द्रविडी राजकारणाला भाजपचे आव्हान

अजय सेतिया
तामिळनाडूच्या राजकारणात द्रमुक आणि अद्रमुक यांच्याकडेच सत्ता आलटून-पालटून येत राहिली आहे. यावेळी भाजपने तेथे छोट्या-मोठ्या पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करून पारंपरिक द्रविडी राजकारणाला मोठा धक्का दिल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रामुख्याने अद्रमुकच्या गोटात हलकल्लोळ उडाला आहे.
तामिळनाडूच्या राजकारणावर 1967 पासून द्रविडी पक्षांनी वर्चस्व गाजविले आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाने तेथे प्रथमच अद्रमुक आणि द्रमुक या द्रविडी पक्षांना खुलेआम आव्हान दिले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1967 पर्यंत या राज्यात काँग्रेसची राजवट होती. 1967 मध्ये प्रथमच काँग्रेसला द्रमुककडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर काही काळ काँग्रेसने द्रविडी पक्षांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. तथापि, काळाच्या ओघात काँग्रेस पक्ष कमकुवत होत गेला. 1972 मध्ये द्रमुकची शकले उडाली आणि अद्रमुक हा नवा पक्ष अस्तित्वात आला. तेव्हापासून या राज्यात कधी अद्रमुक, तर कधी द्रमुक या दोनच पक्षांनी सत्तेवर मांड ठोकली. तामिळनाडूमध्ये भाजपची प्रतिमा ब्राह्मणांचा हिंदी भाषिक पक्ष आहे. त्यामुळे तेथे भाजपला कधीच फारसे पाय रोवता आले नाहीत. मात्र, 1998 मध्ये अद्रमुकच्या पाठिंब्यानेच अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान बनले होते. दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता स्वतः ब्राह्मण होत्या. मात्र, राज्यात त्यांनी नेहमी द्रविडी राजकारणच केले. गेल्या वीस वर्षांपासून अद्रमुक कधी एनडीएसोबत, तर कधी एनडीएबाहेर राहिल्याचे दिसून येते.
भाजपचा मास्टरस्ट्रोक
भाजपने 2021 मध्ये माजी आयपीएस अधिकारी अण्णा मलाई यांना प्रदेशाध्यक्ष करून प्रथमच द्रविडी राजकारणाला जोरदार आव्हान दिले. गेल्या तीन वर्षांपासून ते सारे राज्य पिंजून आवश्यक रुपरेषा तयार केली आहे. त्यानुसार अद्रमुकचे काही बडे नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. याचा परिणाम असा झाला की, चिरफळ्या उडालेल्या अद्रमुकची पाचावर धारण बसली. आपली जागा भाजप घेईल की काय, अशी भीती अद्रमुकला वाटू लागली. गेल्या वर्षी 23 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएची बैठक बोलावली होती. त्या बैठकीस अद्रमुकने आवर्जून उपस्थिती लावली होती. मात्र, त्यानंतर अण्णा मलाई यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अद्रमुकच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली. अखेर अण्णा मलाई यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाका, अशी मागणी अद्रमुकने लावून धरली. भाजपने ती फेटाळली आणि पाठोपाठ अद्रमुकने एनडीएला रामराम ठोकला.
सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग
गेल्या तीन वर्षांपासून भाजपने या राज्यात सोशल इंजिनिअरिंगद्वारे छोट्या-मोठ्या आठ पक्षांची मोट बांधली आहे. ही तिसरी शक्ती हळूहळू ताकद वाढवत निघाल्यामुळे द्रमुक आणि अद्रमुक हे दोन्ही द्रविडी पक्ष मनातून चरकले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील या आघाडीने यावेळी तामिळनाडूत लोकसभेच्या सर्व म्हणजे 39 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. स्वतः अण्णा मलाई हे गौंडर समाजातून येतात. हा समाज ओबीसीत मोडतो. उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये यादव समाजाचे जे स्थान आहे, तसेच ते तामिळनाडूच्या राजकारणात गौंडर समाजाचे आहे. भाजपचे दोन्ही आमदार याच गौंडर समाजाचे आहेत. त्यांना भाजपने भावी मुख्यमंत्री म्हणून पुढे आणले आहे. माजी मुख्यमंत्री आणि अद्रमुकचे नेते ई पलानीस्वामी हेही गौंडर समाजाचे आहेत. त्यामुळे आपली मतपेढी सुरक्षित राखण्यासाठी अद्रमुकला प्रयत्नांची शर्थ करावी लागत आहे.
एवढेच नव्हे तर भाजपने या राज्यात मागासवर्गीयांना एका सूत्रात बांधण्याचा सपाटाही लावला आहे. नैनार नागेंद्रन यांना विधिमंडळ पक्षाचे नेते बनवून थेवर समाजाशी भाजपने जवळीक साधली आहे. थोडक्यात सांगायचे तर या माध्यमातून द्रमुकला बाजूस सारून अद्रमुकचे स्थान तामिळनाडूच्या राजकारणात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. जयललिता यांच्या कारकीर्दीत अद्रमुक जेवढा शक्तिशाली होता, तेवढा तो आता राहिलेला नाही. त्यामुळे तो मोकळा अवकाश व्यापण्यासाठी भाजपने नियोजनबद्ध मशागत सुरू केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अद्रमुकशी युती केली होती. मात्र, त्याचा फायदा झाला नव्हता. तेव्हा द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने 39 पैकी 38 जागा जिंकल्या होत्या.
यावेळी सर्वत्र तिरंगी लढती
यावेळी द्रमुक पुन्हा एकदा आपल्या मित्र पक्षांसह मैदानात उतरला आहे. अद्रमुक आपल्या चार मित्र पक्षांसह रिंगणात उतरला आहे. त्याचवेळी भाजपने आठ छोट्या पक्षांना सोबत घेऊन नवी आघाडी तयार केली आहे. भाजप स्वतः 23 जागांवर लढत असून अन्य 10 जागांवर त्याचे मित्रपक्ष निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. या तिरंगी मुकाबल्यांमुळे पारंपरिक द्रविडी मतांचे विभाजन होऊन त्याचा लाभ भाजपला होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. हरियाणात जाट समाजाच्या बाबतीत भाजपने असाच प्रयोग केला होता आणि त्याला जबरदस्त यश लाभले होते. तामिळनाडूत भाजपने तेच सूत्र अवलंबले आहे.
Latest Marathi News द्रविडी राजकारणाला भाजपचे आव्हान Brought to You By : Bharat Live News Media.
