रक्तरंजित संसार! …अन् प्रतिभाच्या आयुष्याची झाली राखरांगोळी

पुणे जिल्ह्यातील पारगाव येथील सीतारामने आयुष्यभर ‘पोतराज’ म्हणून मोठ्या कष्टानं, पण नेटानं संसाराचा गाडा रेटला. देवदयेने सीतारामला अनिल आणि सुनील हे दोन सुपुत्र लाभले. त्यानं आपल्या दोन्ही पोरांना काही कमी पडू दिले नाही. बर्‍यापैकी शिक्षण दिलं. आता आपल्या फाटक्या आयुष्याला आधार मिळेल, ही सीतारामची आस होती; पण सीतारामचा थोरला मुलगा अनिल याला दारूच्या व्यसनानं घेरलं. … The post रक्तरंजित संसार! …अन् प्रतिभाच्या आयुष्याची झाली राखरांगोळी appeared first on पुढारी.

रक्तरंजित संसार! …अन् प्रतिभाच्या आयुष्याची झाली राखरांगोळी

अशोक मोराळे, पुणे

पुणे जिल्ह्यातील पारगाव येथील सीतारामने आयुष्यभर ‘पोतराज’ म्हणून मोठ्या कष्टानं, पण नेटानं संसाराचा गाडा रेटला. देवदयेने सीतारामला अनिल आणि सुनील हे दोन सुपुत्र लाभले. त्यानं आपल्या दोन्ही पोरांना काही कमी पडू दिले नाही. बर्‍यापैकी शिक्षण दिलं. आता आपल्या फाटक्या आयुष्याला आधार मिळेल, ही सीतारामची आस होती; पण सीतारामचा थोरला मुलगा अनिल याला दारूच्या व्यसनानं घेरलं. कुणीतरी सीतारामला सल्ला दिला, की अनिलचं लग्न करा, म्हणजे तो सुधारेल. ( Crime Diary )
संबंधित बातम्या  

Pudhari Crime Diary : ज्या साडीत पांडबाचा जीव अडकला, तिच साडी त्याच्या गळ्याभोवतीचा फास बनून गेली
Crime Diary : शंभराची नोट! सखुबाईंनी ‘असा’ उघड केला बनावट नोटांचा काळाबाजार
Crime Diary | गुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग!

