रत्नागिरी : यंदाच्या हंगामात 28 टन ‘हापूस’ची अमेरिकेला निर्यात
रत्नागिरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : यंदाच्या आंबा हंगामातील निर्यातीचा पहिला टप्पा पार पडला असून, लासलगाव येथील विकिरण प्रक्रिया केंद्रातून पहिल्याच खेपेत 7 हजार 500 पेट्यांमधून 28 टन हापूस आंब्यांची अमेरिकेत निर्यात झाली आहे. यामध्ये 30 टक्के हापूस कोकणातील असल्याची माहिती येथील पणन विभागाच्या सुत्रांनी दिली. गेल्याच आठवड्यात हापसूची वारी अमेरिकेला रवाना झाली असून गतवर्षापेक्षा ही निर्यात तुलनेने कमी असल्याचे सांगितले जात आहे.
लासलगाव येथील कांद्यावर विकिरण प्रक्रिया करण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या माध्यमातून ‘कृषक’ केंद्राची स्थापना करण्यात आली. मात्र, गेल्या 16 वर्षांपासून या केंद्रावर आंब्यावर विकीरण प्रक्रिया करून निर्यात केली जात आहे. विशिष्ट गोडी, चव, आकार व आकर्षकपणा यामुळे भारतीय विविध वाणांच्या आंब्यांना परदेशात असलेली मागणी लक्षात घेऊन अमेरिकेच्या निर्यात मानकांप्रमाणे आंब्यावर विकीरण प्रक्रिया होते. कृषक केंद्राची क्षमता अधिक असल्याने मुख्यत्वे लासलगाव केंद्र विकीरण प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. या केंद्रात गॅमा किरणांचा 400 ते 700 ग्रे मात्रा विकीरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढविण्यासह आंबा पिकण्याची प्रक्रिया लांबविली जाते. शिवाय कोयीमधील कीड नष्ट होण्यास मदत होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रियाही थांबते. कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.
या केंद्रातून गेल्या वर्षी अमेरिकेत 1 हजार टन आंब्याची निर्यात झाली होती. गेल्या 16 वर्षांतील ती सर्वाधिक निर्यात होती. केंद्रातून हापूस, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस या जातीच्या आंब्यावर विकीरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते.
अमेरिकेत ‘या’ आंबा जातींना मागणी
अमेरिकेत जाणार्या आंब्यांमध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे. या बरोबर मलेशिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजिल्स, शिकागो, न्यूजर्सी, ह्युस्टन येथेही दर्जेदार हापूसला मागणी आहे.
Latest Marathi News रत्नागिरी : यंदाच्या हंगामात 28 टन ‘हापूस’ची अमेरिकेला निर्यात Brought to You By : Bharat Live News Media.