विटा; विजय लाळे : Sangli Lok Sabha Election 2024 : चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सांगलीतील राजकाराणाला वेगळे वळण मिळालं आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी या उमेदवारीला विरोध दर्शवत विशाल पाटील यांना उमेदवार मिळावा यासाठी मागणी केली आहे. त्यामुळे हा मुद्दा चर्चेचा बनला आहे. संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारी बाबतचे कारण सांगितले आहे. ते म्हणाले की, सांगलीतील फिक्सिंगचे राजकारण मोडून काढण्यासाठीच आम्ही चंद्रहार पाटीलांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर आता यावर राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर विटा (जि. सांगली) येथे पदाधिकारी संवाद मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी जाण्यापूर्वी खासदार संजय राऊत यांचे येथील राष्ट्रकुल आखाड्यात चांदीची गदा देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला यात खासदार संजय राऊत म्हणाले, काँग्रेसवाल्यांनी सांगली लोकसभेचा विषय आता फार ताणू नये. काय चाललंय ते सगळ्यांना माहित आहे. आता जेवढी ताकद ते उमेदवारी मिळविण्यासाठी लावत आहेत, तेवढी ताकद २०१९ ला लावली असती आणि काँग्रेसवाले एकत्रित एकदिलाने लढले असते तर विशाल पाटील यांच्यावर ही वेळ आली नसती असे राऊत म्हणाले. Sangli Lok Sabha Election 2024
फिक्सिंगचे राजकारण मोडीत काढण्यासाठीच चंद्रहार पाटलांना उमेदवारी
ते पुढे म्हणाले की, वास्तविक विशाल पाटील हा चांगला मुलगा आहे. परंतु जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांनी त्याचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी कोणा कोणाच्या कुठे कुठे कोणा कोणाबरोबर बैठका झाल्या. याची पक्की माहिती आम्हाला मिळाली. त्यांचे फिक्सिंगचे राजकारण मोडीत काढण्यासाठीच आम्ही एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील चंद्रहार पाटील सारख्या मुलाला तिकीट देण्याचे फायनल केले असेही खासदार राऊत म्हणाले.
ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना विश्वासात का घेतले नाही?
तुम्ही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना याबाबत विश्वासात का घेतले नाही? असा प्रश्न करताच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने सगळ्यात प्रथम आपले उमेदवार जाहीर केले त्यांची यादी दिल्लीतून आली. मग आम्ही आमची १६ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपली यादी जाहीर केली. महाविकास आघाडी एकत्र राहिली पाहिजे अशी आमची एकट्याची नव्हे तर सर्वांची जबाबदारी आहे. शेवटी पंतप्रधानपद काँग्रेसला मिळवायचे आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावं असं राऊत म्हणाले. Sangli Lok Sabha Election 2024
काँग्रेसने सांगलीचा विषय इतका का ताणला आहे? Sangli Lok Sabha Election 2024
काँग्रेसने सांगलीचा विषय इतका का ताणला आहे? या प्रश्नावर खासदार राऊत उसळून म्हणाले, रामटेक, अमरावती, कोल्हापूर या जागा आम्ही हसत हसत सोडल्या आहेत. ज्या जागा आम्ही गेल्यावेळी जिंकल्या होत्या. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर असो अगर कडेगाव, पलूस इथल्या नेत्यांनी त्या ठिकाणी आपले संस्थान उभा केले आहे. साखर कारखाने, सहकारी संस्था, शिक्षण संस्था वाचवण्यासाठी, स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी काही मंडळी भारतीय जनता पार्टीशी हात मिळवणी करत आहेत त्यातूनच चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळू नये म्हणून काही नेत्यांनी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. पण सांगलीत आमची कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर त्यांची राज्यभरात कोंडी होईल हे लक्षात ठेवावं. गेल्या दहा वर्षात वसंत दादांच्या नातवाचा पराभव झाला. त्यावेळी ही मंडळी कुठे गेली होती. असा खणखणीत सवाल करत विशाल पाटील ज्या विश्वजीत कदम पायलट असलेल्या विमानात बसलेत ते विमानच चुकीचे आहे. ते विमान मागच्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीच्या धावपट्टीवर भरकटले होते, असे राऊत म्हणाले. Sangli Lok Sabha Election 2024
विशाल पाटील यांना राज्यसभेत पाठवण्याबाबत प्रस्ताव?
आता तुम्ही विशाल पाटील यांना राज्यसभेत पाठवतो म्हणताय पण तो प्रस्ताव मिडिया मार्फत का देताय? त्यावर खासदार संजय राऊत म्हणाले, कुणी सांगितलं? हा प्रस्ताव आम्ही महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या वतीने शरद पवार यांच्या मार्फत काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांच्याकडे पाठवलेला आहे. विशाल पाटील यांच्याबद्दल आम्हाला आत्मीयता आहे पण ते ज्यांच्यावर विसंबून आहेत त्यांच्या बद्दलची विश्वासार्हता तपासून घेतली पाहिजे, असेही खासदार राऊत यांनी सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडी एकत्र लढली तर सांगलीची चंद्रावर पाटील यांची सीट सुद्धा आम्ही चांगल्या फरकाने जिंकू असा विश्वासही खासदार राऊत यांनी बोलून दाखवला.
हेही वाचा
सांगलीच्या जागेवर लढण्यास काँग्रेस ठाम : विश्वजित कदम
Lok Sabha Election 2024 : सांगलीत ठाकरे सेनेच्या उमेदवारालाच लोकांचा पाठिंबा : संजय राऊत
Lok Sabha Election 2024 : सांगलीत मविआत उभी फूट; संजय राऊतांच्या दौर्याकडे काँग्रेस, राष्ट्रवादीची पाठ
Latest Marathi News सांगलीतील उमेदवारीवर संजय राऊत यांचा गौप्यस्फोट; म्हणाले ‘चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली कारण…’ Brought to You By : Bharat Live News Media.