काँग्रेस-राजदमध्ये काही जागांवरून धुसफूस
बिहारामध्ये संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी महाआघाडीशी काडीमोड घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच नितीशकुमार यांनी भाजपला सोबत घेऊन नव्याने सरकार स्थापन करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर बिहारात काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षांना सहानुभूती मिळेल, अशी चर्चा होती. राजद आणि भाजपने समन्यायी जागा वाटप करून पहिल्या टप्प्यात बाजी मारल्याचे चित्र आहे. उलटपक्षी, काँग्रेस आणि राजदमध्ये जागा वाटपावरून तणातणी सुरू असल्याचे चित्र आहे. तर काही जागांवर काँग्रेस आणि राजदच्या उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे पाहावयास मिळणार आहे. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव काँग्रेसला बिहारमध्ये सहा ते सात जागांपेक्षा अधिक जागा देण्यास तयार नसल्यामुळे दोन्ही पक्षांत जागावाटपावरून ताकतुंबा सुरू आहे.
काँग्रेसला त्यांच्या मनासारखे मतदारसंघ मिळत नसल्याने पदाधिकार्यांसह पक्षश्रेष्ठींमध्येही नाराजीचे चित्र आहे. पप्पू यादव यांनी त्यांचा पक्ष कॉँग्रेसमध्ये विलीन केला आहे. त्यामुळे यादव यांच्यासाठी काँग्रेसने पूर्णिया मतदार संघावर दावा केला आहे. राजदचे नेते पूर्णियासह कटिहार मतदार संघावर अडून बसले आहेत. त्यामुळे तारिक अन्वर यांचीही कोंडी झाली आहे. लालू यांनी पप्पू यादव यांना मधेपुरातून लढण्याचा प्रस्ताव दिला आहे. अन्वर यांनी कटिहारमधून संसदेत प्रतिनिधित्व केले आहे. लालू मात्र ही जागा सोडण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. 2019 साली काँग्रेसने कीर्ती आझाद यांच्यासाठी दरभंगा मतदार संघाची मागणी केली होती. लालू यांनी ती मान्य केल्याने आझाद यांना झारखंडमधून उभे रहावे लागले होते. त्यामुळे काँग्रेसने या खेपेस 11 जागांसाठी आग्रही मागणी राजदकडे ठेवली आहे. त्यामध्ये औरंगाबाद, कटिहार, पूर्णिया, समस्तीपूर, भागलपूर, मुझ्झफरपूर, बेतिया, सासाराम, पाटणा साहिबा या मतदार संघासाठी काँग्रेसने दावा ठोकला आहे. तर राजदने 30 जागांसाठी आग्रह ठेवला आहे. 2020 सालच्या विधानसभेत कॉँग्रेसला अपेक्षेहून अधिक जागा दिल्याचे सांगत राजदने आपला ठेका कायम ठेवला आहे.
Latest Marathi News काँग्रेस-राजदमध्ये काही जागांवरून धुसफूस Brought to You By : Bharat Live News Media.