तेलंगणात कुणाचे पारडे जड?
के. श्रीनिवासन, राजकीय अभ्यासक
देशभरामध्ये सध्या तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि छत्तीसगड या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची चर्चा होत आहे. यापैकी तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागांसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होत आहे. 2 जून 2014 रोजी आंभ्र प्रदेशपासून वेगळे करून तेलंगणाची स्थापना झाली. पहिल्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने 63 जागा जिंकल्या होत्या आणि के. चंद्रशेखर राव हे पहिले मुख्यमंत्री झाले. आता तेलंगणा तिसर्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे. यावेळी भारत राष्ट्र समिती (पूर्वीची तेलंगणा राष्ट्र समिती) आणि काँग्रेस यांच्यात लढत आहे. यावेळी भाजप, एआयएमआयएम, जनसेना हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
तेलंगणा राज्याच्या स्थापनेनंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि राज्यात पहिले सरकार स्थापन केले. त्यावेळी काँग्रेस दुसर्या क्रमांकावर होती. टीआरएसने त्यावेळी 63 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) 15 जागा जिंकल्या होत्या. 2018 मध्ये झालेल्या दुसर्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने पुन्हा चांगली कामगिरी करत सलग दुसरा विजय नोंदवला.
या निवडणुकीत टीआरएसला 88 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेस 21 जागांसह दुसर्या क्रमांकावर राहिला. या निवडणुकीत भाजपच्या जागा पाचवरून एकवर घसरल्या. यंदाच्या निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच राव यांनी पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस असे केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये बीआरएस आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत असली, तरी यावेळी काही जागांवर भाजप आणि बसपा रावांसह काँग्रेसलाही धक्का देऊ शकतात. दुसरीकडे हैदराबादचा भाग हा ओवैसींच्या पक्षाचा बालेकिल्ला आहे. आजघडीला प्रत्येकजण आपापल्या विजयाचा दावा करत असले, तरी तेलंगणातील मतदारांच्या मनात नेमके काय आहे, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांच्यासाठी ही निवडणूक हॅट्ट्रिकची संधी आहे. त्यामुळे त्यांनी सर्वशक्तीनिशी या रणसंग्रामात उडी घेतली आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसपा) काही जागांवर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि बीआरएस काहीसे चिंतेत आहेत. अल्पसंख्याक मतांच्या ताकदीची जाणीव असलेल्या काँग्रेसने या वर्गाला आकर्षित करण्यासाठी विशेष घोषणा केल्या आहेत. कर्नाटकात काँग्रेस पक्षाला 90 टक्के अल्पसंख्याक मते मिळाल्याचे सांगितले जाते. काँग्रेसने जाहीरनाम्यातून बीआरएस व्होट बँकेला खीळ घालण्याचा प्रयत्न केला आहे.
तेलंगणामध्ये केसीआर राव यांच्याविषयीची नाराजी आता दिसून येऊ लागली आहे. राव यांच्या सरकारमधील भ्रष्टाचाराची काही प्रकरणे समोर आली आहेत. तसेच बीआरएसमधील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी दावा केल्याने निकालांनंतर सत्तेचा सुकाणू नेमका कोणाच्या हाती जाणार, याबाबत संदिग्धता आहे. काँग्रेस पक्ष 15 वर्षांनंतर तेलगू राज्यात सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. काँग्रेसला या राज्यात दोन पक्षांची साथ लाभली आहे. तामिळनाडू राज्यातील सत्ताधारी डीएमके या पक्षाने तेलंगणा राज्याच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे.
एकंदरीत ही सर्व स्थिती पाहता तेलंगणातील निवडणूक यंदा कमालीची चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत बीआरएसचा विजय झाल्यास रावांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा वाढणार आहेत. याउलट त्यांना पराभूत करून काँग्रेस या राज्यात सत्तेत आल्यास दक्षिणेकडील आणखी एक महत्त्वाचे राज्य आपल्याकडे आल्यामुळे गतप्राण झालेल्या काँग्रेसजनांना एक मोठी संजीवनी मिळणार आहे. या दोघांनाही धक्का देत भाजप सत्तेत येण्याची शक्यता तूर्त दिसत नसली, तरी राजकारणात काहीही होऊ शकते, यावर विश्वास ठेवत असा निकाल लागला, तर सर्वच विरोधकांचे धाबे दणाणतील, यात शंका नाही.
The post तेलंगणात कुणाचे पारडे जड? appeared first on पुढारी.
देशभरामध्ये सध्या तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि छत्तीसगड या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची चर्चा होत आहे. यापैकी तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागांसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होत आहे. 2 जून 2014 रोजी आंभ्र प्रदेशपासून वेगळे करून तेलंगणाची स्थापना झाली. पहिल्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने 63 जागा जिंकल्या होत्या आणि के. चंद्रशेखर राव हे पहिले मुख्यमंत्री झाले. आता …
The post तेलंगणात कुणाचे पारडे जड? appeared first on पुढारी.