सायमन हॅरिस बनले आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान, पीएम मोदींनी केले अभिनंदन
Bharat Live News Media ऑनलाईन : ३७ वर्षीय सायमन हॅरिस हे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. भारतीय वंशाचे लिओ वराडकर यांनी वैयक्तिक आणि राजकीय कारणांमुळे गेल्या महिन्यात अचानक पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. आता वराडकर यांची जागा सायमन हॅरिस यांनी घेतली आहे. दरम्यान, आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान झाल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायमन हॅरिस यांचे अभिनंदन केले. तसेच भारत-आयर्लंड द्विपक्षीय भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत, असे पीएम मोदी यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.
आयर्लंडच्या संसदेत हॅरिस यांच्या बाजूने ८८ विरुद्ध ६९ असे मतदान झाले. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष मायकल डी हिगिन्स यांनी हॅरिस यांच्या नावाची पंतप्रधानपदी अधिकृत घोषणा केली. वराडकर यांच्या राजीनाम्यानंतर तीन पक्षाचा युतीमध्ये सहभागी असलेल्या फाईन गेल पक्षाने हॅरिस यांची पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर ते पंतप्रधानपदी विराजमान झाले.
“आज तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा सन्मान राखण्यासाठी मी जे काही करू शकतो ते मी करण्यास वचनबद्ध आहे. हे युतीचे सरकार आहे आणि एकता, सहकार्य आणि परस्पर आदराच्या भावनेने नेतृत्व करण्याचा माझा मानस आहे. आम्ही नवीन कल्पना आणि नवीन ऊर्जा आणू. मला आशा आहे की, सार्वजनिक जीवनात एक नवीन सहानुभूती आहे. वेळ नक्कीच कमी आहे आणि बरेच काही करायचे आहे.” असे हॅरिस यांनी म्हटले आहे.
भारतीय वंशाचे लिओ वराडकर यांनी मार्चमध्ये पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. लिओ वराडकर यांनी “वैयक्तिक आणि राजकीय, पण मुख्यतः राजकीय कारणांमुळे” आश्चर्यचकितपणे राजीनामा दिल्याचे म्हटले होते. फाईन गेल पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर वराडकर २०१७ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. ते देशातील सर्वात तरुण पंतप्रधान आणि आयर्लंडचे पहिले समलिंगी पंतप्रधान बनले होते.
लिओ वराडकर हे मूळचे महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमधील मालवण येथील वराड गावचे आहेत. जून २०१७ मध्ये ते पहिल्यांदा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. आपल्या राजीनाम्याचा निर्णय हा “अनेकांसाठी आश्चर्यचकित आणि काहींना नाराज” करणारा असेल असे मानून वराडकर म्हणाले होते की, देशाचे हित लक्षात घेऊन मी हा निर्णय घेतला आहे.
Congratulations @SimonHarrisTD on becoming youngest ever Prime Minister of Ireland. Highly value our historical ties that are based on shared belief in democratic values. Looking forward to work together to further strengthen India- Ireland bilateral partnership.
— Narendra Modi (@narendramodi) April 10, 2024
Latest Marathi News सायमन हॅरिस बनले आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान, पीएम मोदींनी केले अभिनंदन Brought to You By : Bharat Live News Media.