कोल्हापूर : अश्लील मेसेज, 5 लाखांची खंडणी, विनयभंगप्रकरणी तरुणाला अटक
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : पतीच्या फेसबुक खात्यावर अश्लील मेसेज व्हायरल करून 5 लाखांच्या खंडणीची मागणी करणार्या तसेच पाठलाग करून विनयभंग करणार्या संशयिताला राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले. शुभम सदाशिव खेतल (वय 27, रा. बागल चौक, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. जानेवारी 2023 ते एप्रिल 2024 या काळात ही घटना घडली.
पीडित महिलेची फिर्याद दाखल होताच पोलिसांनी संशयिताला अटक केली. पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, संशयित खेतल हा विवाहित महिलेचा सतत पाठलाग करून त्रास देत होता. तरीही महिलेने त्याच्या कृत्याकडे कानाडोळा केला. संशयिताने महिलेच्या पतीच्या फेसबुक खात्यावर अश्लील मेसेज व्हायरल करून तिची बदनामी सुरू केली.
या प्रकारानंतर संशयिताने पतीकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. पीडिता घरकामानिमित्ताने बाहेर पडली की खेतल तिच्या दुचाकीचा पाठलाग करीत असे. वाटेत थांबवून तिचा अनेकदा त्याने विनयभंगही केला. सोशल मीडियावर बदनामी करून तुझ्या आयुष्याची वाट लावतो, अशीही वारंवार धमकी दिल्याने कंटाळलेल्या महिलेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दाखल केली. संशयिताची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे राजारामपुरी पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.
Latest Marathi News कोल्हापूर : अश्लील मेसेज, 5 लाखांची खंडणी, विनयभंगप्रकरणी तरुणाला अटक Brought to You By : Bharat Live News Media.