क्राईम डायरी : ‘डॅडी’ बाहेर येतोय!
संजय कदम, मुंबई
लोकसभा आणि त्यानंतर तोंडावर असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावरच मुंबई अंडरवर्ल्डचा डॉन, भाई आणि डॅडी अरुण गवळी कारागृहातून मुक्त होण्याची शक्यता दिसत आहे. तसे झाल्यास गवळीच्या सुटकेचे लोकसभा आणि महापालिका निवडणुकांवर काय परिणाम होणार, याचे आडाखे बांधले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर गवळीच्या कारकिर्दीवर एक प्रकाशझोत…
मुंबई ही कष्टकर्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी. पण, काळ लोटत गेला आणि या शहराची स्वप्ननगरी झाली. हे होत असतानाच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला ज्यांच्या अस्तित्वामुळे परिस्थितीच बदलली आणि रक्तपातही झाला. गँगवॉर, बॉम्ब हल्ले, दंगल आणि शहरावर राज्य करणारे डॉन हे सर्व या शहराने पाहिलेय. अशा या शहराच्या गँगवॉरच्या इतिहासातील एक नाव म्हणजे अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडी’..!
मुंबईत 1990 च्या सुमारास टोळीयुद्ध जोरात सुरू होते, तेव्हा सर्व गुंडांमध्ये अरुण गवळी एकमेव होता, ज्याने मुंबई सोडली नाही. मुंबईतील एका सामान्य चाळीत राहणारा मुलगा शहरावर राज्य करू लागतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो ‘डॅडी’ या नावाने प्रसिद्ध होतो. त्याच्या जीवनावर मराठी आणि हिंदीत चित्रपटही तयार होतो. गवळी जवळपास तीन दशके अंडरवर्ल्डच्या जगात राहिला. त्याच्यावर खून, खंडणी, अपहरण असे डझनभर गुन्हे दाखल आहेत.
नागपूर खंडपीठाने अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले आणि हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. 2006 च्या शासन निर्णयाद्वारे अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. अरुण गवळीच्या या याचिकेवर नागपूर खंडपीठावर सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असले, तरी तुरुंग प्रशासनाला या संदर्भात उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधीही दिला आहे. तुरुंग प्रशासनाचे उत्तर यायचे ते येईलच. पण, गवळी बाहेर येणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
जामसंडेकर हत्या प्रकरण
मुंबईचे नगरसेवक कमलाकार जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. 2 मार्च 2007 या दिवशी सायंकाळी पावणेपाचला मुंबईत घाटकोपरमध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर आपल्या घरात टीव्ही पाहत होते. असल्फा व्हिलेजच्या रुमानी मंजिल चाळीत ते राहत होते. जामसंडेकर यांनी त्यावेळी अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणेंचा 367 मतांनी पराभव केला होता.
जामसंडेकर यांची भाची मनाली हिरे स्वयंपाक घरात काम करत होती. इतक्यात घराबाहेर दोन मोटारसायकल येऊन थांबल्या. त्यावरून चार लोक उतरले. त्यातला एकजण जामसंडेकर यांच्या घरात शिरला. त्याने जामसंडेकर यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार केला. हा गोळीबार अत्यंत जवळून म्हणजेच पॉईंट ब्लँक रेंजवरून करण्यात आला. गोळीबार झालेला पाहून मनाली धावत बाहेर आली, तेव्हा जामसंडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तिने मदतीसाठी धावा केला. जामसंडेकर यांच्यावर गोळीबार झाल्याचे कळताच गर्दी जमा झाली. त्या गर्दीचा फायदा घेऊन हल्लेखोर पळाले. याच प्रकरणात गवळीला जन्मठेप झाली.
काय आहे 2006 सालचा शासन निर्णय ?
10 जानेवारी 2006 रोजीच्या शासन निर्णयानुसार, वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या, शारीरिकद़ृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याची तरतूद आहे. याच ग्राऊंडवर अरुण गवळीला दिलासा मिळाला आहे. या शासन निर्णयाच्या आधारेच डॉन अरुण गवळीने शिक्षेतून मुदतीपूर्व सुटकेची मागणी केली होती आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे.
