शिंदे-गायकवाड वादावर अखेर पडदा; गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदेंना पाठिंबा

शिंदे-गायकवाड वादावर अखेर पडदा; गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदेंना पाठिंबा

डोंबिवली; Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवसेनेचे शिंदे समर्थक शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळ्या झाडल्याच्या प्रकरणामुळे भाजप आमदार गणपत गायकवाड सध्या तुरूंगात आहेत. गणपत गायकवाड यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी शिंदे – गायकवाड वाद मिटवत कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात भाजपाच्या कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी आज (दि.७) पत्रकार परिषदेत खा. डॉ. शिंदे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर करून शिंदे – गायकवाड वादावरील पडदा दूर केला.
तत्पूर्वी डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांशी संवाद साधून त्यांच्या मनात असलेला रोष काढून टाकण्यात यश मिळविले. त्यामुळे गायकवाड समर्थक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी सहकार्य करण्याचे जाहीर केले. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांंनी त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीत कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काम न करण्याचा आणि भाजपचा उमेदवार आणि कमळ चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराचाच प्रचार करण्याचे जाहीर केले होते. अशा आशयाचा प्रस्ताव भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेतला होता. या निर्णयामुळे कल्याण पूर्वेत भाजप आणि शिवसेनेत दुभंग निर्माण होऊन तणावाचे वातावरण पसरले होते. निर्णय घेणारे हे आमदार गायकवाड यांचे कार्यकर्ते किंवा भाजप कार्यकर्ते नसून ते गुंड प्रवृत्तीचे लोक महायुतीत बेबनाव निर्माण करण्यासाठी अशाप्रकारची भूमिका घेत असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह खासदार डॉ. शिंदे यांनी केली होती.
मंत्री चव्हाणांची शिष्टाई आली कामाला
आमदार गणपत गायकवाड यांची त्यांच्या मतदार संघात लाखाहून अधिक मते असून त्यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने आहेत. ही मते महायुतीच्या उमेदवाराला अडचणीत आणू शकतात, हा विचार करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आमदार गायकवाड समर्थकांशी रविवारी सकाळी संवाद साधला. गायकवाड समर्थकांची भूमिका ऐकून घेतली. आपणास नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. राष्ट्र विचार हा भाजपमध्ये प्रथम असून त्यानंतर पक्ष आणि व्यक्ती विचार असल्याचे मंत्री चव्हाण यांनी पटवून सांगितले. त्यामुळे या निवडणुकीत व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेऊन भाजप कार्यकर्त्यांनी डॉ. शिंदे यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करायचे आहे, असे आमदार गायकवाड समर्थकांना मंत्री चव्हाण यांनी पटवून सांगितले. त्यानंतर आमदार गायकवाड समर्थकांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी काम करण्याचा निर्धार मंंत्री चव्हाण यांच्या समोर व्यक्त केला.
हकालपट्टीची मागणी करणाऱ्याला समज मिळेल
या निर्णयामुळे कल्याण पूर्व भागात आता कोणत्याही प्रकारचा शिवसेना आणि भाजप युतीत तणाव राहिलेला नाही. एकजुटीने या भागात कार्यकर्ते डॉ. शिंदे यांच्यासाठी काम करतील, असे भाजपाच्या कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेचे युवा नेते दीपेश म्हात्रे यांनी तर आमदार गणपत गायकवाड यांची भाजपामधून हकालपट्टी करण्याची शनिवारी मागणी केली होती. त्यावेळी त्यांचे ते व्यक्तिगत मत असल्याचे आणि त्यांचे नेते त्यांना योग्य ती समज देतील, असेही नरेंद्र सूर्यवंंशी यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करणे गैर नाही
आमदार गणपत गायकवााड हे आमचे नेते आहेत. त्यांना आमचे शंभर टक्के समर्थन आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्या विषयी आपलेपणा वाटणे सहाजिकच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दोन दिवसांत काही भूमिका डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विषयी घेतली होती. मात्र आता ती निवळली आहे. कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त करणे काही गैर नाही, असेही जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यंंवंशी यांनी स्पष्ट केले.
कल्याण पूर्वेतील तणाव निवळला
भाजपाचे आमदार गायकवाड यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने गेल्या दोन महिन्यांपासून कल्याण पूर्वेत शिवसेना आणि भाजपामध्ये तणाव आहे. खासदार डॉ. शिंंदे यांनी दिलेल्या पाठबळामुळे महेश गायकवाड हे आमदार गणपत गायकवाड यांना सतत त्रास देत होते, असे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. तो रोष आता कल्याण लोकसभा निवडणुकीत काढण्याची तयारी कल्याण पूर्वेतील आमदार गायकवाड समर्थकांनी केली होती. मात्र या वादावर आता पडदा पडला आहे.
हेही वाचा : 

Hingoli BJP : भाजप बंडखोरांची मनधरणी सुरू, गिरीश महाजन ॲक्शन मोडवर
काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत २४४ उमेदवार जाहीर
दहा वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरात

Latest Marathi News शिंदे-गायकवाड वादावर अखेर पडदा; गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदेंना पाठिंबा Brought to You By : Bharat Live News Media.