सन्मान : फिनलंड आनंदी का आहे?
श्रीराम ग. पचिंद्रे
जगातला सगळ्यात आनंदी देश म्हणून फिनलंड ह्या देशाची सलग सातव्यांदा निवड झालेली आहे. फिनलंडमधल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आपल्या राष्ट्राविषयी अविचल निष्ठा आहे, विलक्षण असं प्रेम आहे. फिनलंडला यशस्वी जीवन म्हणजे काय याची अधिक प्रगल्भ जाण आहे. तसेच फिनलंडमध्ये नागरिकांचे यश हे आर्थिक लाभाशी समतुल्य असण्याबरोबरच राष्ट्रीयत्वाच्या प्रखर जाणिवेशी संलग्न असते.
द ऑक्सफर्ड वेलबीईंग रिसर्च सेंटर, द यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्युशन्स नेटवर्क आणि वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट एडिटोरियल बोर्ड यांनी जगातील सर्व देशांतील नागरिकांचा अभ्यास करून सादर केलेल्या अहवालात जगातला सगळ्यात आनंदी देश म्हणून फिनलंड ह्या देशाची सलग सातव्यांदा निवड झालेली आहे. ह्या यादीत भारताचा क्रमांक 126 वा आहे.
रशिया आणि स्वीडन यांच्या सीमा फिनलंडनला लागून आहेत. हा देशच उत्तर ध्रुवाच्या जवळ आहे. तिथला हिवाळा म्हणजे बर्फवृष्टीचा. इथल्या हिवाळ्याला तोंड देणं हा इथला जीवनक्रम आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे पाच महिने बर्फ; मे महिन्याचा उत्तरार्ध, जून, जुलै, ऑगस्ट हा कालावधी उन्हाळ्याचा; सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हा कालावधी कडक थंडीचा. असं हे फिनलंडचं ऋतुचक्र.
हा देश काही काळ रशियाच्या, तर काही काळ स्वीडनच्या ताब्यात होता. स्वतःची इच्छा नसताना तो दुसर्या महायुद्धात ओढला गेला. पण त्याच काळात एक तह झाला आणि फिनलंड स्वतंत्र झाला. 1950 नंतर फिनलंडनं प्रगतीची गरुडझेप घेतली. निसर्गाच्या कुशीत राहणार्या फिनलंडमधल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आपल्या राष्ट्राविषयी अविचल निष्ठा आहे, विलक्षण असं प्रेम आहे. ‘हे राष्ट्र माझं आहे, माझं राष्ट्र स्वच्छ राहिलं पाहिजे, सुंदर राहिलं पाहिजे, प्रदूषणमुक्त राहिलं, निरोगी राहिलं पाहिजे’, अशी तीव्र भावना प्रत्येक फिनिश नागरिकाच्या मनात असते. त्यांच्याशी बोलताना शब्दाशब्दातून ती दरवळत असते. तिथला एकही नागरिक रस्त्यावर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कधीही थुंकत नाही.
प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, शिळे अन्नपदार्थ, पदार्थांची आवरणं, पालापाचोळा इत्यादी इत्यादी कोणत्याही प्रकारचा कचरा रस्त्यावर, रस्त्याकडेला किंवा सार्वजनिक ठिकाणी फेकला जात नाही. बहुसंख्य नागरिक आईस्क्रीम खाताना दिसतात; ती खाल्ल्यानंतर कागदाचे पेले किंवा इतर टाकाऊ वस्तू टाकण्यासाठी जागोजागी कचर्याचे डबे आहेत, तेही छान सजवलेले आहेत. जवळपास डबा नसला तरी ते लोक डबा मिळेपर्यंत कचरा हातात सांभाळतात आणि कचर्याच्या डब्यातच तो टाकतात. उघड्यावरचे उकिरडे कुठेच नाहीत. त्या प्रत्येक डब्यांमधला कचरा रोजच्या रोज महापालिकेमार्फत गोळा केला जातो. हेलेना हा कचरा प्रकल्प अत्यंत स्वच्छ आहे. सगळा कचरा तिथं रोजच्या रोज एकत्र होतो. ह्या प्रकल्पात ओल्या कचर्यापसून खत आणि सुक्या कचर्यापासून वीज बनवली जाते. नागरिकांच्या सगळ्या सोयी विजेवरच्या आहेत.
