नाशिकमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे आणखी तीन बळी
नाशिक : आसिफ सय्यद
महापालिका प्रशासन करवाढीत व्यस्त असताना शहराभोवती डेंग्यूचा विळखा आणखी तीव्र बनत चालला असून, डास निर्मूलन मोहीम केवळ कागदावरच राहिल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या महिन्यात डेंग्यूमुळे नाशिकरोड विभागातील एका व्यावसायिकाचा बळी गेल्यानंतर नोव्हेंबरमध्येही आणखी तिघांचा डेंग्यूसदृश आजाराने बळी गेल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या महिन्यात १५२ नवे बाधित आढळल्याने डेंग्यू रुग्णांचा एकूण आकडा ८३२ वर पोहोचला आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी डेंग्यूचा प्रकोप मात्र मोठ्या प्रमाणावर झाला आहे. नाशिकरोड येथील आनंदनगर परिसरातील एका व्यावसायिकाचा डेंग्यूची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. मृताचा रक्तनमुने तपासणीचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेकडून अलर्ट जारी करण्यात आला होता. विशेषत: शहरात डेंग्यूच्या पहिल्या बळीची नोंद झाल्यानंतर आरोग्य उपसंचालक कपिल आहेर यांनी साथरोग मृत्यू संशोधन समितीची बैठक घेत महापालिकेची कानउघाडणी केली होती. डेंग्यूच्या नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात खासगी रुग्णालयांत होणाऱ्या डेंग्यू संशयितांची माहिती दररोज अपडेट करण्यासह शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असलेल्या परिसरात धूरफवारणी वाढवणे, गप्पी मासे सोडणे, तसेच घरांची तपासणी वाढविण्याचे निर्देश पालिकेला देण्यात आले होते. त्यानंतरही नाशकात डेंग्यू संशयित आजारामुळे आणखी तीन जणांचे बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. यात नाशिकरोड व नवीन नाशिक विभागातील अंबड परिसरातील प्रत्येक एक पुरुष, तर पंचवटीतील म्हसरूळ परिसरातील महिला रुग्णाचा समावेश आहे. डेंग्यूची लक्षणे आढळलेल्या या तीनही रुग्णांवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू होते. या मृतांचे रक्तनमुने तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातून या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहूंच्या स्मृतिस्तंभातील राजचिन्ह चोरीला
नोव्हेंबरच्या २४ दिवसांत १५२ बाधित
जुलैअखेर शहरात अवघे १४४ डेंग्यू रुग्ण होते. ऑगस्टपासून डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यूचे ११७ रुग्ण आढळले. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूची विक्रमी लागण होऊन २६१ जण पॉझिटिव्ह आढळले. ऑक्टोबरमध्ये १९३ रुग्ण आढळून आले होते. ऑक्टोबरपाठोपाठ नोव्हेंबर महिन्यातही डेंग्यू रुग्णांची संख्या वाढती राहिली आहे. गेल्या २४ दिवसांत डेंग्यूचे १५२ नवे बाधित आढळल्याने शहरातील डेंग्यूबाधितांचा एकूण आकडा ८३२ वर पोहोचला आहे.
डेंग्यू बळींच्या परिसरात सर्वेक्षण
डेंग्यूसदृश आजाराने बळी गेलेले रुग्ण राहत असलेल्या परिसरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत रुग्ण तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तिनही मृतांच्या परिसरातील ७० नागरिकांचे रक्तनमुने चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. या रक्तनमुन्यांच्या तपासणीअंती परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव आहे किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे.
प्रयोगशाळेकडे २५० अहवाल प्रलंबित
महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे दररोज १०० डेंग्यू संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जात आहेत. सद्यस्थितीत प्रयोगशाळेकडे २५० अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत ८३२ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रलंबित तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर डेंग्यू रुग्णसंख्येचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.
१०१२ नागरिकांना नोटिसा
शहरातील डेंग्यूबाधितांचा आकडा कमी होत नसल्यामुळे डास निर्मूलनासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू केल्याचा दावा मलेरिया विभागाने केला आहे. मलेरिया विभागाच्या पथकांनी महिनाभरात शहरातील १ लाख ४,७१९ घरांना भेटी दिल्या असून, १ लाख ३० हजार ५२ पाणीसाठ्याची तपासणी करण्यात आली आहे. यात ८२७ पाणीसाठ्यांत डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले आहे. डेंग्यू आजारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्तीची ठिकाणे आढळलेल्या १०१२ मिळकतधारक, संस्था, खासगी तसेच शासकीय कार्यालयांना महापालिकेच्या मलेरिया विभागामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
धूरफवारणी कागदावरच
शहरात मलेरिया विभागाने चाचण्या वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचा अजब दावा विभागाकडून केला जात आहे. दुसरीकडे डास उत्पत्तीची ठिकाणे शोधून नष्ट करण्यासाठी शहरात ६२ आरोग्य पथके तैनात केली आहेत. या पथकांमार्फत शहरात तपासणी सुरू असल्याचा दावाही पालिकेकडून केला जात आहे. मात्र, तरीही रुग्णसंख्या वाढत असल्याने धूरफवारणीचे काम कागदावरच होत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा :
UP No non-veg day| उत्तर प्रदेशमध्ये आज ‘No non-veg day’; जाणून घ्या काय कारण?
नागरी सहकारी बँकांना दिलासा
पुणे दौरा : शासकीय कार्यालयीन कामांचा अजित पवार घेणार आढावा
The post नाशिकमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे आणखी तीन बळी appeared first on पुढारी.
महापालिका प्रशासन करवाढीत व्यस्त असताना शहराभोवती डेंग्यूचा विळखा आणखी तीव्र बनत चालला असून, डास निर्मूलन मोहीम केवळ कागदावरच राहिल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या महिन्यात डेंग्यूमुळे नाशिकरोड विभागातील एका व्यावसायिकाचा बळी गेल्यानंतर नोव्हेंबरमध्येही आणखी तिघांचा डेंग्यूसदृश आजाराने बळी गेल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या महिन्यात १५२ नवे बाधित आढळल्याने डेंग्यू रुग्णांचा एकूण आकडा ८३२ …
The post नाशिकमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे आणखी तीन बळी appeared first on पुढारी.