वापरा आणि फेका हीच भाजपची वृत्ती!; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
मुंबई: Bharat Live News Media वृत्तसेवा : वापरा आणि फेकून द्या… काम झाले की फेकून द्यायचे ही भाजपाची वृत्ती आहे. या वृत्तीचा आम्हालाही फटका बसला आहे. त्यामुळे त्याविरोधात आम्ही लढायला उभे राहिलो असून जनमताचा प्रवाह फिरला की, मोठमोठे ओंडकेही वाहून जातात. भाजपाची अवस्थाही अशीच होणार आहे, असा घणाघाती हल्ला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
जळगावमधील भाजपचे खासदार उन्मेष पाटील आणि पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी बुधवारी आपल्या समर्थकांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या वापरा आणि फेकून द्या वृत्तीचा समाचार घेतला. भाजप वाढवण्यासाठी पाटील यांनी अतोनात मेहनत केली, तशीच शिवसैनिकांनीही मेहनत केली. परंतु, वापरा आणि फेकून द्या, ही भाजपची वृत्ती आहे. त्यांच्या पक्षातील कट्टर, निष्ठावंत, पक्ष रुजविण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यांनाही फेकून देण्याचे धोरण भाजपाने अवलंबिले आहे. त्याविरूद्ध त्यांच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्यांने असंख्य सोबत्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. पण यालाच खरे बंड म्हणतात. आमच्या पक्षाशी झाली होती ती गद्दारी होती.
प्रकाश आंबेडकरांनी जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नये
प्रकाश आंबेडकरांच्या आजोबांचा आणि माझ्या आजोबांचा ऋणानुबंध होता. त्याला जागून आम्ही हुकूमशाहीविरोधात एकत्र आलो होतो. पण आज त्यांचे आणि आमचे जमले नसले तरी भविष्यात जमणारच नाही, अशी भूमिका त्यांनी घेऊ नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना केले. आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. पण त्यात काही तथ्य नव्हते, असे सांगत आंबेडकर हे काहीही बोलले तरी आम्ही त्यांच्याविरोधात बोलणार नसल्याचे स्पष्ट केले.
सांगलीत मैत्रीपूर्ण लढत नाही
सांगली मतदारसंघ काँग्रेसला मिळाला नसल्याने स्थानिक नेत्यांकडून मैत्रीपूर्ण लढत करण्याचे सांगितले जात आहे. त्याबद्दल विचारले असता उद्धव ठाकरे यांनी मैत्रीपूर्ण लढत फेटाळून लावली.म्हणाले सांगलीमध्ये प्रचाराला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसनेही वेळ न दवडता ठरल्याप्रमाणे काम सुरु करण्याची आवश्यकता आहे.
मशालीची धग गावागावांत नेणार ः उन्मेष पाटील
राजकारण करताना आमदार, खासदार या पदांसाठी कधीही काम केले नाही. ही पदे साधन असून लोकांसाठी त्याचा फायदा होईल, या हेतूनेच काम करत होतो. आता खासदारकीचे तिकीट मिळाले नाही म्हणून पक्ष सोडलेला नाही. तर आपण केलेल्या विकासाची किंमत भाजपला नाही, माझी सतत अवहेलना केली अशी खंत उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली.
बदल करण्यासाठी काम करत असून बदला घेण्यासाठी काम करत नाही. मात्र, सध्या सुरू असलेल्या बदल्याच्या राजकारणाने आपण व्यथीत होत आहोत, असे पाटील म्हणाले. माझी लढाई पदासाठी नसून आत्मसन्मानासाठी आहे, यामुळे सहकार्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. आता शिवसेनेच्या मशालीची धग गावागावापर्यंत नेत विकासाचे राजकारण करणार आहे, असा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.
Latest Marathi News वापरा आणि फेका हीच भाजपची वृत्ती!; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल Brought to You By : Bharat Live News Media.