एकनाथ खडसेंची लवकरच घरवापसी, विनोद तावडेंनी घडविला चमत्कार?

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : काही वर्षांपूर्वी भाजपमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) रामराम ठोकून लवकरच स्वगृही परतणार आहेत. जळगावमधून खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापल्याचा धक्का पक्षाला बसू नये म्हणून सध्या नवी दिल्लीत मोठे राजकीय वजन असलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची घरवापसी घडवून आणल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या एका कामासाठी दिल्लीत होते. याचवेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या भेटीतच एकनाथ खडसे यांचा पुन्हा भाजप प्रवेश निश्चित झाला. विनोद तावडे यांनीच या भेटीसाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. खडसे यांचा अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्यासोबतचा एक फ़ोटो देखील व्हायरल होत आहे. तो फोटोही याच भेटीदरम्यानचा असल्याचे समजते.
एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा वाद सुरु होता. या वादामुळेच खडसे यांनी मंत्रिपदाचा आणि भाजपचा राजीनामा दिला होता. जळगावचे भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत देखील खडसे यांचे विळ्या भोपळ्याचे वैर होते. काही वेळा भाजपमधील नेत्यांचा हा संघर्ष दिसूनही पडला.
दरम्यान, विनोद तावडे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत विनोद तावडे यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादीही तावडे यांनीच जाहीर केली होती. नवी दिल्लीतील प्रसारमाध्यमांसह भाजपमध्ये इतर पक्षातील मोठ्या नेत्यांचा प्रवेश घडवून आणायचा असेल तर त्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये विनोद तावडे यांचा समावेश आहे.
जळगाव आणि सभोवतालची भाजपची ही परिस्थिती लक्षात घेऊन विनोद तावडे यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने एकनाथ खडसे यांना विश्वासात घेऊन त्यांचा भाजपमध्ये पुनर्प्रवेश घडवून आणला. चार दिवसांपूर्वीच खडसे यांनी दिल्लीत दाखल होऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची गुप्त भेट घेतली. या भेटीत खडसे यांची नाराजी दूर करून त्यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. खडसे यांच्या घरवापसीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची दिलजमाई होणार का? खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर संपुष्टात येईल का? या प्रश्नांच्या उत्तराकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
घरवापसी करण्यावर एकनाथ खडसे यांचे शिक्कामोर्तब
भाजपमध्ये मी लवकरच घरवापसी करणार आहे. मात्र, माझ्या पुनर्प्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरला नाही, असे एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. माझा पक्षप्रवेश निवडणुकीआधी अथवा नंतर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खडसेंचा पक्षप्रवेश दिल्लीत?
एकनाथ खडसे हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. भाजप सोडताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भाजपमध्ये असतानाही खडसे ज्येष्ठ होते. राज्यातील नेतृत्वासोबत त्यांचे यापूर्वीच्या काळात उडालेले खटके आणि गेल्या काही काळात खडसे यांची भूमिका पाहता त्यांचा पक्षप्रवेश दिल्लीतील पक्षमुख्यालयात होण्याची दाट शक्यता आहे.
Latest Marathi News एकनाथ खडसेंची लवकरच घरवापसी, विनोद तावडेंनी घडविला चमत्कार? Brought to You By : Bharat Live News Media.
