दिल्लीत रंगणार काँटे की टक्कर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने मद्य घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात टाकल्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील सातही लोकसभा मतदार संघात यंदा ‘काँटे की टक्कर’ बघायला मिळणार आहे. भाजपने 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत मोदी लाटेवर आरूढ होत सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता तिसर्‍यांदा क्लीन स्वीप करण्याची भाजपची वाट अवघड बनली असल्याचे दिसून आले आहे. केजरीवाल यांनी … The post दिल्लीत रंगणार काँटे की टक्कर appeared first on पुढारी.

दिल्लीत रंगणार काँटे की टक्कर

ताजेश काळे

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने मद्य घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात टाकल्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील सातही लोकसभा मतदार संघात यंदा ‘काँटे की टक्कर’ बघायला मिळणार आहे. भाजपने 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत मोदी लाटेवर आरूढ होत सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता तिसर्‍यांदा क्लीन स्वीप करण्याची भाजपची वाट अवघड बनली असल्याचे दिसून आले आहे.
केजरीवाल यांनी दिल्लीतील गरीब व अल्पसंख्याक वर्गाला वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, महिलांना बस प्रवास यासारख्या प्राथमिक सुविधा फुकट दिल्यामुळे जनतेमध्ये आम आदमी पक्षाबद्दल कमालीची आस्था आहे. आता तर केजरीवाल तुरुंगात असल्यामुळे त्यांच्याबद्दल वेगळीच सहानुभूती निर्माण झाली आहे. राजधानी दिल्लीत चांदणी चौक, नवी दिल्ली, पूर्व दिल्ली, पश्चिम दिल्ली, ईशान्य दिल्ली, वायव्य दिल्ली आणि दक्षिण दिल्ली असे एकूण 7 लोकसभा मतदारसंघ आहेत.
भाजपने 2014 मध्ये केंद्रातील डॉ. मनमोहन सिंग सरकारची अकार्यक्षमता आणि मोदी लाटेवर स्वार होऊन या सर्व जागांवर दणदणीत विजय मिळविला होता. 2019 च्या निवडणुकीतही भाजपने ‘आप’ आणि काँग्रेसच्या युतीला धूळ चारत सर्व जागा काबीज केल्या होत्या. भाजपचे सातही उमेदवार तब्बल 2 ते 5 लाख इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. दिल्लीतील मतदारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम असल्याचे तेव्हा दिसून आले होते. मागील निवडणुकीत ‘आप’ आणि काँग्रेसच्या युतीत ‘आप’ने 4 तर काँग्रेसने 3 जागा लढविल्या होत्या. चांदणी चौक मतदार संघातून भाजपचे हर्षवर्धन, नवी दिल्लीतून मीनाक्षी लेखी, पूर्व दिल्लीतून क्रिकेटर गौतम गंभीर, पश्चिम दिल्लीतून परवेश वर्मा, ईशान्य दिल्लीतून अभिनेता मनोज तिवारी, वायव्य दिल्लीतून हंसराज हंस तर दक्षिण दिल्ली मतदार संघातून रमेश विधुरी लोकसभेत पोहोचले होते.
मद्य घोटाळ्यात केजरीवाल यांना अटक झाल्याचा परिणाम दिल्लीतील लोकसभा निवडणुकीवर होऊ नये, यासाठी भाजपने आधीच डावपेच आखले आहे. गेल्या निवडणुकीत दोन लाखांहून अधिकच्या मताधिक्याने निवडून आलेल्या सहा खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहेत. ईशान्य दिल्लीतून केवळ मनोज तिवारी रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या तिकीट वाटपात दिल्ली विधानसभा आणि दिल्ली महापालिकेतील गैरकारभाराबद्दल केजरीवाल यांच्या तोंडाला फेस आणणार्‍या नव्या चेहर्‍यांना भाजपने संधी दिली आहे.
दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्ष नेते रामवीरसिंग विधुरी यांना दक्षिण दिल्लीतून मैदानात उतरविण्यात आले आहे. माजी महापौर हर्ष मल्होत्रा यांना पूर्व दिल्लीतून, योगेंद्र चंडोलिया यांना वायव्य दिल्लीतून तर पश्चिम दिल्लीतून माजी महापौर कमलजीत शेरावत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कामगार नेते प्रवीण खंडेलवाल चांदणी चौकातून तर भाजपच्या नेत्या स्व. सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी स्वराज यांना नवी दिल्ली मतदार संघातून भाजपने रिंगणात उतरवले आहे.
आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीमध्ये ‘आप’ने चार जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पश्चिम दिल्लीतून माजी खासदार महाबल मिश्रा यांना, तर नवी दिल्लीतून सोमनाथ भारती यांना तिकीट देण्यात आले आहे. दक्षिण दिल्लीतून साहीराम पहेलवान तर पूर्व दिल्लीतून कुलदीपकुमार मैदानात उतरले आहेत. काँग्रेसने सावध पवित्रा घेऊन त्यांच्या वाट्यातील तीन जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर केले नाहीत. मात्र, ईशान्य दिल्लीतून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. चांदणी चौकातून जे. पी. अग्रवाल, तर वायव्य दिल्लीतून माजी खासदार उदित राज यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. नवी दिल्लीत 25 मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल आहे. राजधानी दिल्लीतील तापमान वाढत असतानाच केजरीवाल यांच्या जेलवारीमुळे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
Latest Marathi News दिल्लीत रंगणार काँटे की टक्कर Brought to You By : Bharat Live News Media.