मैदान लोकसभेचे; तालीम विधानसभेची!

इस्लामपूर : लोकसभा निवडणूक निकालावर विधानसभा निवडणुकीची समीकरणे ठरणार आहेत. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघाच्या निकालात निर्णायक आघाडी देणार्‍या इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व भाजप या प्रमुख पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. महाविकास आघाडी व महायुतीत वर्चस्वासाठी येथे चढाओढ आहे. हातकणंगले मतदारसंघातील लढतीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित … The post मैदान लोकसभेचे; तालीम विधानसभेची! appeared first on पुढारी.

मैदान लोकसभेचे; तालीम विधानसभेची!

मारुती पाटील

इस्लामपूर : लोकसभा निवडणूक निकालावर विधानसभा निवडणुकीची समीकरणे ठरणार आहेत. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघाच्या निकालात निर्णायक आघाडी देणार्‍या इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व भाजप या प्रमुख पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. महाविकास आघाडी व महायुतीत वर्चस्वासाठी येथे चढाओढ आहे.
हातकणंगले मतदारसंघातील लढतीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील मैदानात उतरणार असल्याने चुरशीची तिरंगी लढत अपेक्षित आहे. विजयासाठी इस्लामपूर मतदारसंघातून स्थानिक नेत्यांच्या मदतीने मताधिक्य घेण्यावर उमेदवारांचा भर असणार आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार निवडणुकीत उतरल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचीही जबाबदारी वाढली आहे.
माजी खा. राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल, अशी चर्चा होती; मात्र आघाडीने उमेदवार उभा केल्याने महायुतीचे खा. धैर्यशील माने, शेट्टी, सत्यजित पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे व अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. हे उमेदवार किती व कोणाची मते घेतात, यावरही प्रमुख उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. खा. माने यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. त्यांना शिवसेनेबरोबरच भाजप, रयत क्रांती संघटना, राष्ट्रवादी अजित पवार गटाची साथ असणार आहे. येथे शिवसेनेचे फारसे वर्चस्व नसले, तरी भाजपची ताकद चांगली आहे; मात्र भाजपमधील सर्व गट खा. माने यांचा प्रचार कितपत करतात, यावरही त्यांचे मताधिक्य अवलंबून असणार आहे. त्यासाठी त्यांना संघर्षही करावा लागेल. भाजपचे येथील नेते जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक, विकास आघाडीचे नेते विक्रम पाटील, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत, शिवसेनेचे आनंदराव पवार, गौरव नायकवडी, अजित पवार गटाचे केदार पाटील या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे आव्हान असणार आहे.
महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील मतदारसंघात नवखे उमेदवार आहेत. यापूर्वी त्यांचा मतदारसंघात संपर्क नाही. शिवसेना ठाकरे गटाचे येथे फारसे वर्चस्वही नाही; मात्र येथून शरदचंद्र पवार गटाची मोठी ताकद त्यांना मिळणार आहे. शिवाय काँग्रेस पक्षही त्यांच्यासोबत असेल. आ. जयंत पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील हे सत्यजित पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करतील.
माजी खासदार राजू शेट्टी यांना यापूर्वीच्या निवडणुकांत इस्लामपूर मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे. त्यांचा सामान्य मतदारांपर्यंत थेट संपर्क आहे. या निवडणुकीत मात्र महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात असल्याने, शिवाय मोठा गट, नेता त्यांच्यासोबत नसल्याने त्यांनाही मताधिक्य मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. त्यांची मदार दोन्ही बाजूंकडील नाराज नेते व सामान्य मतदारांवर असणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुका होतील. त्यामुळे विधानसभेचे गणित डोळ्यांसमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांचे नेते लोकसभा निवडणुकीत आपापली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करतील.
Latest Marathi News मैदान लोकसभेचे; तालीम विधानसभेची! Brought to You By : Bharat Live News Media.