असे वक्ते अशा सभा
– सुनील माळी
बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा म्हणजे धमाल होती. सभास्थानी उशिरा म्हणजे सभा सुरू झाल्यानंतर थोड्या वेळाने आगमन… तोपर्यंतची बॅटिंग अन्य नेतेगणांनी सुरू केलेली असायची… बाळासाहेब आले की बोलत असलेला आपली विनिंग संपवून पॅव्हेलियनमध्ये निमूट परत जाई… व्यासपीठावर बाळासाहेब आले की, या कोपर्यापासून त्या कोपर्यापर्यंत हात वर करून नमस्कार… समोरून बेभानपणे ‘हिंदुहृदयसम्राट, माननीय…’ अशी खडी ताजीम अन् त्याला तुतार्यांची साथ… फटाके वाजू लागत ते बाळासाहेब माईक हाती घेऊन बोलायला लागेपर्यंत वाजतच राहात… मग फटाक्यांचा आवाज संपण्याची वाट दस्तुरखुद्द बाळासाहेबच पाहात… अखेरीस कृतक् (म्हणजे खोट्या) कोपाने (म्हणजे रागाने) म्हणत ‘आता तुझं वाजवणं थांबवलं नाही तर मी माझं तोंड वाजवणार नाही… बोल, तू वाजवतो का मी वाजवू?…’ मग चिडीचूप आणि सभा सुरू… सभेत राजीव गांधी, शरद पवार अशा अनेक नेत्यांच्या नकला… बिनधास्त कॉमेंटस्… पवारांबाबत बोलताना ‘हे कोण? मैद्याचं पोतं…’ असं म्हणून चालूनही दाखवणं… कधी चक्क बसकण मारून दाखवणं… हशा-टाळ्यांची गणनाच नाही. अर्थात, सगळ्याच कॉमेंटस् छापता येत नसत. पण पत्रकारांच्या कक्षातूनही हास्याचे फवारे उडत. लिंगडोह नावाच्या निवडणूक आयुक्तांवर टीका करताना त्यांच्या नावावरून बाळासाहेब जी वाक्ये उच्चारीत, ती छापताना फुल्याफुल्यांचा वापर करावा लागे; पण त्यांनी ती वाक्ये उच्चारली की मग सारे मैदान हास्यकल्लोळात बुडून जाई. “मी काही मुस्लिमविरोधी नाही… देशप्रेमी मुसलमान मला हवेच आहेत. पण पाकड्यांना धार्जिण्या असलेल्या मुसलमानांना माझा विरोध आहे, मी त्यांना सहन करणार नाही…” अशी हमखास टाळ्यांची वाक्यं त्यांच्याकडून यायची.
बाळासाहेब ठाकरे यांच्या आरोपांना, विनोदी शैलीतल्या फटकार्यांना शरद पवार त्यांच्या पद्धतीने उत्तर देत. त्यावेळी शरद पवार संपूर्णपणे तंदुरुस्त आणि अस्खलित बोलू शकणार्या अशा तरुण वयात होते. “हे आमचे श्रीमंत बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे मुख्यमंत्री मनोहर जोशी शेतीविषयी बोलतात… यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीखाली येतात का वर येतात, हे माहिती नाही, पण ते शेतीच्या प्रश्नांवर बोलतात…” अशा पद्धतीचे प्रत्युत्तर शरद पवार देत.
गाडगीळ घराण्याचे काँग्रेस पक्षाशी अनेक पिढ्यांचे नाते. देशातल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत नरहर विष्णू म्हणजेच न. वि. म्हणजेच काकासाहेब गाडगीळ काँग्रेसकडून पुण्यातून निवडून आले आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ तब्बल तीनदा पुण्यातून लोकसभेवर गेले. केंद्रीय मंत्री तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून त्यांनी केलेल्या कामाने ते लोकप्रिय जसे ठरले तसेच त्यांच्या मुद्देसूद, ठाशीव वक्तृत्वाने संसदेबरोबरच अनेक निवडणूक सभाही गाजल्या.
लोकसभेच्या निवडणुकीत गाडगीळ एका म्हातारीची गोष्ट सांगत… “एका गावात म्हातारी राहात होती. तिच्या घरासमोर आंब्याचे झाड होते. त्यावरचे आंबे टारगट पोरे चोरत. त्यामुळे तिला आंबा खायला मिळायचा नाही. तिने देवाची प्रार्थना केली, देव प्रसन्न झाला. ‘जो कुणी आंबा काढायला झाडावर चढेल तो चिकटेल आणि मी सोडा म्हणेपर्यंत तो सुटणार नाही’, असा वर तिने मागितला. ती म्हातारी 139 वर्षांची झाली. शेवटी तिचे प्राण घ्यायला यमराज आले. माझ्या झाडाचा आंबा मला खाऊ दे, अशी शेवटची इच्छा तिने व्यक्त केली. यमराज झाडावर चढले आणि चिकटून बसले. त्यानंतर आतापर्यंत ती म्हातारी जिवंत आहे. तिचे नाव आहे इंडियन नॅशनल काँग्रेस. कोणी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणेपर्यंत ही म्हातारी म्हणजे काँग्रेस जिवंत राहणार आहे…” विठ्ठलरावांच्या त्या गोष्टीला काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबरच मतदारांचीही दाद मिळे… वर्षे उलटत गेली… ती म्हातारी आणखी जख्ख झाली आहे. पण तिची हालचाल खूपच मंदावली आहे…
विठ्ठलरावांच्या म्हणण्याप्रमाणे ती जिवंत मात्र आहे…
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील ‘मुंबई-बेळगाव-कारवार-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या घोषणेस आक्षेप घेताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी “तुम्ही झाला पाहिजे असं न म्हणता झालाच पाहिजे, असं का म्हणता?” अशी विचारणा केली. त्यावर आपल्या आक्रमक शैलीत अत्र्यांनी “चव्हाणसाहेब, ‘च’ ला खूप महत्त्व आहे, तुमच्या नावातला ‘च’ काढला तर काय उरेल?” हे दिलेले प्रत्युत्तर त्यानंतर इतकी दशके लोटली तरी महाराष्ट्र विसरलेला नाही. कोकणातल्या राजापूरमधून निवडून येणार्या मधु दंडवते यांची अभ्यासपूर्ण पण तितकीच लालित्यपूर्ण व्याख्याने ज्यांनी ऐकली, त्यांना आताच्या काळातले काही मोजके अपवाद सोडले तर इतरांच्या सभा ऐकवणार नाहीत.‘पुलं’सारखे साहित्यिक तसेच अनेक दिग्गज नेते यांच्या उपस्थितीत आणीबाणीनंतर पुण्यात झालेल्या सभेत प्रभाकर पाध्ये यांनी “बाईंनी पाप केलंय… त्याची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी”, असा त्यांच्या चिरक्या आवाजात केलेला आक्रोश अनेकांच्या अजून स्मरणात असेल…
Latest Marathi News असे वक्ते अशा सभा Brought to You By : Bharat Live News Media.