दहशतवाद : धोका इस्लामिक स्टेटचा

दहशतवाद : धोका इस्लामिक स्टेटचा

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

सलग तिसर्‍यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनलेल्या व्लादिमीर पुतीन यांच्यापुढे मॉस्कोवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने एक नवे आव्हान उभे केले आहे. आयसिस खोरासन या दहशतवादी संघटनेने केलेला हा हल्ला रशियावर गेल्या दहा वर्षांतील सर्वांत भीषण हल्ला मानला जात आहे. इस्लामिक देशांमधील रशियाचा वाढता हस्तक्षेप, रशियातील मुस्लिमबहुल प्रांतातून होणारी स्वतंत्र राष्ट्राची मागणी यांसह अनेक कारणे या हल्ल्यामागे आहेत.
रशियामध्ये व्लादिमीर पुतीन हे सलग तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आणि यानंतरच्या संबोधनामध्ये त्यांनी युक्रेनसोबतचे युद्ध भविष्यातही पुढे चालू राहील, अशा प्रकारचे सूतोवाच केले. तसेच ‘नाटो’ने या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला तर त्याचे प्रत्युत्तर अण्वस्त्रांनी दिले जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी पश्चिम युरोपियन देशांबरोबरच अमेरिकेलाही दिला. त्यामुळे दोन वर्षे उलटल्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध कोणते वळण घेणार याबाबतच्या चर्चा सुरू असतानाच अचानक एक नवी घडामोड घडली. रशियाची राजधानी मॉस्कोमधील एका कॉन्सर्टमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये चार तरुण दहशतवाद्यांनी एका व्हॅनमधून या कॉन्सर्ट हॉलमध्ये घुसून एके 47 मधून अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये 137 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिकजण जखमी झाले आहेत. या कॉन्सर्ट हॉलमध्ये 600 जण होते. रशियामध्ये गेल्या दहा वर्षांतील सर्वांत मोठा आणि सर्वांत भीषण दहशतवादी हल्ला होता. त्यामुळे सर्वांनाच एक प्रकारचा अनपेक्षित धक्का बसला. या हल्ल्याबाबत संशयाची सुई युक्रेनकडे वळत असतानाच आयसिस खोरासन या अफगाणिस्तानमधील दहशतवादी गटाने याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर अमेरिकेनेही एक महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यानुसार अशा स्वरूपाचा हल्ला होणार याची पूर्वकल्पना आम्ही रशियाला दिली होती. रशियातील अमेरिकन नागरिकांना ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी दिल्याचेही अमेरिकेने सांगितले. तसेच या हल्ल्यामध्ये युक्रेनचा कोणताही हात नाही हे स्पष्ट करायलाही अमेरिका विसरली नाही.
मॉस्कोवरील हा हल्ला झाला त्याची वेळ लक्षात घ्यावी लागेल. रशियाचा लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणार्‍या, रशियाची कोणत्याही संकटापासून मुक्तता करण्याची क्षमता असणारा आणि रशियातील 82 टक्के लोकांनी पुन्हा निवडून दिलेला नेता असणार्‍या व्लादिमीर पुतीन यांनी शपथ घेऊन काही दिवस लोटतात न लोटतात तोच दशकातील भीषण दहशतवादी हल्ला होणे ही रशियासाठी नामुष्की आहे. त्यामुळे पुतीन यांनीही तत्काळ रशियाला उद्देशून भाषण केले. तथापि, या भाषणामध्ये त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी आयसिस खोरासनने घेतलेली असूनही युक्रेनकडे अंगुलिनिर्देश केला. या हल्ल्यातील हल्लेखोर युक्रेनकडे पळाल्याचे कारण यामागे त्यांनी सांगितले. पुतीन यांच्या भाषणानंतर आयसिस खोरासनने एक व्हिडीओ व्हायरल केला आणि या चारही हल्लेखोरांचे हल्ल्यापूर्वीचे फोटो आणि हल्ला करतानाचे फोटो जगासमोर आणले. त्यामुळे हा हल्ला आयसिस खोरासननेच केला, असे मानण्यास जागा आहे.
