नाशिक-दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त, १ मेपासून दररोज फ्लाइट
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- तांत्रिक बिघाडाचे कारण सांगत एप्रिल २०२३ मध्ये स्पाइस जेट कंपनीने नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद केली होती. त्यामुळे व्यापार, उद्योग क्षेत्रांबरोबरच राजकीय क्षेत्रातून नाराजीचा सूर व्यक्त होत होता. अखेर वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर इंडिगो कंपनीने नाशिक-दिल्ली विमानसेवेची घोषणा केली आहे. दि. १ मेपासून दररोज नाशिक-दिल्ली फ्लाइट उपलब्ध करून दिली जाणार असल्याने, व्यापार-उद्योग क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे.
नाशिकच्या विमानसेवेचा ब्रेक डाउन होत असतानाच इंडिगो कंपनीने पाच शहरांना जोडणारी सेवा सुरू करीत प्रवाशांना दिलासा दिला होता. मात्र, यात नाशिक-दिल्ली विमानसेवेचा समावेश नसल्याने ही सेवा सुरू करावी, अशी सातत्याने मागणी होत होती. एक दिवसापूर्वीच इंडिगो कंपनीने नाशिक-इंदूर विमानसेवेत अचानक कपात करताना पाच शहरांना थेट, तर २० शहरांना हॉपिंग फ्लाइटद्वारे जोडणाऱ्या विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यामध्ये हैदराबादमार्गे दररोज, तर अहमदाबादमार्गे आठवड्यातून एकच दिवस नाशिक-दिल्ली हॉपिंग फ्लाइटचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. मात्र, ही सेवा थेट असावी, अशी मागणी नाशिकच्या व्यापार-उद्योग क्षेत्रांतून केली जात होती. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, इंडिगो कंपनीने येत्या १ मेपासून दररोज नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू करण्याचे वेळापत्रकच प्रसिद्ध केले आहे. सकाळच्या सुमारास दिल्ली ते नाशिक अशी फ्लाइट उपलब्ध करून देण्यात आली असून, दुपारच्या सुमारास नाशिक ते दिल्ली अशी फ्लाइट असणार आहे. तिकिटाचे दर तीन हजार रुपये असतील, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, नाशिकच्या ओझर विमानतळावरून नाशिक-दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होणार असल्याने, व्यापार आणि उद्योग क्षेत्रांतून समाधान व्यक्त केले जात आहे. स्पाइस जेट कंपनीकडून जेव्हा ही सेवा सुरू होती, तेव्हा ती नफ्यात होती. मात्र, असे असतानाही कंपनीने अचानक तांत्रिक कारण पुढे करीत ही सेवा बंद केली. आता इंडिगोने ही सेवा सुरू केल्याने, त्यासदेखील प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
सहा शहरांना थेट विमानसेवा
इंडिगो कंपनीकडून नाशिकच्या ओझर विमानतळावरून आता सहा शहरांना थेट जोडणारी विमानसेवा दिली जाणार आहे. आतापर्यंत इंदूर, गोवा, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद या शहरांना दररोज विमानसेवा सुरू आहे. आता १ मेपासून यामध्ये नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू होत आहे, तर २० शहरांना हॉपिंग फ्लाइटद्वारे विमानसेवा सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू व्हावी, अशी सातत्याने मागणी हाेत होती. त्यानुसार इंडिगो कंपनीने ही सेवा सुरू केल्याने, व्यापार-उद्योग क्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. लवकरच नाशिक विमानतळावरून आणखी तीन विमान कंपन्या आपल्या सेवा सुरू करतील. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. – मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन कमिटी, निमा.
हेही वाचा-
Jalgaon Crime | मुक्ताईनगर तालुक्यात शेतातून घरी चाललेल्या महिलेचा दगडाने ठेचून खून
Alexa : ‘अॅलेक्सा’ ने काढला कुत्र्याचा आवाज अन् माकडांच्या टाेळीपासून ‘असे’ वाचले प्राण!
Nayak 2 साठी अनिल कपूरची तयारी, दिग्दर्शक एस शंकरसोबत स्पॉट
Latest Marathi News नाशिक-दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त, १ मेपासून दररोज फ्लाइट Brought to You By : Bharat Live News Media.