हिंगोली; Bharat Live News Media वृत्तसेवा : हिंगोली लोकसभा मतदार संघातून शिंदे सेनेचे हेमंत पाटील यांना बदलण्यात यावे अशी मागणी भाजपच्या पदाधिकार्यांनी केल्यानंतर शिंदे गटाच्या पक्षश्रेष्ठींवर दबाव वाढला आहे. त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबुराव कदम कोहळीकर, डॉ. अंकूश देवसरकर यांच्या नावावर शिंदे सेनेच्या पक्षश्रेष्ठींकडून विचार केला जात आहे. दोघांपैकी एकाच्या नावावर दोन दिवसात एकमत होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपच्या दबावाला शिंदे सेना जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसात भाजप नेमकी काय भुमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
हिंगोली लोकसभेची जागा महायुतीमधून शिंदेसेनेला सोडल्यानंतर भाजपतून नाराजीचा सुर उमटू लागला होता. त्यातच विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहिर केल्यावर नाराजी अधिकच तिव्र झाली. या संदर्भात भाजपच्या रविवारी झालेल्या बैठकीमध्ये विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी नकोच असा सूर आळवल्या गेल्या. कमळ चालेल, धनुष्यबाणही चालेल पण हेमंत पाटील नको असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
मागील पाच वर्षात विद्यमान खासदार पाटील यांनी विकास कामे केली नाहीत, मतदारांशी संपर्क ठेवला नसल्याचा आरोप भाजपच्याच पदाधिकार्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला आहे. त्यामुळे शिंदेसेनेवर उमेदवार बदलण्यासाठी मोठा दबाव येऊ लागला आहे. त्यामुळे आता शिंदेसेनेकडून उमेदवार बदलण्याच्या हलचाली युध्दपातळीवर सुरु झाल्या आहेत. सध्या शिंदेसेनेकडून नांदेड जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, डॉ. अंकूश देवसरकर यांचे नांव आघाडीवर आहे. हदगाव विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणुक लढविलेले कोहळीकर दुसर्या स्थानावर होते. हिंगोली लोकसभेसाठी शिंदेसेनेकडून उमेदवारीची माळ कोहळीकर किंवा डॉ. देवसरकर यांच्या गळ्यात पडणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
भाजपचे शिष्टमंडळ आल्या पावली परतले
सोमवारी भाजपच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सायंकाळी पाचच्या सुमारास नांदेड येथील विमानतळावर भेट घेऊन हिंगोली लोकसभेची जागा भाजपला सोडावी किंवा उमेदवार बदलावा अशी मागणी केली. परंतू फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात भाजपला जागा सोडता येणार नाही. ती शिवसेनेचीच जागा आहे असे सांगितल्याने भाजपचे शिष्टमंडळ गेल्या पावली परत आले. रविवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भुमिका घेत शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याची मागणी केली होती. परंतू सोमवारी थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच हिंगोलीबाबत स्पष्ट शब्दात शिष्टमंडळाच्या सदस्यांना सांगितल्याने आता हेमंत पाटील किंवा कोहळीकर या दोन्हीपैकी एक उमेदवार निश्चित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिंदे गट करणार भाजपची कोंडी
हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबुराव कदम यांना उमेदवारी देऊन भाजपला तोंडघशी पाडण्याचा डाव टाकण्याच्या तयारीत शिंदे गट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपची कोंडी होणार असल्याचे बोलले जात आहे. पाटील यांनी मराठा आरक्षणाची उघड भुमिका घेऊन राजीनामा दिल्याने ते भाजप पक्षश्रेष्ठींच्या डोळ्यात सलत होते. एवढेच काय तर त्यांनी दिल्लीत उपोषणही केले. मात्र भाजपचा विरोध डावलून शिंदे सेनेने हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांचा तिळपापड झाला होता. आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपला हिंगोली लोकसभा मतदार संघ सोडणे शक्य नसल्याचे सांगितल्याने ऐनवेळी उमेदवार बदलला तरी भाजपच्या मंडळांना शिंदे सेनेचे काम करावे लागणार आहे. जर दगाफटका झाल्यास भाजपच्या आमदारांची विधानसभेची उमेदवारी धोक्यात येण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे.
Latest Marathi News हिंगोलीत शिंदे सेनेकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली? ‘या’ नवीन नावांची जोरदार चर्चा Brought to You By : Bharat Live News Media.
हिंगोलीत शिंदे सेनेकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली? ‘या’ नवीन नावांची जोरदार चर्चा