारामध्ये भिंती याच निवडणूक प्रचारात मुख्य भूमिका बजावत असत. प्रचाराचे मुख्य साधनच भिंती असल्याने बरेच वेळा भिंती आरक्षित करण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद होत असत. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्याच्या घराजवळ मुद्दाम भिंती रंगवल्या जात, त्यामुळे अनेकदा वाद होत. नंतर कालांतराने कापडी फलक आले, फ्लेक्स बोर्ड आले, वृत्तपत्रे गावोगावी पोहोचू लागली. घरोघरी टीव्ही आले, दूरध्वनीचे जाळे निर्माण होऊ लागले. त्याच सुमारास निवडणूक आयुक्त टी. एन. शेषण यांनी आचारसंहितेची कडक अंमलबजावणी देशात सुरू केली. परिणामी, बदलत्या काळाच्या ओघात भिंती रंगवून निवडणूक प्रचार हा पडद्याआड गेला.
घराघरांवरील पक्षांचे झेंडे झाले बंद!
पूर्वी निवडणूक काळात पक्षाचे झेंडे लावण्याचे बंधन नसल्याने बहुतेक गावांमध्ये निम्म्या घरांवर विविध पक्षाचे झेंडे प्रचाराचा भाग म्हणून इर्षेने लावले जात. झेंडे लावण्यावरून वाद होत. मात्र देशाचे तत्कालीन निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी देशात निवडणूक आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू केली. घरावर पक्षाचा झेंडा लावण्यासाठी परवानगी लागे व त्या झेंड्याचा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात धरला जाई. त्यामुळे घराघरावर निवडणूक प्रचार काळात लावले जाणारे झेंडे आपोआप बंद झाले आहेत.
हेही वाचा
Gold : सोने दरवाढीचा पाडव्याच्या खरेदीला ब्रेक; राज्यभरात केवळ 150 टन सोन्याची विक्री
Loksabha election 2024 | जनाई-शिरसाईचे पाणी पुन्हा पेटणार..
मेंदूचा आकार वाढतोय; पण ‘आयक्यू’ होतोय कमी!
Latest Marathi News प्रचाराच्या रंजक गोष्टी ! गावोगावी भिंती रंगवून केला जात असे उमेदवारांचा प्रचार! Brought to You By : Bharat Live News Media.