विद्युत शेगड्या, विद्युत जलोष्ण यंत्र हे सारे विजेवरच चालतं. हिवाळ्यामध्ये तापमान उणे तीस अंशापर्यंत खाली जातं. बर्फाच्या दिवसांत आणि बर्फ नसलं तरी कडक थंडीच्या दिवसांत उष्णता निर्माण करणारी यंत्रणा हे सगळं विजेवरच आहे. विजेवरच्या वाहनांसाठी प्रत्येक मॉलमध्ये तळघरात गाड्यांचे विद्युत ऊर्जाभरण (चार्जिंग) करण्याची व्यवस्था आहे. वाहन लावून खरेदी करून परत येईपर्यंत वीज भरून होते. तिथं यांत्रिकीकरणावर भर आहे. मानवी श्रम कमीत कमी उपयोगात आणले जातात. तिथल्या भव्य मॉल्समध्ये नावालासुद्धा केरकचरा नाही की अव्यवस्था नाही. सगळ्या वस्तू नीटनेटक्या मांडून ठेवलेल्या आणि ग्राहक मात्र तुरळक. तिथं ताजी ताजी कोंबडी मिळत नाही. सर्व काही – कोंबडी, बकरं, डुक्कर, गाय, बैल – कसलंही मांस असो, कत्तलखाने किंवा खाटक्याची दुकानं कुणालाही दिसत नाहीत. कारण ती आपल्यासारखी उघड्यावर नसतातच. सगळं मांस पॅकबंद असतं. एकदम ताजं मिळत नाही. प्रत्येक खोक्यावर कालबाह्यतेचा दिनांक (एक्स्पायरी डेट) छापलेला असतो. सर्व प्रकारच्या खाद्य- पेयांवर हे छापलेलं असतं.
दरडोई उत्पन्न, सकल राष्ट्रीय उत्पन्न, सामाजिक समतेचा पुरस्कार, निरोगी दीर्घायुष्य, व्यक्तिस्वातंत्र्य, औदार्य आणि भ्रष्टाचारविरहित राज्यकारभार यांसारख्या घटकांचा विचार करून ही अभ्यासपाहणी 143 देश आणि प्रदेशातील लोकांना त्यांच्या जीवनाचे शून्य ते 10 पर्यंत मूल्यमापन करण्यास सांगते. हा अहवाल 20 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय आनंददिनी प्रकाशित केला जातो. आरोग्याबाबतच्या मागील संशोधनात असे आढळून आले आहे की, बाल आणि किशोर वयात, मध्यम वयात येण्यापूर्वी आणि नंतर निवृत्तीनंतर पुन्हा वय वाढण्याआधीचा आनंद सर्वाधिक असतो. परंतु काही देशांमध्ये, वयोवृद्धांपेक्षा तरुण पिढी एकाकीपणाचं नैराश्य सांगताना दिसते, असं हा अहवाल नमूद करतो.
युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि अहवाल संपादक जॅन-इमॅन्युएल डी नेव्ह म्हणतात, विशेषत: उत्तर अमेरिकेतील प्रौढत्वाकडे झुकणार्या तरुणांना नैराश्याला तोंड द्यावे लागत आहे. तसेच त्यांनी अनेक पाश्चात्त्य राष्ट्रांमधील तरुणांच्यात नैराश्य आणि नकारात्मकता वाढत असल्याची नोंद केलेली आहे. समाजमाध्यमे, सामाजिक समस्यांचे वाढते प्रमाण आणि आर्थिक विषमता यामुळे तरुणांना आता स्वतःचं घर घेणंही कठीण झालेलं आहे.
