सिंधू संस्कृतीचा र्हास 4 हजार वर्षांपूर्वीच्या उल्कापाताने?
टोरांटो : गुजरातमध्ये सुमारे चार हजार वर्षांपूर्वी एक उल्का कोसळली होती. या धडकेने निर्माण झालेले एक विवर तिथे आजही पाहायला मिळते. ते गेल्या 50 हजार वर्षांच्या काळातील पृथ्वीला धडकलेल्या सर्वात मोठ्या उल्केचे विवर असू शकते, असा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आलेला आहे. या धडकेने जमिनीला हादरे बसले असावेत, आग व धुराचा फैलाव झाला असावा. ही आपत्ती अशा ठिकाणीही पोहोचली असावी जिथे सिंधू संस्कृतीमधील लोक राहत होते. त्यांचा र्हास कदाचित या आपत्तीनेही झाला असावा, असे संशोधकांना वाटते.
कॅनडाच्या वेस्टर्न युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. त्याबाबतची माहिती ‘न्यू सायंटिस्ट’ या नियतकालिकात देण्यात आली आहे. गॉर्डन ओसिंस्की यांनी याबाबतच्या संशोधनाचे नेतृत्व केले. त्यांनी सांगितले की, ही धडक एखाद्या अणुबॉम्बच्या स्फोटासारखीच असावी. फरक फक्त इतकाच आहे की, त्या धडकेत रेडिएशन झाले नाही.
कच्छमध्ये या धडकेची खूण असलेले विवर पाहायला मिळते. ते 1.8 किलोमीटर रुंदीचे आहे. त्याला ‘लूना स्ट्रक्चर’ असे म्हटले जाते. हे विवर लूना गावाच्या जवळ आहे. महाराष्ट्रातील लोणार आणि राजस्थानातील रामगढनंतरचे हे तिसरे मोठे विवर आहे जे अंतराळातून आलेल्या खगोलाच्या धडकेने बनले. लूना स्ट्रक्चरचे जियोकेमिकल अनालिसिस सांगते की, या ठिकाणी असलेल्या मातीत मोठ्या प्रमाणात इरीडियम मिसळलेले आहे.
त्यावरून असे दिसते की, इथे एक लोहयुक्त उल्का धडकली असावी. या ठिकाणी उल्केशी संबंधित वुस्टाईट, किशस्टिनाईट, हर्सिनाईट आणि उलवोस्पिनलही सापडले आहे. सुमारे 4,050 वर्षांपूर्वी ही धडक झाली असावी असा अंदाज आहे. लूना क्रेटरचा शोध 2006 मध्ये लावण्यात आला होता. हे ठिकाण सुमारे अकरा महिने सिंधू नदी आणि अरबी महासागराच्या पाण्यात बुडालेले असते. या ठिकाणापासूनच जवळच सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृतीशी संबंधित ठिकाण आहे.
Latest Marathi News सिंधू संस्कृतीचा र्हास 4 हजार वर्षांपूर्वीच्या उल्कापाताने? Brought to You By : Bharat Live News Media.