अबोली मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग यांची एन्ट्री
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहची अबोली मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अबोलीच्या वडिलांनी म्हणजेच प्रतापरावांनी मनवावर अतिप्रसंग केला. या धक्कादायक प्रसंगामुळे मनवा खचून गेलीय. (Aboli TV Serial ) मनवाच्या या कठीण प्रसंगात अबोली तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. मनवावर झालेल्या अतिप्रसंगानंतर अबोलीने तिला न्याय मिळवून द्यायचाच असं ठाम ठरवलं आहे. यासाठी ती वडिलांच्याही विरोधात जाणार आहे. मनवाच्या बाजूने ती कोर्टात वडिलांच्या विरोधात केस लढणार आहे. (Aboli TV Serial )
वडिलांना त्यांनी केलेल्या पापाची शिक्षा मिळावी म्हणून अबोलीने अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतलाय.
अबोलीचा हा प्रवास वाटतो तितका मात्र सोपा नाही. प्रसिद्ध वकील देवदत्त खांडेकर अबोलीच्या विरोधात उभे ठाकले आहेत. प्रतापरावांच्या बाजूने केस लढून ते अबोलीला नवं आव्हान देणार आहेत. देवदत्त खांडेकर अत्यंत नामांकित वकील आहेत. आजवर एकही केस ते हरलेले नाहीत. त्यामुळे ही केसही आपणच जिंकणार याचा त्यांना ठाम विश्वास आहे. केस जिंकण्यासाठी ते कोणतीही गोष्ट करु शकतात. सामोपचाराने गोष्टी होत नसतील तर पैसे देऊन केस मागे घ्यायला लावायची यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. मनवालाही पैसे देऊन गप्प करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र अबोली त्यांचा हा डाव उधळून लावणार आहे. त्यामुळे आता महाभारत कोर्टात घडणार असं ठमकावून सांगत अबोलीने देवदत्त खांडेकरांचं आव्हान स्वीकारलं आहे.
ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग वकील देवदत्त खांडेकरांच्या भूमिकेत दिसणार आहेत. खलनायकाची भूमिका म्हटलं की, अनंत जोग यांचं नाव आपसुकच डोळ्यासमोर येतं. अनंत जोग यांनी आजवर अनेक हिंदी मराठी मालिका, सिनेमे, वेबसीरिजच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन केलं आहे. अबोली मालिकेत ते साकारत असलेलं वकील देवदत्त खांडेकर हे पात्र देखील मालिकेत नवी उलथापालथ घडवणार आहे. अबोली रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.
Latest Marathi News अबोली मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग यांची एन्ट्री Brought to You By : Bharat Live News Media.