अन्ननासाडीचे विदारक वास्तव

अन्न हे पूर्णब्रह्म आहे, हा संस्कार भारतीय संस्कृती हजारो वर्षांपासून प्रत्येक पिढीच्या मनावर रुजवत आली आहे; परंतु बदलत्या काळात ‘यूज अँड थ्रो’ या पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत गेला आणि त्यातूनच अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. हॉटेल असो, लग्नसोहळे असोत किंवा कुटुंबांमधून वाया जाणारे अन्न असो, पूर्णब्रह्माबाबतची समाजाची वर्तणूक ही गंभीर चिंतनाचा विषय ठरली आहे. … The post अन्ननासाडीचे विदारक वास्तव appeared first on पुढारी.

अन्ननासाडीचे विदारक वास्तव

सूर्यकांत पाठक

अन्न हे पूर्णब्रह्म आहे, हा संस्कार भारतीय संस्कृती हजारो वर्षांपासून प्रत्येक पिढीच्या मनावर रुजवत आली आहे; परंतु बदलत्या काळात ‘यूज अँड थ्रो’ या पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत गेला आणि त्यातूनच अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. हॉटेल असो, लग्नसोहळे असोत किंवा कुटुंबांमधून वाया जाणारे अन्न असो, पूर्णब्रह्माबाबतची समाजाची वर्तणूक ही गंभीर चिंतनाचा विषय ठरली आहे.
अन्नाच्या नासाडीसंदर्भात अलीकडेच संयुक्त राष्ट्र संघटनेने अहवाल जारी केला आहे. त्यानुसार जगभरात दररोज जवळपास एक अब्ज ताटांइतके अन्न वाया जाते, असे दिसून आले आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती दरवर्षी सरासरी 79 किलो अन्न वाया घालवते, असे हा अहवाल दर्शवतो. अर्थात, ही आकडेवारी चिंताजनक आहे. तसेच जगभरातील एकूण उत्पादनाच्या 30 टक्के खाद्यान्न वाया जात असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. एकट्या अमेरिकेत वाया जाणार्‍या अन्नाचे प्रमाण हे सहारा वाळवंटाच्या दक्षिणेस असलेल्या आफ्रिकी देशांची गरज भागवू शकेल एवढे आहे. त्याचवेळी इटलीत वाया जाणारे अन्न हे इथोपियाची भूक भागवू शकेल एवढे आहेे. अन्नाची ही नासडी एकूण ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनात एक तृतीयांश योगदान देते. या अहवालात वाया जाणार्‍या अन्नामुळे उत्सर्जित होणार्‍या ग्रीन हाऊस गॅसच्या हवामान बदलावर, पर्यावरणावर आणि पोषणावर होणार्‍या परिणामांची चर्चा केली आहे, ही महत्त्वाची बाजू आहे; कारण अन्नसुरक्षेबरोबरच पर्यावरण वाचविण्याचा मुद्दाही यात मांडला आहे.
जगाची लोकसंख्या सध्या सुमारे 7.8 अब्ज आहे आणि ती 2050 पर्यंत नऊ अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जगभरातील अन्नधान्याचे उत्पादन पाहता ते 14 अब्ज लोकांसाठी पुरेसे आहे. याचाच अर्थ आपण गरजेपेक्षा दुप्पट उत्पादन घेत आहोत. समाजातील एका घटकासाठी त्याचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक आहे, तर त्याचेवळी दुसरा वर्ग अन्नधान्याच्या टंचाईचा सामना करत आहे. एकीकडे 30 टक्के मुले लठ्ठपणाचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे जगभरातील 12 टक्के लोकसंख्येकडे पुरेसे भोजन नाही. अर्थातच ही विसंगती असून जगभरातील धोरणकर्त्यांसाठी ती गंभीर बाब म्हणून आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार अन्नाच्या एकूण नासाडीपैकी 60 टक्के भोजन हे घरगुती पातळीवरच वाया जाते आणि 13 टक्के पुरवठा साखळीत खराब होते. सर्वात कमी रिटेल म्हणजेच दुकानात नुकसान होते. ग्रामीण भागात भोजनाची सर्वात कमी नासाडी होते, असे म्हटले आहे. यामागचे कारण म्हणजे आपल्या धर्मात मनुष्यप्राण्याबरोबरच