जलसंकट : बोपगाव परिसरात दुष्काळाची छाया गडद
दिवे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र कानिफनाथ मंदिराच्या कुशीत वसलेल्या बोपगावला सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ऊस तर या भागातून हद्दपार झाला आहे. मात्र नागरिकांनाच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे. जनावरांच्या चार्याचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बोपगावचा परिसर नेहमी हिरवाईने नटलेला असतो. येथील शेतकरी उसाचे पीक हमखास घेतात.
8 महिने आपल्या शेतात कष्ट करायचे आणि 4 महिने शहरात आपल्याच शेतात पिकविलेल्या उसाचा सुमधुर रस विकून शहरवासीयांना तृप्त करायचे आणि मिळालेल्या पैशातून जून महिन्यात पुन्हा गावी येऊन काळ्या आईची सेवा करायची, हा इथल्या गावकर्यांचा पूर्वापार शिरस्ता आहे. मात्र यंदा या परिसराचे दुष्काळामुळे अक्षरशः रूप पालटले आहे. बोपगाव परिसरातून चरणावती नदी वाहते, या नदीवरून कानिफनाथ मंदिराच्या पायथ्याशी पाझर तलावापर्यंत उपसा सिंचन योजना राबविण्यात आली आहे. मात्र, नदीलाच पाणी कमी असल्याने जेमतेम आठच दिवस पाणी उचलता आले. दुष्काळामुळे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे शेतकरी दयानंद फडतरे, राजेश फडतरे, नंदू फडतरे यांनी सांगितले.
हेही वाचा
थेंबभर पाण्यासाठी आदिवासींची वणवण : ‘जलजीवन’चे अधिकारी, ठेकेदार मालामाल
अंतराळातून पृथ्वीवर कृष्णविवरासारखी दिसली सूर्यग्रहणाची काळी छाया
‘जेम्स वेब’ने लावला अनेक ‘उडाणटप्पू’ ग्रहांचा शोध
Latest Marathi News जलसंकट : बोपगाव परिसरात दुष्काळाची छाया गडद Brought to You By : Bharat Live News Media.