संरक्षण : ‘स्टेग’ : भारताचे क्रांतिकारी पाऊल

‘स्टेग’मुळे आमच्या भारतीय सैनिकांची डिजिटल युद्ध क्षमता आणखी मजबूत होईल. या उपक्रमामुळे लष्कर, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी होण्यास मदत होईल. भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ पाहत आहे. ‘स्टेग’सारखी आधुनिक प्रणाली भारताच्या या आत्मनिर्भरतेला आणि सामरिक सज्जतेला बळकटी देणारी आहे. एकविसाव्या शतकामध्ये युद्ध पद्धतींमध्ये आमूलाग्र परिवर्तन होताना दिसत आहे. एकीकडे संगणक प्रणालींवर सायबर हल्ला … The post संरक्षण : ‘स्टेग’ : भारताचे क्रांतिकारी पाऊल appeared first on पुढारी.

संरक्षण : ‘स्टेग’ : भारताचे क्रांतिकारी पाऊल

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

‘स्टेग’मुळे आमच्या भारतीय सैनिकांची डिजिटल युद्ध क्षमता आणखी मजबूत होईल. या उपक्रमामुळे लष्कर, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी होण्यास मदत होईल. भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ पाहत आहे. ‘स्टेग’सारखी आधुनिक प्रणाली भारताच्या या आत्मनिर्भरतेला आणि सामरिक सज्जतेला बळकटी देणारी आहे.
एकविसाव्या शतकामध्ये युद्ध पद्धतींमध्ये आमूलाग्र परिवर्तन होताना दिसत आहे. एकीकडे संगणक प्रणालींवर सायबर हल्ला करून ती निरुपयोगी करून शत्रुराष्ट्रांना जेरीस आणण्याचे आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षेला खिंडार पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत; तर दुसरीकडे युद्धांमध्ये वापरल्या जाणार्‍या शस्त्रास्त्र प्रणालीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. त्यातून अनेक पारंपरिक शस्त्रास्त्रांची अचूकता वाढण्याबरोबरच मारक क्षमताही वाढली आहे. अलीकडील काळात तर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या प्रगत तंत्रज्ञानाची साथ लाभल्यामुळे युद्धशास्त्रालाच नवे आयाम प्राप्त झाले आहेत. एआय आधारित शस्त्रास्त्रे हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय बनून पुढे आला आहे.
सध्याची एकंदर परिस्थिती पाहता, भविष्यातील युद्धांमध्ये तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, यात शंका नाही. युनिटस् आणि फॉर्मेशन्सना समर्थन देण्यासाठी आधुनिक युद्धात नवीन उपकरणे समाविष्ट करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानातील अशी प्रगती आत्मसात करण्यासाठी भारतीय सैन्याने सिग्नल टेक्नॉलॉजी इव्हॅल्युएशन अँड अडॉप्शन ग्रुप हे ग्राऊंड ब्रेकिंग तंत्रज्ञानाधारित ‘स्टेग’ युनिट तयार केले असून, ते डिजिटल डोमेनमध्ये त्याच्या क्षमतांना बळ देणारे ठरणार आहे.
तंत्रज्ञानाच्या बदलामुळे कुठले शस्त्र घ्यायचे, त्याला सैन्यात केव्हा सामील करायचे आणि असे करताना सर्वात अत्याधुनिक; पण कमी किमतीत असे तंत्रज्ञान आपल्या सैन्यामध्ये कसे येईल हे ठरवणे व ते आणणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी भारतीय सैन्याने ‘स्टेग’ युनिट सुरू केले आहे. भारतीय सैन्यात विघटनकारी तंत्रज्ञान म्हणजे एआय, 5-जी, 6-जी, मशिन लर्निंग, क्वांटम तंत्रज्ञान व अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानांवर संशोधन केले जात आहे.
‘स्टेग’ युनिट भविष्यातील विघटनकारी तंत्रज्ञानाचा शोध घेण्यासाठी समर्पित असे एक विशेष तंत्रज्ञान युनिट आहे. ‘स्टेग’ लष्कराच्या सिग्नल संचालनालयाच्या अंतर्गत काम करेल आणि कॉर्प्स ऑफ सिग्नल्समधील कर्नल त्याचे नेतृत्व करतील. या युनिटमध्ये सुमारे 280 कर्मचारी असतील. त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट कठोर मूल्यमापन आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचा वापर करून लष्कराच्या क्षमतांना चालना देणे हे आहे. ‘स्टेग’ कृत्रिम बुद्धिमत्ता, 5-जी आणि 6-जी नेटवर्क, मशिन लर्निंग आणि क्वांटम तंत्रज्ञानासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे संशोधन आणि मूल्यमापन करेल. या माध्यमातून एकूण कार्यक्षमता वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट असेल.
‘स्टेग’ युनिट, वायर्ड आणि वायरलेस तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या युनिटच्या माध्यमातून भारतीय सैन्यासाठी मोबाईल अ‍ॅप, वेब इत्यादी विकसित केले जाणार आहेत. ‘स्टेग’ युनिट वेगाने बदलणार्‍या सध्याच्या युद्धाकरिता तयार राहण्यासाठी आणि भविष्यकालीन युद्धभूमीचा विचार करून तंत्रज्ञान विकसित करण्याच्या लष्कराच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. त्यासाठी वायर्ड आणि वायरलेस सिस्टीम कम्युनिकेशन आवश्यक आहे. मोबाईल कम्युनिकेशनव्यतिरिक्त सॉफ्ट डिफाईंड रेडिओ, इलेक्ट्रॉनिक एक्स्चेंज, इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणाली, 5-जी आणि 6-जी नेटवर्क, क्वांटम तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग इत्यादी विकसित केले जात आहे. यासाठी भारतीय सैन्य उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी भागीदारी करणार आहे. हे हायटेक युनिट तांत्रिक स्काऊंटिंग, मूल्यांकन, विकास, कोअर आयसीटी उपायांचे व्यवस्थापन करणार आहे आणि जगात उपलब्ध समकालीन तंत्रज्ञानाची सुधारणा करून भारतीय सैन्याला तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे घेऊन जाणार आहे. ‘स्टेग’ युनिट भविष्यकालीन तंत्रज्ञानाचे संशोधन आणि मूल्यमापन करणार आहे. या क्षेत्राचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन लष्करी वापरासाठी शिक्षण, क्वांटम संगणक विकसित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोल्युशन्सचा लाभ घेणे आणि शैक्षणिक, उद्योग यांच्या सहकार्याने चांगले तंत्रज्ञान तयार करणे हे ‘स्टेग’चे उद्दिष्ट आहे.
