हृदयरोग्यांनी कोणते व्यायाम करावेत?
– डॉ. भारत लुणावत
हृदयविकार आहे, हे लक्षात आल्यानंतर माणूस धास्तावून जातो. त्याला काय करावे, हे सूचत नाही. अशा रुग्णांना डॉक्टरांकडून नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, काही जणांना नियमितरीत्या व्यायाम करण्यासाठी वेळच मिळत नाही, असे दिसते. अशा व्यक्तींना घरच्या घरीही व्यायाम करता येईल, यासाठीचे मार्गदर्शन…
* वॉर्मअप ः वॉर्मअपने आपल्या व्यायाम प्रकारांची सुरुवात करा. वॉर्मअपमुळे शरीर व्यायामासाठी सज्ज होते. रात्रभर झोपल्यामुळे शरीराचे अनेक अवयव, स्नायू सैलावलेल्या अवस्थेत असतात. वॉर्मअपमुळे हे स्नायू, अवयव व्यायामासाठी तयार होतात.
* लहान मुलांप्रमाणे उडी मारून आपले पाय, हात, खांदे शरीरापासून लांब करा. पुन्हा उडी मारून हात डोक्याच्या वर न्या. हात खाली आणताना पुन्हा पाय जुळवा. हा व्यायाम प्रकार आपण शाळेत शारीरिक शिक्षणाच्या तासाला अनुभवला असेल. हळूहळू या व्यायामाची वेळ वाढवा.
* लॅटरल जंप ः हा व्यायाम प्रकारही हृदयाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. यात ताठ उभे राहून पाय गुडघ्यात वाकवावेत. प्लास्टिकच्या स्टुलासारखी वस्तू आपल्या शरीराला समांतर अशी ठेवावी. या वस्तूवर गुडघे वाकविलेल्या स्थितीत उडी मारावी आणि तेथून पुन्हा त्याच पद्धतीने जमिनीवर उडी मारावी.
* स्क्वॅट ः हा व्यायाम करताना जमिनीवर पाय रोवून उभे राहा. टाच उचलली जाणार नाही याची काळजी घ्यावी. हात समोरच्या दिशेने सरळ करून गुडघे वाकवावेत. यावेळी पाठ ताठ राहिली याची काळजी घ्या. या स्थितीत वजन उचलण्याचा व्यायामही केला जातो.
* हातात डंबेल्स (आवश्यकता असेल तर) घेऊन ताठ उभे राहा. आपला उजवा पाय पुढे नेऊन गुडघा वाकवा. याचवेळी डावा पाय गुडघ्यात वाकवा. दोन्ही गुडघे 90 अंशात वाकले जातील याकडे लक्ष द्या. नंतर डावा पाय पुढे नेऊन अशाच पद्धतीने शरीराची स्थिती करा. यावेळी पाठ आणि कंबर ताठ राहील याकडे लक्ष ठेवा.
जागच्या जागी उभे राहून पळण्याचा व्यायामही करता येतो. या व्यायामामुळे आपले उष्मांक मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतात. ज्याप्रमाणे ट्रेडमिलवर आपण पळतो त्याच पद्धतीने हा व्यायाम करा. पायर्यांचा चढ-उतारही उतारवयात फायदेशीर ठरतो. पण, यासाठी शारीरिक स्थिती विचारात घेणे गरजेचे आहे.
* याखेरीज शाळेत असताना शिक्षकांकडून वर्गाबाहेर अंगठे पकडण्याची केली जाणारी शिक्षा आठवते आहे का? अगदी त्याच पद्धतीने हा व्यायाम करता येतो. ताठ उभे राहा. आता आपले डोके जमिनीच्या दिशेने हळूहळू खाली न्या. कंबरेत जितके वाकता येईल तितके वाकण्याचा प्रयत्न करा. असे वाकून पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. असे करत असताना गुडघे वाकले जाणार नाहीत याची काळजी घ्या. दुसर्या पद्धतीने हाच व्यायाम करता येतो. जमिनीवर पाय सरळ करून बसा. आता आपले डोके खालच्या दिशेने वाकवत न्या. हात सरळ पायाच्या दिशेने नेत, पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. शरीर लवचिक नसल्यामुळे प्रारंभी आपल्याला वाकणे कठीण जाते. मात्र, सरावाने अशा पद्धतीने आपल्याला पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करता येऊ लागतो.
याखेरीज आपल्याला अत्यंत आवडणारे गाणे लावा. या गाण्यावर मुक्तशैलीने नृत्य करण्यास चालू करा. पंधरा ते वीस मिनिटे अशा पद्धतीने नृत्य केल्यास शरीराला चांगला व्यायाम मिळतो. आपले उष्मांक जळण्यास मदत होते. याचबरोबर आपली मन:स्थिती चांगली होण्यासही मदत होते.
Latest Marathi News हृदयरोग्यांनी कोणते व्यायाम करावेत? Brought to You By : Bharat Live News Media.