परंतु फिनलंडमध्ये असं निराशादर्शक चित्र नाही. हेलसिंकी विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ डॉ. जेनिफर डी पाओला यांच्या मते, फिनिश नागरिकांचा निसर्गाशी अत्यंत निकटचा संबंध आहे. पर्यावरण रक्षणाची त्यांची जाणीव, त्यांचे निरोगी जीवन आणि प्रत्येक कामात आनंद मानण्याची त्यांची वृत्ती ह्या गोष्टी जागतिक पातळीवरील आनंदाच्या मूल्यांकनात श्रेष्ठ ठरलेल्या आहेत.
एकमेकावरील विश्वास आणि प्रगाढ सामंजस्य, स्वातंत्र्याच्या अधिकारांची आणि कर्तव्याची जाणीव आणि उच्च पातळीवरील स्वायत्ततेची भावना यांनी फिनिश नागरिकांची मने व्यापलेली आहेत. फिनलंडमधील कल्याणकारी लोकजीवन, नागरिकांचा राज्य प्राधिकरणावरील विश्वास, भ्रष्टाचाराचा अत्यंत कमी असलेला स्तर, मोफत आरोग्यसेवा आणि जगातील सर्वश्रेष्ठ दर्जाचे शिक्षण हे राष्ट्राला जगातील सर्वाधिक आनंदी बनवण्यास कारणीभूत ठरलेले घटक आहते, असं डॉ. जेनिफर म्हणतात.
फिनिश नागरिकांच्यात राष्ट्रीयत्वाची प्रखर जाणीव असल्याचं नेहमीच प्रत्ययास येतं. वाहतुकीचा कोणताही नियम ते मोडत नाहीत. रस्त्यावर एकही वाहतूक पोलिस नसतो. पण कुणीही सिग्नल तोडत नाही. चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेक करत नाही. सायकलस्वारांची संख्या मोठी आहे आणि ते त्यांच्यासाठी आखून दिलेल्या मार्गानंच सायकल चालवतात आणि सायकलस्वारांच्या वाटेत कुणी चारचाकी गाडी नेतही नाही. अरण्यमय प्रदेशातील वाटांवरून कोणतीही स्वयंचलित वाहनं न्यायला बंदी आहे. फक्त सायकलस्वार जाऊ शकतात. जिथं झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखलेले आहेत, त्यावरूनच रस्ता ओलांडला जातो. लोक त्यांच्या ठरलेल्या पदपथावरून चालत जात असताना त्यांंना रस्ता ओलांडायचा असेल आणि झेब्रा क्रॉसिंग लांब अंतरावर असेल, तर ते तिथपर्यंत चालत जाऊन मगच रस्ता ओलांडतात. जवळ पडते आणि रस्त्यावर एकही वाहन नाही, म्हणून झेब्रा क्रॉसिंग नसेल, तर लोक रस्ता ओलांडत नाहीत. तिथं पादचार्यांना खूप महत्त्व आहे. माणूस झेब्रा क्रॉसिंगवरून जात असेल आणि वाहने आली, तरी ती जागीच थांबून पादचार्याला आधी जाऊ देतात आणि मग आपण गाडी पुढे नेतात. रस्त्यावर एकाही वाहनाचा हॉर्न ऐकू येत नाही. कारण हॉर्न वाजवण्याची आवश्यकताच वाटत नाही. शिवाय ध्वनिप्रदूषणही टाळण्याकडे त्यांचा कल असतो. ते एकमेकांशी बोलतानाही अगदी हळुवार स्वरात बोलतात.