उद्याचे युद्धक्षेत्र सुरक्षित आणि मजबूत दळणवळण प्रणालींवर अधिकाधिक अवलंबून आहे. पारंपरिक पद्धतींना सतत नवीन आव्हाने निर्माण होत आहेत. ‘स्टेग’चे उद्दिष्ट आहे की, लष्कराला सर्वात प्रगत साधने उपलब्ध आहेत याची खात्री करणे. हा उपक्रम केवळ नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यापलीकडे जातो. आधुनिक युद्धामध्ये संपूर्ण रणांगणावर उच्च प्रमाणात माहितीची देवाण-घेवाण आणि रिअल टाईम समन्वयाची आवश्यकता असते. सुरक्षित आणि विश्वासार्ह कम्युनिकेशन, प्रभावी आदेश आणि नियंत्रणासाठी ‘स्टेग’ सर्वोपयोगी आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काही प्रगत देशांची मक्तेदारी आहे. ‘स्टेग’सह भारताने संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पहिले आणि धाडसी पाऊल उचलले आहे. ‘स्टेग’ची स्थापना लष्कराच्या व्यापक आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांशी जुळते. आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इंडियाच्या तत्त्वांशी अनुरूप ‘स्टेग’ एकीकडे सशस्त्र दल आणि दुसरीकडे उद्योग, शैक्षणिक क्षेत्राची मदत घेऊन आपल्या उणिवा कमी करण्यास मदत करेल. उच्च श्रेेणीतील तंत्रज्ञान हे देशासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ते आत्मसात केल्यास त्यांना अधिक स्वयंपूर्ण करणार आहेत. दळणवळण हा लष्करी ऑपरेशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. ‘स्टेग’ने हाती घेतलेल्या विशिष्ट प्रकल्पांचे तपशील सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञात आहेत. मात्र, असा विश्वास आहे की, हे युनिट अनेक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
युद्धक्षेत्रासाठी वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामध्ये उत्तम तंत्रज्ञान आणि माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी पूर्ण भारतीय सैन्याला जोडण्याची क्षमता असणे हेसुद्धा पाकिस्तान, चीनवर मात करण्यास फायदेशीर ठरणार आहे. चिनी सैन्य 6-जी तंत्रज्ञान अंगीकारत असून, भारतातही त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. 6-जी तंत्रज्ञानामुळे मानवरहित लष्करी मालमत्तेवर ऑपरेटरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे नियंत्रण ठेवता येणार आहे.
एकंदरीतच, ‘स्टेग’मुळे आमच्या 12 लाख सैनिकांची डिजिटल युद्ध क्षमता आणखी मजबूत होईल. या उपक्रमामुळे लष्कर, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी होण्यास मदत होईल. भू-राजकीय अनिश्चितता आणि अकल्पित धोक्यांनी चिन्हांकित केलेल्या युगात, प्रगत संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. याद़ृष्टीने ‘स्टेग’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संरक्षण क्षेत्रातील विदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी करून आणि स्वदेशी क्षमतांचे पालनपोषण करून ‘स्टेग’ केवळ भारताचा संरक्षण औद्योगिक पाया मजबूत करणार नाहीये, तर दीर्घकाळासाठी आर्थिक लवचिकता आणि राष्ट्रीय सुरक्षादेखील वाढवण्यास साहाय्यभूत ठरणार आहे. आतापर्यंत प्रगत अर्थव्यवस्था आणि संशोधन परिसंस्था असलेल्या निवडक देशांची मक्तेदारी असणार्‍या ‘स्टेग’ प्रणालीची भारतात स्थापना होणे याचे दूरगामी परिणाम लक्षणीय आहेत.
गेल्या दशकभरामध्ये भारताने आधुनिक युद्ध पद्धतीच्या क्षेत्रात जोमाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. संरक्षण क्षेत्रातील शस्त्रसामग्रीची खरेदी करताना संवेदनशील तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्याबाबत भारत आग्रही राहत आहे. यामागचे कारण म्हणजे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्याच्या भविष्यात शस्त्रास्त्रांची निर्मिती भारतात व्हावी आणि त्यातून देशात रोजगारनिर्मिती व्हावी. तसेच मोक्याच्या क्षणी या सामग्रीबाबतचे परावलंबित्व घातक ठरू शकते, हे भारताने कारगिल युद्धासह अनेकदा अनुभवले आहे. त्यामुळे भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ पाहत आहे. ‘स्टेग’सारखी आधुनिक प्रणाली भारताच्या या आत्मनिर्भरतेला आणि सामरिक सज्जतेला बळकटी देणारी आहे.
Latest Marathi News संरक्षण : ‘स्टेग’ : भारताचे क्रांतिकारी पाऊल Brought to You By : Bharat Live News Media.