शोध सुखाचा! : सोडून द्या!

दोन व्यक्ती जेव्हा संभाषण करत असतात, तेव्हा त्यांच्या संभाषणात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अशा तीनही गोष्टी असतात. म्हणजेच समजा, दोन तरुण त्यांच्या नोकरीसंबंधी बोलत असताना पूर्वीची नोकरी, तिथले अनुभव, सध्याचे काम, तिथल्या सोयी-गैरसोयी, पुढे चांगले पैसे देणारी नवी नोकरी मिळण्याची संधी, असं तिन्ही काळाबद्दल बोलत असतात. या संभाषणात भूतकाळात आलेला एखादा वाईट अनुभव अजूनही स्मरणात … The post शोध सुखाचा! : सोडून द्या! appeared first on पुढारी.

शोध सुखाचा! : सोडून द्या!

सुजाता पेंडसे

दोन व्यक्ती जेव्हा संभाषण करत असतात, तेव्हा त्यांच्या संभाषणात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अशा तीनही गोष्टी असतात. म्हणजेच समजा, दोन तरुण त्यांच्या नोकरीसंबंधी बोलत असताना पूर्वीची नोकरी, तिथले अनुभव, सध्याचे काम, तिथल्या सोयी-गैरसोयी, पुढे चांगले पैसे देणारी नवी नोकरी मिळण्याची संधी, असं तिन्ही काळाबद्दल बोलत असतात. या संभाषणात भूतकाळात आलेला एखादा वाईट अनुभव अजूनही स्मरणात राहून दुखणार्‍या नसेसारखा ठसठसत असतो. म्हणजे सध्याची नोकरी मिळून काही वर्षे झाली तरी जुन्या गोष्टी उगाळणं काही संपत नाही. असं अनेकांचं अनेक बाबतीत होतं. माणसं भूतकाळ विसरतच नाहीत. कारण त्या काळात घडलेल्या घटनेचे बरे-वाईट परिणाम त्यांनी भोगलेले असतात. खरं तर एखाद्या संकटातून माणसाने काही तरी शिकणे गरजेचे असते. पण त्यापेक्षा जास्त पुन्हा पुन्हा त्या आठवणी काढून दु:ख उगाळले जात असते. ‘कोळसा उगाळावा तेवढा काळाच!’ या म्हणीप्रमाणे दु:खद आठवण कितीही वेळा काढली तरी त्याने कधी सुख मिळत नाहीच; उलट त्या प्रसंगाने त्याच्याशी जोडल्या गेलेल्या भावनांचा मनात पुन्हा उद्रेक होतो. परिणामी माणूस अस्वस्थ होतो, अशांत होतो.
तुम्हीही स्वत:कडे या द़ृष्टिकोनातून एकदा पाहाच. आपण कुणाशी काय काय बोललो, बोलतो, ते आठवून बघा. वर सांगितलेल्या गोष्टीसारखे तुम्ही एकदा किंवा कितीदाही वागलेले असता. पण आता एक गोष्ट नक्की करा. भूतकाळाची उजळणी करायची नाही, हा निश्चय करा. जर आठवण करायची असेल तर चांगल्याची ठेवा. तुम्ही म्हणाल, असं कसं शक्य आहे? वाईट गोष्टी तर आधी आठवतात, हा माणसाचा विचारधर्मच आहे. मग काय करायचं? तर त्या अनुभवाकडे साक्षी भावनेने पाहायचं. म्हणजे तटस्थ किंवा अलिप्त होऊन त्याकडे पाहायचं.
एक उदाहरण घेऊया. एक 25-26 वर्षाचा तरुण नेहमी वैतागलेला असे. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. आई मोलमजुरीची कामे करायची. वडील त्याच्या लहानपणीच आईला सोडून दुसर्‍या बाईशी लग्न करून गेले. आईने दोन्ही मुलांना शिक्षण दिलं. शक्य तेवढं सगळं केलं. मुलीचं लग्न झालं. मुलगा आणि आई भाड्याच्या घरात राहात. पैसे पुरत नाहीत, म्हणून तो सतत चिडचिड करायचा. एक दिवस त्यानं आईशीच भांडण काढलं. म्हणाला, “बाप गेला निघून आणि तुम्ही दोघांनी साधं घरसुद्धा ठेवलं नाही मला. काय केलंय तुम्ही आमच्यासाठी?” आई बिचारी गप्प ऐकत राहिली. मूकपणे रडत राहिली. तिनं अक्षरश: काबाडकष्ट करून, स्वत:ची जराही हौसमौज न करता मुलांसाठीच सगळं केलं होतं. पण मुलगा दरवेळी काही झालं की तीच टेप वाजवायचा. निघून गेलेल्या बापाच्या नावानं शिव्याशाप घालायचा. त्याचा संताप व्हायचा दरवेळी.