शिस्त ही फिनिश नागरिकांच्या अंगात पूर्णतः भिनलेली आहे. नियम पाळण्यात सारेजण काटेकोर असतात. म्हणूनच लोकांचा शासनावर आणि शासनाचाही लोकांवर विश्वास आहे. जनता आणि शासन यांच्यामध्ये प्रशासन नावाची जी गोष्ट असते, ती तिथं अतिशय आरोग्यसंपन्न आहे; किडलेली आणि सडलेली नाही. शासनाच्या योजना कोणतीही गळती न लागता जनतेपर्यंत पोहोचवण्याकडे त्यांचा ओढा असतो.
फिनलंडमधील सांडपाण्याची व्यवस्था पूर्णपणे बंदिस्त असते. एकही गटार उघड्यावर नाही. कितीही पाऊस पडून गेला, तरी सगळ्या पाण्याचा पाच मिनिटांत निचरा होऊन रस्ते कोरडे होतात. गटारे कधी तुंबत नाहीत आणि सांडपाणी रस्त्यावर येऊन वाहतही नाही. त्यामुळे अस्वच्छतेला तिथं थाराच नाही. मुंग्या, डास, ढेकूण या उपद्रवी कीटकांंचा समूळ नाश तिथे करण्यात आला आहे. तसेच उंदीर, घुशी आणि भटकी कु त्री नाहीत. रस्त्यावर जर एखादा खड्डा पडलाच, तर त्याच दिवशी तो मुजवला जातो. हा छोटासा देश आपापलं सांभाळून आहे. त्याची कुणाशी स्पर्धा नाही, ईर्ष्या नाही. कुणाशी संघर्ष नाही. वितुष्ट नाही. म्हणून तो आनंदी लोकांचा देश आहे. इथले लोक प्रत्येक ऋतूत आनंद शोधतात. कोणत्याही कामात कमीपणा मानत नाहीत. सर्वांचा दर्जा समान मानला जातो. मंत्र्यांना खास सुरक्षितता, फौजफाटा नसतो. डामडौल नसतो. टेबल पुसणारा, केर गोळा करणारा, उपाहारगृहातील कामगार, सफाई कामगार हेही कमी मानले जात नाहीत. त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत नाही. मंत्री सामान्य लोकांबरोबर विमानातून प्रवास करतात. सामाजिक समता ही गोष्ट महत्त्वाची मानली जाते आणि सर्वजण सहजपणे त्यानुसार वागतात. एखादा कनिष्ठ अधिकारी दूरवरून कार्यालयात येत असेल, तर गाडीमधून येतो. पण त्याच कार्यालयातला सर्वोच्च अधिकारी जवळ राहात असेल तर सायकलवरून येतो. त्यात त्याला कसलाही कमीपणा वाटत नाही. अर्थात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही अतिशय नियोजनबद्ध आहे. बस थांब्यावर लावलेल्या डिजिटल फलकावर येत असलेल्या वेळेची अचूक वेळ येते आणि बसही त्याच क्षणाला आलेली असते. ती व्यवस्था रेल्वेचीही आहे.
