‘बालगंधर्व’चा पडदा पुन्हा खुला! नव्या रूपात रंगला नाट्यप्रयोग
पुणे : Bharat Live News Media वत्तसेवा : देखभाल- दुरुस्तीच्या कामानंतर नव्या रूपातील बालगंधर्व रंगमंदिर जवळपास दीड महिन्यानंतर गुरुवारी (दि.27) पुन्हा सुरू झाले अन् येथे दुपारी एक वाजता रंगलेल्या एका नाट्य प्रयोगाला नाट्यरसिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. रंगमंचाचे बदलले रूप, आसनव्यवस्थेत केलेले बदल, रंगकाम अन् विद्युत यंत्रणेतील बदल… अशा रूपातील नाट्यगृह पाहून कलाकारांसह नाट्यरसिकही खूष झाले. फक्त नाट्यगृहातील आतील भागातच नव्हे, तर बाहेरील परिसरातही अनेक बदल करण्यात आले असून, कलाकृतीसह विविध फुलांची झाडे असलेले लॉन लक्ष वेधून घेत आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात सोयी-सुविधांच्या अभावाबद्दल कलाकारांकडून, रसिकांकडून अनेक तक्रारी केल्या जात होत्या. त्यानंतर प्रशासनाकडून हालचाली करण्यात आल्या. 16 फेब्रुवारी रोजी देखभाल – दुरुस्तीच्या कामासाठी नाट्यगृह बंद करण्यात आले आणि आता बालगंधर्व रंगमंदिरात देखभाल – दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. गुरुवारपासून बालगंधर्व रंगमंदिर पुन्हा सुरू झाले. रंगमंदिरात व्हीआयपी रूमचे इंटेरिअर बदलण्यात आले आहे. वातानुकूलित यंत्रणा, रंगमंचावरील पडदे बदलणे, खुर्च्या बदलणे, रंगकामही करण्यात आले आहे.
गुरुवारी याच बदललेल्या रूपातील नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग झाला आणि रंगमंचाचे बदलले रूप, नाट्यगृहात बसवलेल्या नवीन खुर्च्या, नाट्यगृहात बसवलेले लाल रंगाचे कार्पेट, नवी वातानुकूलित यंत्रणा, विद्युत यंत्रणेत केलेले बदल, रंगकामाने बदलले नाट्यगृहातील रूप पाहून कलाकारांसह रसिकही आनंदित झाले. याविषयी बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक राजेश कामठे म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिरातील देखभाल-दुरुस्तीचे काम झाले असून, गुरुवारी दुपारी नाटकाचा प्रयोगही झाला. नाट्यगृहातील बदल पाहून कलाकारांसह रसिकांनीही चांगला अभिप्राय दिला.
गणेश कला-क्रीडा मंचसाठी 10 एप्रिलपर्यंत प्रतीक्षा
बालगंधर्व रंगमंदिर पुन्हा सुरू झाले असले, तरी गणेश कला-क्रीडा मंचाच्या देखभाल- दुरुस्तीच्या कामाला 10 एप्रिलपर्यंतचा कालावधी लागणार आहे. परंतु, देखभाल- दुरुस्तीच्या कामानंतरही हे नाट्यगृह जूनपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध नसेल. कारण लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जूनपर्यंत नाट्यगृहात मतदानविषयक प्रशिक्षणासाठी दिले जाणार असून, त्यासाठी महापालिकेकडून हे नाट्यगृह लोकसभा निवडणुकांच्या कामकाजासाठी आरक्षित असणार आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात आज आमच्या नाटकाचा प्रयोग झाला. नाट्यगृहात वातानुकूलित यंत्रणेची दुरुस्ती, साफसफाई, साऊंड सिस्टिम आणि लाईटस यंत्रणेतील बदल… अशी कामे करण्यात आली असून, बदललेल्या रूपातील नाट्यगृहात प्रयोग करून आनंद वाटला. नाट्यगृहात करण्यात आलेले बदल टिकवण्याची जबाबदारी प्रशासनाची, कलाकारांची आणि नाट्यरसिकांची आहे.
– भार्गवी चिरमुले, अभिनेत्री.
बालगंधर्व रंगमंदिरात केलेले बदल पाहून खूप छान वाटले. नाट्यगृहात विविध कामे करण्यात आली असून, आसनव्यवस्थेच्या बदलासह रंगकामही करण्यात आले आहे. आम्हा नाट्यरसिकांना हा बदल सुखावणारा आहे.
-आम्रपाली देवधर, नाट्यरसिक.
हेही वाचा
सिंधू संस्कृतीचा र्हास 4 हजार वर्षांपूर्वीच्या उल्कापाताने?
नाशिक : युको बँकेवर जप्तीची टांगती तलवार
Jammu News | जम्मू-श्रीनगर महामार्गावर भीषण अपघात, टॅक्सी दरीत कोसळून १० ठार
Latest Marathi News ‘बालगंधर्व’चा पडदा पुन्हा खुला! नव्या रूपात रंगला नाट्यप्रयोग Brought to You By : Bharat Live News Media.