एकदा तो त्याच्या साहेबांशी बोलताना असाच भडकून वैतागून बोलू लागला, तेव्हा त्याच्या साहेबांनी त्याला थांबवलं आणि विचारलं, तू दरवेळी बापाला आणि आईला का दोष देतोस? तो म्हणाला, त्यांनीच तर नुकसान केलंय. साहेब म्हणाले, अरे, तुझा बाप तुला तू पाच वर्षांचा असताना सोडून गेलाय. त्या घटनेला वीस वर्षे होऊन गेली. आता तुझं शिक्षण पूर्ण झालंय. तू ही परिस्थिती बदलण्यासाठी काय धडपड केलीस ते सांग. जी घटना बदलणं शक्य नाही, तीच आठवून तू तुझा वर्तमान खराब करतोच आहेस. पण भविष्यकाळही बिघडवतोस. समजतंय का काही? नीट विचार कर. जे घडलं ते घडलं. ते सोडून दे आता. वीस वर्षे त्याला कवटाळून स्वत:ला किती दु:खी करशील? जागा हो. वर्तमानात जग. सगळे प्रयत्न कर. ही परिस्थितीही बदलेल. मी आहे तुझ्या सोबत. पण जुनं गाठोडं फेकून देणार असशील तरच.
त्या तरुणाला एकदम भानावर आल्यासारखं वाटलं. त्याला हे पटलं देखील. त्यानं वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं आणि मग त्याची बरीचशी कुरकूर बंद झाली.
असं वर्तमानात जगणं शिकलं पाहिजे. म्हणजे काय तर आत्ता आपण काय करतो आहोत, त्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेणं आणि मानणं दोन्ही शिकायला हवं. कोणतीही कृती करताना मनाला ‘त्याच’ क्षणात गुंतवून ठेवणं हे जितकं सोपं वाटतं, तितकं मुळीच नाही. उदा. तुम्ही एखादे पुस्तक वाचत आहात, तर पुस्तक वाचतानाही अनेक विचार मनात येत-जात असतात किंवा ऑफिसमध्ये काम करत असताना मनात काही वेगवेगळं सुरू असतं. ‘आज मुलाच्या स्कूलमध्ये जायचंय’, ‘मुलगा हल्ली अभ्यासच करत नाही’ इथपासून ते पार ‘आता निवडणुका जवळ आल्यात, राजकारणात केवढी उलथापालथ चाललीय’… असे कोणतेही विचार येतात. मनाला आहे त्याच आणि त्याच कामात गुंतवलं की एकाग्रता वाढते आणि काम अचूक होतं.
योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडेंनी एक साधीशी गोष्ट सांगितली होती की, जेव्हा तुम्ही चालत असता तेव्हा तुमचं लक्ष समोरचा रस्ता आणि पावलं इथ केंद्रित असायला हवं. पण ते नसतं. म्हणून पावलांना ठेच लागते. यावरून समजलं असेल की, भटकणार्‍या मनाला वर्तमानात त्या क्षणात गुंतवणं किती महत्त्वाचं आहे. हे सुद्धा एक तंत्र आहे. त्यासाठी मेडिटेशन करायला हवे. ‘ध्यान’ म्हणतात इतके पुढे जायला वेळ लागतो. पण एक सराव जरूर करा. शांतपणे सुखासनात बसा. डोळे मिटून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. डोळे उघडे ठेवले तर ते सतत काहीतरी पाहून मेंदूला माहिती पुरवत राहतात. म्हणून डोळे मिटणं गरजेचं. डोळे मिटले तरी सुरुवातीला इतके विचार धावून येतात की, आपल्याला हे मेडिटेशन वगैरे काही जमणं शक्यच नाही, असं वाटेल. पण तरी करत राहा. एके ठिकाणी डोळे मिटून बसणं, हीसुद्धा पहिली पायरीच आहे. नंतर मनात जे विचार येत जातील, त्यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. मग तो विचार जातो. मग दुसरा विचार. त्यालाही पहिल्यासारखेच ट्रीट करायचे. नाहीतर एकाग्रता होणार नाही. हळूहळू त्या विचारांकडे दुर्लक्ष करत येणार्‍या-जाणार्‍या श्वासावर लक्ष केंद्रित होते आणि मग तुम्ही वर्तमानातल्या क्षणावर स्थिर होऊ लागताच.
हे जमू लागलं की, त्याचा उपयोग आपल्या प्रत्येक कृतीत करायचा. म्हणजे अगदी भाजी चिरण्यापासून, एखादी अवघड परीक्षा देणं, अशा प्रत्येक ठिकाणी त्या त्या कृतीपुरती एकाग्रता साधते. जुनं – नकोसं आहे, ते सगळं पूर्णपणे सोडून द्या आणि मग बघा, मनावरचं किती ओझं कमी झाल्यासारखं वाटेल. एक दीर्घ… मोकळा श्वास घेऊन पुढच्या कामाला लागाल, तेही आनंदानं.
Latest Marathi News शोध सुखाचा! : सोडून द्या! Brought to You By : Bharat Live News Media.