‘हिंदुहृदयसम्राट’ एकनाथ शिंदे! पोस्टरवरून गदारोळ
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राजस्थानात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘हिंदुहृदयसम्राट’ ही बिरुदावली चिटकवण्यात आल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी वापरली जाणारी उपाधी मुख्यमंत्री शिंदे यांना लावण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गटाने तीव्र शब्दांत टीकेची झोड उठविली आहे.
राजस्थानमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे हे राजस्थान दौर्यावर होते. हवामहल विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बालमुकुंदाचार्य यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी रॅली केली. तसेच सभेलाही संबोधित केले. मात्र, बालमुकुंदाचार्य महाराज यांच्या बॅनर्सवरील मजकुरावरून वादंग माजले आहे. या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा करण्यात आल्याने ठाकरे गटाने जहरी टीका केली आहे.
‘पक्ष चोरला, नाव चोरले, बाप चोरायचा प्रयत्न केला. आता हेही? किती तो निर्लज्जपणा? जगात हिंदुहृदयसम्राट फक्त एकच… वंदनीय बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या आधी ना कुणी होता, त्यांच्यानंतर ना कुणी होऊ शकेल. जनता दूधखुळी नाही. सगळ्याचा हिशेब होणार,’ अशी पोस्ट ठाकरे गटाने केली आहे.
एवढा बाऊ करणे गैर : सुधीर मुनगंटीवार
एकनाथ शिंदे यांनी हातावर प्राण घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या रक्षणासाठी इतके मोठे पाऊल उचलले. त्यामुळे कार्यकर्त्यांना हिंदुत्वाचा आवाज म्हणजे एकनाथ शिंदे असे वाटत असेल, तर ते साहजिक आहे. उत्साहात त्यांनी तसे बॅनरवर लिहिले, तर त्याचा एवढा बाऊ करून राजकारण करण्याची गरज काय? यावरून सुरू असलेली ओरड गैर आहे, अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
एकनाथ शिंदेंनाच तो उल्लेख नामंजूर : मंत्री शंभूराज देसाई
ते पोस्टर मी पाहिले नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: ती विशेषणे वापरणार नाहीत. मुख्यमंत्री शिंदे हे स्वत:च्या नावापुढे तो शब्द कधी वापरणार नाहीत. मात्र, काही जण फक्त राजकारण करू पाहतात. काहींनी हिंदुत्वाची कास सोडून काँग्रेसची साथ धरली, हे जगजाहीर आहे, अशी टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटावर केली आहे.
The post ‘हिंदुहृदयसम्राट’ एकनाथ शिंदे! पोस्टरवरून गदारोळ appeared first on पुढारी.
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राजस्थानात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘हिंदुहृदयसम्राट’ ही बिरुदावली चिटकवण्यात आल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी वापरली जाणारी उपाधी मुख्यमंत्री शिंदे यांना लावण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गटाने तीव्र शब्दांत टीकेची झोड उठविली आहे. राजस्थानमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे …
The post ‘हिंदुहृदयसम्राट’ एकनाथ शिंदे! पोस्टरवरून गदारोळ appeared first on पुढारी.