‘च्यवनप्राश’मधील रिद्धी, सिद्धी, वृद्धीसह ७ औषधी दुर्मीळ!
पुणे : आशिष देशमुख
ऋषी-मुनींनी चिरतरुण राहण्यासाठी संशोधित केलेल्या ‘च्यवनप्राश’मधील रिद्धी, सिद्धी आणि वृद्धीसह एकूण सात प्रकारच्या प्राचीन आयुर्वेदिक वनस्पती दुर्मीळ झाल्या आहेत. त्यामुळे आयुष मंत्रालयासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या समितीने त्याच वनस्पती ‘च्यवनप्राश’साठी सुयोग्य असून, त्याला दुसरा पर्याय असू शकत नाही, असे उत्तर देत त्या दुर्मीळ वनस्पतींची लागवड सुचवली आहे.
‘च्यवनप्राश’ हे भारतीय आयुर्वेदाने दिलेले एक वरदान आहे. प्रत्येक घरात ते शक्तिवर्धक म्हणून आजही घेतले जाते. यात ज्या सात वनस्पती आहेत, त्या सर्व ऑर्किड या प्रकारात मोडतात. त्या दुर्मीळ झाल्याने आयुष मंत्रालयाने तज्ज्ञांची समिती नेमून त्यांना याऐवजी दुसर्या वनस्पतींचा पर्याय सुचवण्यास सांगितले. मात्र, ‘ऑर्किड सोसायटी ऑफ इंडिया’ने उत्तर दिले की, याला पर्याय असूच शकत नाही. त्याच वनस्पतींची पुन्हा लागवड करावी लागेल. तेव्हाच ‘च्यवनप्राश’ची जादू टिकेल. त्यामुळे ‘च्यवनप्राश’मधील रिद्धी, सिद्धी आणि वृद्धीसह एकूण सात वनस्पतींची लागवड करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.
चिरतरुण ठेवणार्या वनस्पती
‘च्यवनप्राश’ हे एक आयुर्वेदिक आरोग्यपूरक आहे, जे पौष्टिक-समृद्ध औषधी वनस्पती आणि खनिजांच्या मिश्रणाने बनवले जाते. याला ऋषी-मुनींनी जीवनशक्ती (ओजस) असे नाव दिले असून, ते मनुष्याला वृद्ध न होऊ देता चिरतरुण ठेवते, असेही वर्णन आयुर्वेदात आढळते. यात सुमारे 50 औषधी वनस्पती आणि त्यांच्या अर्कांवर प्रक्रिया केली जाते. आवळा हा व्हिटॅमिन ‘क’ जीवनसत्त्वाचा मोठा स्रोत आहे. त्यात सात प्रकारच्या ऑर्किड वनस्पतींचा अर्क आहे.
च्यवन हे ऋषींचे नाव
च्यवन हा शब्द एका ऋषींच्या नावापासून तयार झाला आहे, तर प्राश म्हणजे औषध. च्यवन ऋषींनी तयार केले औषध म्हणून ‘च्यवनप्राश’ अशी व्याख्या आयुर्वेदात आहे. सर्वसमावेशक ‘मेटाबॉलिक’ टॉनिक म्हणून त्याचा भारतात प्रचंड खप आहे. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट सप्लिमेंटस् यात असल्याने ते अँटिएजिंग इफेक्टसाठी (चिरतरुण राहण्यासाठी) वापरले जाते. अकाली वृद्धत्व आलेल्या रुग्णांसाठी ऋषींनी हे तयार केले होते. तेव्हापासून भारतात त्याचा प्रसार झाला.
Chyavanprash
Latest Marathi News ‘च्यवनप्राश’मधील रिद्धी, सिद्धी, वृद्धीसह ७ औषधी दुर्मीळ! Brought to You By : Bharat Live News Media.