या हल्ल्यातून काही गोष्टी ठळकपणे पुढे येत आहेत. सर्वांत पहिली बाब म्हणजे हा हल्ला युक्रेनकडून झालेला असण्याची शक्यता दिसत नाही. याचे कारण अशा प्रकारचा हल्ला केल्यास त्याचे रशियाकडून दिले जाणारे प्रत्युत्तर खूप भयावह असेल, याची युक्रेनला कल्पना आहे. दुसरी गोष्ट म्हणजे युक्रेनकडे अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आहेत. त्यामुळे त्यांना अशा स्वरूपाच्या हल्ल्याची गरज नाही. तिसरी गोष्ट म्हणजे रशियातील सामान्य लोकांवर हल्ला केल्यास पाश्चिमात्य जगताचे सध्या असणारे समर्थन गमावण्याची भीती आहे. त्यामुळे युक्रेनने हा हल्ला केला असेल असे वाटत नाही. आता प्रश्न पडतो की, मग पुतीन यांनी युक्रेनवर आरोप का केला? याचे कारण हा हल्ला रशियासाठी अत्यंत नामुष्कीजनक आहे. एकीकडे युक्रेन गेल्या दोन वर्षांपासून रशियाला झुंजवत असतानाच आता हे दुसरे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे रशियाने आपली प्रतिमा वाचवण्यासाठी युक्रेनकडे बोट दाखवणे आणि आम्ही याचा बदला घेऊ, अशा प्रकारच्या गर्जना करणे अपरिहार्य होते. प्रत्यक्षात युक्रेनचा या हल्ल्याशी कसलाही संबंध नाही.
या पार्श्वभूमीवर आयसिस खोरासनचा वेध घेणे गरजेचे आहे. आयसिस खोरासन हा अफगाणिस्तानमध्ये सक्रिय असणारा इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा एक गट किंवा शाखा आहे. या गटाची विचारधारा ही आयसिससारखीच आहे. वास्तविक पाहता आखातातून आयसिसचे उच्चाटन कधीच झालेले आहे. विशेषतः, आखातात सीरिया, इराक यांसारख्या देशात आयसिसचे प्राबल्य होते. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदा लयाला गेली. तिची जागा आयसिसने घेतली. आयसिसचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिका आणि रशिया या दोघांनी मिळून संयुक्त कारवाई केली होती. त्यामुळे आखातामध्ये आयसिसची पाळेमुळे उखडून टाकण्यात आली. त्यानंतर जगभरात आयसिसचे विविध उपगट आकाराला आले. त्यांचे स्थलांतर मध्य आशिया आणि दक्षिण आशियाकडे झाले. यानंतर अफगाणिस्तानवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. आयसिस खोरासन हा गट अफगाणिस्तानात अधिक सक्रिय आहे. विशेष म्हणजे तालिबान आणि या गटामध्ये हाडवैर आहे. कारण ज्या पद्धतीची शासनव्यवस्था आयसिस खोरासनला आणायची आहे, त्यानुसार तालिबान चालत नाहीये. त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये जोरदार भांडणे होत आहे. याच आयसिस खोरासनने अफगाणिस्तानाची राजधानी काबूलमध्ये रशियाच्या दूतावासावर हल्ला केला होता. त्याचबरोबर इराणमध्येही त्यांनी हल्ले केले होते. त्यामुळे ही कट्टर सुन्नी इस्लामिक संघटना असून शरीयावर आधारित इस्लामिक राजवट आणणे ही त्यांची विचासरणी आहे.