सीतारामनं नात्यातीलच एका प्रतिभा नावाच्या मुलीला अनिलसाठी मागणी घातली. सीतारामने अनिल हा पुण्यात एका चांगल्या कंपनीत नोकरीला असून, त्याला पंचवीस हजार रुपये पगार मिळतो, असे खोटेच सांगितले. प्रतिभाच्या घरच्यांनीही फारशी चौकशी न करता होकार दिला आणि एका शुभमुहूर्तावर अनिल आणि प्रतिभा यांचे लग्न पार पडले. पण, अंगाची हळद वाळायच्या आधीच प्रतिभाच्या सुखी संसाराच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. अनिल हा कुठेही नोकरी करीत नसून, रात्रंदिवस दारूच्या नशेत असतो हे तिला समजले; पण आपलं नशीब समजून प्रतिभानं आपल्या परीनं आपल्या तळीराम नवर्‍याच्या संसाराचा गाडा ओढायला सुरुवात केली.
नवरा काही कामधाम करीत नसल्याने तिने नारायणगावातील एका कारखान्यात रोजंदारीवर नोकरी मिळवली. संसारासाठी चार पैसे मिळू लागले; पण अनिल काही सुधारणे तर दूरच, उलट दिवसेंदिवस जास्त बिघडत गेला. तो रोज सकाळी प्रतिभाकडं दारूसाठी पैसे मागायचा आणि तिने पैसे दिले नाहीत की तिला अमानुष मारहाण करायचा. पण, हा असला रक्तरंजित संसारही ती बिचारी काबाडकष्ट करून नेटानं चालवत होती. कालांतराने प्रतिभाला दोन मुले झाली. तिच्या आयुष्याला नवे अंकुर फुटले. पोरांच्याकडे बघून प्रतिभा आला दिवस साजरा करीत होती; पण अनिलचे रहाटगाडगे मात्र सुरूच होते.
हळूहळू अनिल आणखी वाह्यात होत गेला, पूर्वी तो दारूच्या पैशासाठी प्रतिभाला मारहाण करायचा; पण हळहळू त्याने दारूच्या पैशासाठी सीताराम आणि लहान भाऊ सुनील यालाही मारहाण सुरू केली. एकेदिवशी अनिलने सुनीलला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली आणि त्याच्या या रोजच्या मारहाणीला वैतागलेल्या सीताराम आणि सुनीलने अनिलविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी अनिलला अटक केली; पण कुणीही त्याला जामीन देण्यासाठी पुढे आले नाही. त्यामुळे त्याची रवानगी तुरुंगात झाली. शेवटी बिचार्‍या प्रतिभालाच आपल्या नवर्‍याची दया आली. तिने ती काम करीत असलेल्या कारखान्यातून काही रक्कम उचल म्हणून मिळवली. लोकांच्या हातापाया पडून आणखी काही पैसे जमा केले आणि एका वकिलाची मदत घेऊन अनिलला जामिनावर सोडवून आणले.
तुरुंगातून सुटून आल्यावर अनिलने सगळे ताळतंत्रच सोडले. तो एखाद्या सराईत आरोपीसारखा वागू लागला. प्रतिभाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारझोड करू लागला. मात्र, बिचारी प्रतिभा आपल्या लेकरा-बाळांकडे बघून रक्तरंजित संसाराला दोष देत, आला दिवस ढकलू लागली.
अनिलच्या जामिनासाठी प्रतिभाने बरेच पैसे खर्च केल्यामुळे आणि कारखान्यातूनही तिने उचल घेतल्यामुळे तिच्या हातात फुटकी कवडीही शिल्लक नव्हती. घरात अन्नाचा कण शिल्लक नव्हता. तशातच अनिलने दारूसाठी तिच्याकडे पैसे मागायला सुरुवात केली; पण तिच्याकडेच पैसे नव्हते तर ती देणार तरी कुठून? तेवढ्यात प्रतिभाची दोन लहान मुले घरात आली आणि त्यांनी भूक लागली म्हणून आईकडे काहीतरी खायला मागायला सुरुवात केली. बिचार्‍या त्या माऊलीनं शेजापाजार्‍यांच्या मिनवार्‍या करून दहा-वीस रुपये उसने आणले आणि शेजारच्या हातगाड्यावर जाऊन भजी-पाव खाण्यासाठी ते पैसे त्यांच्या हातावर टेकवले.
बस्स…अनिलच्या रागाचा पारा चढला. मला द्यायला तुझ्याकडे पैसे नाहीत आणि पोरांना द्यायला कसे आहेत, म्हणून रागाच्या भरात त्याने घरातील कुदळ उचलली आणि प्रतिभाच्या डोक्यात घातली. झालं…सगळं संपलं…कुदळीच्या एका फटक्यात बिचारी प्रतिभा रक्तबंबाळ होऊन जागीच गतप्राण झाली. तिची लहान लहान लेकरं भयभीत होऊन थरथर कापत उभा होत. अनिलही चांगलाच भानावर आला; पण वेळ निघून गेली होती. नियतीनं त्याच्या रक्तरंजित संसारातून बिचार्‍या प्रतिभाची सुटका केली होती. झाले…पोलिस आले, नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि नारायण सारंगकर यांनी गुन्ह्याचा तपास करून अनिलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
विशेष म्हणजे अनिलच्या दररोजच्या त्रासाला वैतागलेल्या सीतारामनं न्यायालयात आपल्या पोटच्या पोराविरुद्ध साक्ष दिली. पाठचा भाऊ सुनीलनेही कोर्टात अनिलच्या पापाचा पाढा वाचला आणि अनिलला जन्मठेपेची शिक्षा झाली. लग्न केल्यावर आपला मुलगा सुधारेल म्हणून सीतारामनं एका निष्पाप आणि निरागस पोरीचा हात आपल्या दारूड्या पोराच्या हातात दिला. हा तळीराम तर सुधारलाच नाही; पण बिचार्‍या प्रतिभाच्या आयुष्याची त्यानं सगळी राखरांगोळी करून टाकली. सोबत तिच्या पोटच्या दोन कोवळ्या जीवांनाही अनाथ करून टाकले. मारूनमुटकून मोळी बांधलेल्या एका रक्तरंजित संसाराचा शेवट हा असा भयानक झाला. ( Crime Diary )
Latest Marathi News रक्तरंजित संसार! …अन् प्रतिभाच्या आयुष्याची झाली राखरांगोळी Brought to You By : Bharat Live News Media.