कमाईचा शॉटकट
अरुण गवळी यांचा जन्म 17 जुलै 1955 रोजी अहमदनगर जिल्ह्यात झाला. त्यांचे बालपणीचे नाव अरुण गुलाबराव अहिर होते. गवळी डॉन बनण्याची कहाणी 1980 च्या दशकात सुरू होते, जेव्हा मुंबईची कापड गिरणी बंद पडली होती. लाखो मजूर बेरोजगार झाले, उपासमार वाढली. त्यानंतर चाळीत राहणारे मजूर अंडरवर्ल्डच्या आहारी जाऊ लागले. त्यातलाच एक अरुण गवळी. पैसे कमावण्यासाठी गवळीने शॉर्टकटचा अवलंब केला आणि आठवड्याची वसुली सुरू केली. वसुली करत असताना गवळी आणि रमा नाईक यांनी बाबू रेशीमसह बीआर टोळी तयार केली. रमा नाईक आणि गवळी दोघेही चांगले मित्र होते. रमा नाईकला अंडरवर्ल्डच्या व्यवसायाची चांगली माहिती होती, त्यामुळे गवळी त्याचे म्हणणे ऐकून घेत असे.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटापूर्वी दाऊद भारत सोडून दुबईला गेला होता. दाऊद दुबईला गेल्यानंतर त्याची टोळीही फुटू लागली. बॉम्बस्फोटांमुळेच दाऊद आणि त्याचा उजवा हात छोटा राजन वेगळे झाले. छोटा राजनही मुंबईहून मलेशियाला गेला. अशाप्रकारे या सर्वांना सोडून गेल्याचा फायदा गवळीला मिळाला. बहुतेक अंडरवर्ल्ड डॉन मुंबईतून पळून गेले होते. यानंतर गवळी आणि अमर नाईकमध्ये टोळीयुद्ध सुरू झाले. गवळीचा शार्पशूटर रवींद्र सावंत याने एप्रिल 1994 मध्ये अमर नाईकचा भाऊ अश्विन नाईक यांच्यावर हल्ला केला, नंतर तो फरार झाला. त्यानंतर ऑगस्ट 1996 मध्ये मुंबई पोलिसांनी गवळीचा शत्रू अमर नाईक याला चकमकीत ठार केले आणि त्यानंतर अश्विन नाईकलाही अटक करण्यात आली. तेव्हापासून मुंबईवर गवळीची राजवट सुरू झाली.
गवळीच्या सुटकेचा राजकीय लाभ कुणाला ?
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जन्मठेपेची शिक्षा भोगणार्या अरुण गवळीची मुक्तता करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. त्यासाठी न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला आपली भूमिका मांडायला सांगितले आहे. गवळी याच्या सुटकेचा आताच योग कसा काय जुळून आला, गवळी सुटला तर तो पुन्हा राजकारणात सक्रिय होणार का? झालाच तर त्याचा फायदा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कोणाला होईल, यावरून आता तर्कवितर्क मांडले जात आहेत.
राजकारणाचा आश्रय
अंडरवर्ल्डवर वर्चस्व गाजवणार्या गवळीला माहीत होते, की एक दिवस पोलिस त्याच्यावर नक्कीच कारवाई करतील. अशा परिस्थितीत त्याला राजकारणाचा आश्रय घेणे सर्वात सोपे वाटले. यामुळे त्याने 2004 साली ‘अखिल भारतीय सेना’ या नावाने पक्ष स्थापन केला. 2004 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत गवळी याने आपले अनेक उमेदवार उभे केले आणि स्वतः चिंचपोकळी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. एक वेळ अशी होती जेव्हा शिवसेनेने गवळी यांना पाठिंबा दिला होता. मात्र, काही कारणास्तव शिवसेना आणि गवळी यांच्यात दुरावा निर्माण झाला. पुढे 2008 मध्ये गवळीच्या इशार्यावरून शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची हत्या झाली. या हत्येसाठी गवळीने 30 लाखांची सुपारी घेतल्याचे सांगितले जाते. या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
Latest Marathi News क्राईम डायरी : ‘डॅडी’ बाहेर येतोय! Brought to You By : Bharat Live News Media.