फिनिश नागरिकांना राष्ट्राभिमाबरोबरच आपल्या मातृभाषेवर अतिशय प्रेम आहे. ते सहसा इंग्रजीत बोलत नाहीत. त्यांच्याशी कुणी इंग्लिशमध्ये बोललं, तरच ते बोलतात. मी तिथल्या डे केअर सेंटरमध्ये गेलो. भारत, नेपाळ, स्वीडन, पोर्तुगाल इत्यादी बाहेरच्या देशातून गेलेली, फिनिश नसलेली ही मुलं एकमेकांत इंग्रजी बोलतात. तिथल्या शिक्षिकांनी आमच्यासमोर गार्हाणं मांडलं. ही मुलं खूप आरडाओरडा करतात, खूप दंगा करतात; एक वेळ हे सगळं करू देत,चालेल आम्हाला. आम्ही त्यांना सांभाळू. पण एकमेकांशी इंग्लिशमध्ये बोलतात, त्यांनी फिनिश भाषेत बोलायला हवं. त्यांचं म्हणणं असं आहे की, आम्ही आहोत जेमतेम 55 लाख लोक. आमची फिनिश भाषा आम्हीच टिकवायला हवी. आम्हीच जर फिनिशमध्ये बोललो नाही तर मग आणखी कोण बोलणार? तर असे हे त्यांचे मातृभाषा प्रेम. फिनलंडचा शैक्षणिक स्तर जगात आदर्शवत् मानला जातो. शैक्षणिक स्तर सर्वोत्तम आहे. व्यावहारिक शिक्षणातून पुस्तकी शिक्षण दिले जाते. संशोधन हा शिक्षणाचा गाभा मानला जातो. इथली विद्यापीठं जागतिक दर्जाची आहेत. उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या क्षमतेचा अभ्यास केला जातो. कोणताही वशिला तिथं कुठेही चालत नाही. विद्यार्थी हा समाजाच्या विकासाचा भाग होईल, याची दक्षता घेतली जाते. समाजोपयोगी आणि हसत-खेळत दिले जाणारे शिक्षण हे इथलं वैशिष्ट्य. उद्योजकतेला महत्त्व आहे. शासन, प्रशासन, उद्योजक, शिक्षण संस्था आणि नागरिक यांचा सुरेख समन्वय आहे.
2019 मध्ये पंतप्रधान झालेल्या 34 वर्षीय सॅना मरिन ह्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या. त्यांनी पाच पक्षांचे सरकार चालवून उत्तम कारभार केला. त्या नुकत्याच पायउतार झाल्या आणि आता डाव्या पक्षाचे पेत्री ओर्पो हे पंतप्रधान झाले. सॅना मरिनच्या काळात साऊली निनिस्तो हे राष्ट्राध्यक्ष होते. आता अलेक्झांडर स्टब हे राष्ट्राध्यक्ष आहेत. फिनलंडची करप्रणाली भक्कम आहे. सगळे नागरिक प्रामाणिकपणे कर भरतात. पण तशा सुविधाही सरकार जनतेला देत असते. जमा झालेला सगळा कर समाजाच्या विकासाकरिता खर्च केला जातो. महत्त्वाचे म्हणजे फिनलंडचे दरडोई उत्पन्न भारताच्या वीसपट आहे.
झाडांपासून केला जाणारा लगदा आणि कागदाची निर्मिती हे एक महत्त्वाचे उत्पादन. ऊर्जानिर्मिती प्रकल्प, रसायनिक निर्मिती प्रकल्प, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन, चॉकलेट उत्पादन, सोने, तांबे, फॉस्फेट, टिटॅनियम, निकेल अशा अनेकविध धातूंचे उत्पादन खाणकामातून होते. पण कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाची हानी होणार नाही, असे कडक निर्बंधही सरकारने लावलेले आहेत. नोकियासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था फिनलंडने उभ्या केल्या.
फिनलंडमध्ये एक लाखाहून अधिक गोड पाण्याची सरोवरे आहेत. छोट्या तळ्यांत मोरपंखी रंगाची मान असलेली बदकं पोहत असतात. मेंडेटेरियन डक असं त्याचं नाव आहे. पांढर्या रंगाचे, कबूतरासारखे, पण गुबगुबीत, काहींची मान शुभ्र, तर काहींची तपकिरी असे पक्षीही तिथं आहेत. तसेच 65 टक्के जंगल आहे. म्हणून वनसंपदा टिकून आहे. मानवी बुद्धिमत्ता आणि निसर्गसमृद्धी याचा सुरेख मेळ तिथं आहे. अशा काही गोष्टींमुळे फिनिश नागरिक हे इतके आनंदी आहेत. म्हणूनच सलग सातव्यांदा जगातील आनंदी देशांच्या यादीतील प्रथम क्रमांकाचे राष्ट्र ठरलेलं आहे.
Latest Marathi News सन्मान : फिनलंड आनंदी का आहे? Brought to You By : Bharat Live News Media.