मंगळावरील ज्वालामुखीमुळे संशोधकांच्या आशा-अपेक्षा उंचावल्या

वॉशिंग्टन : मेरीलँड विद्यापीठातील भूवैज्ञानिक पथकातील डॉक्टरेट संशोधकांनी मंगळ ग्रहावरील नोक्टीस लेबिरिंथस क्षेत्रात नव्या ज्वालामुखीचा शोध लावल्यानंतर, यामुळे पाणी व बर्फाचे साठे शोधण्यावर आता लक्ष केंद्रित केले जाणार आहे. गत महिन्यात नव्याने शोधल्या गेलेल्या या ज्वालामुखीचा आकार माऊंट एव्हरेस्टपेक्षाही मोठा असल्याचे प्रथमदर्शनी संकेत आहेत. हा ज्वालामुखी मंगळाच्या भू-मध्य रेषेसमीप स्थित असल्याचे या पथकाने म्हटले आहे.
या परिसरात ज्वालामुखी शोधून काढणे अतिशय कठीण आहे. याचे कारण असे की, ते दिसतील अशा भौगोलिक स्थितीतच असत नाहीत, याचाही या पथकाने उल्लेख केला होता. या शोधामुळे मंगळावरील वातावरण कसे असू शकेल, याबाबत आणखी काही फेरफार अपेक्षित आहेत. या आतापर्यंत कल्पना नसलेल्या ज्वालामुखीमुळे पाणी व बर्फ शोधण्यात आणखी मदत मिळू शकेल, असाही या संशोधकांचा होरा आहे.
या ज्वालामुखीचा लाव्हा ग्लेसियरच्या जवळून वाहत असून, त्याचे पूर्णपणे ऑक्सिकरणही झालेले नाही, असे मेरीलँड विद्यापीठातील डॉ. सौरभ शुभम यांनी म्हटले आहे. अन्य क्षेत्रांप्रमाणे हा परिसरदेखील अगदीच खोलगट भागात असल्याने असे ज्वालामुखी शोधणे कठीण असते, याचा त्यांनी येथे पुनरुच्चार केला. हा ज्वालामुखी 30 हजार फुटांपेक्षाही अधिक उंच आणि 280 मैलांपेक्षाही अधिक अंतराचा असल्याची शक्यता यापूर्वी वर्तवली गेली आहे.
मंगळावरील अन्य ज्वालामुखींप्रमाणेच हा ज्वालामुखीदेखील किती काळ सक्रिय असेल, हे सांगणे कठीण असल्याचे संशोधकांचे मत आहे. सेटी इन्स्टिट्यूटमधील संशोधक शास्त्रज्ञ पास्कल ली व त्यांच्या अन्य सहकार्यांनी टेक्सासमधील वूडलँडस येथे झालेल्या एका सायन्स कॉन्फरन्समध्ये याबाबतचा शोधनिबंध सादर केला होता.
Latest Marathi News मंगळावरील ज्वालामुखीमुळे संशोधकांच्या आशा-अपेक्षा उंचावल्या Brought to You By : Bharat Live News Media.