प्राणीमात्राचाही विचार केला आहे. वास्तविक आपण जेव्हा अन्नसुरक्षेचा विचार करतो, तेव्हा त्यात मनुष्याबरोबरच प्राण्यांचाही समावेश होतो. गावात मनुष्याबरोबर गाय, श्वान, पक्षी आदींचीदेखील अन्नसुरक्षा पाहिली जाते. त्यामुळे अन्नपदार्थ शिल्लक राहिला तरी तो वाया जाऊ दिला जात नाही. गावातील कुत्रे, शेळ्या, गायी-म्हशी यांना तो दिला जातो. खराब झालेल्या अन्नाचे कंपोस्ट केले जाते. म्हणून अन्नाची नासाडी टाळण्यासाठी ग्रामीण भागाकडून शिकायला हवे. शहरांमध्ये बहुतांश फ्लॅटमध्ये-घरांमध्ये राहिलेले अन्न एक तर बेसिनमध्ये टाकून पाण्याद्वारे ड्रेनेजमध्ये ढकलले जाते किंवा डस्टबिन बॅगमध्ये भरून कचर्‍यात टाकले जाते. पशुपक्ष्यांना अन्न देण्याचा विचार शहरात फारसा दिसतही नाही आणि तशा सुविधाही फारशा नाहीत. अलीकडील काळामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा असे वर्गीकरण केले जाऊ लागल्याने वाया जाणार्‍या अन्नापासून कंपोस्ट करण्याचे प्रमाण वाढले आहे, ही त्यातल्या त्यात सुदैवाची बाब म्हणायला हवी.
कृषी संस्कृती अद्याप कायम असणार्‍या गावाखेड्यांत मनुष्य आणि प्राणी यांचे घनिष्ठ नाते असते. शहरात तसे बंध पाहायला मिळत नाहीत. शहरांमधील अन्ननासाडीमध्ये हॉटेल आणि समारंभांमध्ये होणारी नासाडी अधिक दिसून येते. आपण सहज जरी एखाद्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये नजर टाकल्यास उच्चशिक्षित, उच्चभ्रू म्हणवले जाणारे आणि आलिशान गाड्यांमधून आलेले लोक हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या डिशमध्ये सर्रास अन्नपदार्थ सोडून जाताना दिसतात. त्याचे त्यांना जराही वैषम्य वाटत नाही. बहुतांश हॉटेलचालक उरलेले अन्न पार्सल म्हणून घरी देण्यास तयार असतात; पण तथाकथित उच्चभ्रूंना त्यात कमीपणा वाटतो. हाच सुशिक्षित, सधन वर्ग आलिशान पार्ट्यांमध्ये, लग्न समारंभांमध्ये गेल्यानंतर बुफे सिस्टीममध्ये आपल्या हाताने स्वादिष्ट व्यंजने भरमसाट प्रमाणात ताटात वाढून घेतो आणि बिनधास्तपणाने त्यातील बरेचसे अन्न ताटामध्ये ठेवून ती डिश प्लेटबॉक्समध्ये टाकून निघून जातो. या वर्गाला अन्नाची किंमत काय असते हे कोण समजावणार? विशेष म्हणजे हाच वर्ग गरीब लोक अन्न वाया घालवतात, असा आरोप करताना दिसतो.
वास्तविक गरीब, ग्रामीण भागातील नागरिकांना खूप कष्टाने दोन वेळचे अन्न मिळते. त्यामुळे ते अन्न वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. या अहवालात जी-20 देश (ऑस्ट्रेलिया, जपान, ब्रिटन, अमेरिका) आणि युरोपीय संघ यांनी अन्नाची नासाडी रोखण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांचा उल्लेख आहे. यात कॅनडा व सौदीनेही चांगले यश मिळवले आहे. अन्य देशांनीही याद़ृष्टीने प्रयत्न करायला हवेत. अन्नपदार्थांची नासाडी ही दोन मार्गांनी होते. एक म्हणजे ताटात टाकून दिले जाणारे अन्नपदार्थ आणि दुसरे म्हणजे पुरवठा साखळीत होणारी नासाडी. ते रोखण्यासाठीदेखील प्रयत्न हवेत. तिसरी गोष्ट म्हणजे प्रक्रियेच्या काळात पदार्थ वाया जात असल्याने शिल्लक राहण्याचे प्रमाणही वाढते. ज्या पॅकेटमध्ये हे पदार्थ सीलबंद करून विक्रीसाठी ठेवले जातात, तोही कालांतराने वाया जातात व दुर्दैवाने याकडे लक्ष दिले जात नाही. या गोष्टी रोखण्यासाठी आतापर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत.
Latest Marathi News अन्ननासाडीचे विदारक वास्तव Brought to You By : Bharat Live News Media.