गेल्या दोन वर्षांपासून इस्लामिक दहशतवादाचा धोका रशियासाठी वाढला आहे. मॉस्कोवरील हल्ल्यापूर्वीही रशियावर काही हल्ले झालेले आहेत. यापैकी 2004 च्या सुमारास मॉस्कोमधील एका शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 200 हून अधिक मुले मारली गेली होती. 2000 मध्येही अशाच स्वरूपाचा हल्ला झाला होता. गेल्या काही वर्षांत रशियामध्ये मुस्लिम समुदायाची संख्या वाढत आहे. सद्य:स्थितीत रशियाच्या एकूण लोकसंख्येमध्ये मुस्लिमांची संख्या 20 टक्क्यांवर पोहोचली आहे. रशियाच्या एकूण प्रांतापैकी सात प्रांतांमध्ये मुस्लिम लोकसंख्या एकवटलेली आहे. विशेषतः उत्तर कॉकशसमध्ये यांचे प्राबल्य खूप मोठ्या प्रमाणावर आहे. इतकेच नव्हे तर उत्तर कॉकशस नावाचा एक स्वतंत्र देश निर्माण करावा यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. त्याचप्रमाणे चेचेन्यामध्येही त्यांचे प्राबल्य मोठे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सोव्हिएत महासंघाचे विघटन झाल्यानंतर जे पाच स्वतंत्र देश निर्माण झाले ते प्रामुख्याने इस्लामिक देश आहेत. यापैकी ताझिकिस्तानसारखा देश आयसिसचे ग्राऊंड बनलेला आहे. सद्य:स्थितीत आयसिससाठी सर्वांत मोठी भरती या देशातून होत आहे. मॉस्कोवर हल्ला करणारे चारही दहशतवादीदेखील ताझिकिस्तानातील आहेत.
एक महत्त्वाची बाब म्हणजे, पश्चिम आशियातील राजकारणात रशिया सातत्याने हस्तक्षेप करत आला आहे. प्रामुख्याने सीरियातील बशर अल असाद याला संरक्षण देण्यामध्ये रशियाची भूमिका मोठी राहिली आहे. रशियाने सीरियामध्ये क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने वापरून आयसिसवर हल्ले केले होते. रशियामध्ये इस्लामिक लोकसंख्येकडून सातत्याने असंतोष व्यक्त होत आहे आणि फुटीची मागणी केली जात आहे. दुसरीकडे पुतीन यांना रशियाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्व भागांना एकत्र करायचे आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचा संघर्ष देशांतर्गत फुटिरतावादी इस्लामिक समुदायांशी आहे; तर परराष्ट्र धोरणात इस्लामिक देशात हस्तक्षेपाची अधिकृत भूमिका रशियाने घेतलेली आहे. त्यामुळे आयसिसचा रशियावर राग असणे अपेक्षितच आहे. यातूनच हा हल्ला झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
युक्रेन युद्ध सुरू असतानाच इस्लामिक दहशतवादाने तोंड वर काढणे ही बाब पुतीन यांच्यापुढील आव्हाने वाढवणारी आहे. कारण युक्रेनच्या माध्यमातून अमेरिका आणि पश्चिम युरोपियन देशांशी लढताना रशियाला फार मोठा आर्थिक आघातही सहन करावा लागत आहे. असे असताना जर देशांतर्गत असंतोष वाढून फुटिरतावाद फोफावला तर त्याचा सामना करणे पुतीन यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. अर्थात आयसिस खोरासनने आज जरी रशियावर म्हणजेच पूर्व युरोपवर हल्ला केला असला आणि पश्चिम युरोपियन देश याबाबत गाफील राहात असतील तर तसे करणे धोक्याचे ठरू शकते. कारण आयसिसने यापूर्वी पश्चिम युरोपमध्ये अनेक हल्ले केलेले आहेत. आयसिस खोरासनचे दहशतवादी बेलारुसमध्ये घुसले असण्याची शक्यता असून तेथून ते पश्चिम युरोपमध्येही जाऊ शकतात. त्यामुळे एकंदरीतच युरोपमध्ये पुन्हा एकदा इस्लामिक दहशतवादाचे आव्हान बळावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मध्यंतरीच्या काळात आयसिसवर आघात केल्यामुळे, कोरोना महामारीमुळे, रशिया-युक्रेन युद्धामुळे, इस्रायल-हमास संघर्षामुळे इस्लामिक दहशतवादाकडे जगाचे दुर्लक्ष झाले होते. पण आयसिससारख्या संघटना अशा काळात फोफावत जातात आणि पडद्यामागून षड्यंत्रे रचत असतात. मास्कोवरील हल्ल्यातून ही बाब सिद्ध झाली आहे. तथापि, या संघटनेचा धोका जगाला भेडसावू शकतो. त्यामुळे याबाबत राजकारण करण्यापेक्षा सामूहिकतेने अशा शक्तींना पायबंद घालणे गरजेचे आहे.
Latest Marathi News दहशतवाद : धोका इस्लामिक स्टेटचा Brought to You By : Bharat Live News Media.