कोल्हापुरात चाळिशीचा चटका; उष्माघाताचा चौघांना फटका

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापुरात सलग दुसर्या दिवशी उन्हाचा जबर तडाखा जाणवला. सूर्य आग ओकू लागल्याने शनिवारी दैनंदिन कमाल तापमानात सरासरी 3.1 अंशाची वाढ होऊन पारा 39.6 अंशांवर स्थिरावला होता. यामुळे हा उष्मा असह्य बनला असून कोल्हापूरकरांची अक्षरशः लाही लाही होत आहे. उन्हाचा आघात आता थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. जिल्ह्यात उष्माघाताचे चार रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी सांगितले. यामुळे कोल्हापूरकरांनी या उन्हात विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
गेला आठवडाभर कोल्हापूरचे तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तापमानात इतकी वाढ झाली आहे की, दुपारच्या सुमारास रस्त्यांमधून गरम झळा येत आहेत. यावरून वाढलेल्या तापमानाचा अंदाज येतो. या उन्हामुळे उष्माघाताचा धोका देखील वाढला आहे. उष्माघातामुळे राधानगरी तालुक्यात एक, करवीर तालुक्यात दोन तर शिरोळ तालुक्यात एक व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे लागले. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य अधिकार्यांनी सांगितले.
मंगळवार, दि. 9 पर्यंत तापमानात वाढ कायम राहणार असून बुधवारी (दि. 10) विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शुक्रवारी कमाल तापमान 40.2 अंशावर गेले होते. शनिवारी यामध्ये किंचितशी घट होऊन पारा 39.6 अंशावर आला होता. मात्र दैनंदिन किमान तापमानात सरासरी 3.5 अंश सेल्सिअसची वाढ होऊन तापमान 25 अंशावर स्थिरावल्याने सायंकाळनंतरही उष्मा अधिक तीव्रतेने जाणवत होता.
वाढलेल्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख मार्ग निर्मनुष्य झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रखरखत्या उन्हात थंडावा मिळावा यासाठी नागरिकांकडून शीतपेय पिण्यासाठी गर्दी होत आहे. उन्हात फिरताना नागरिक टोपी, छत्री, सनग्लासेसचा वापर करत आहेत.
Latest Marathi News कोल्हापुरात चाळिशीचा चटका; उष्माघाताचा चौघांना फटका Brought to You By : Bharat Live News Media.
