गडकरी यांची हॅट्टिकची तयारी; पाच लाख मतांनी निवडून येण्याचा विश्वास

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हॅट्ट्रिकच्या तयारीत आहेत, तर काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनीही जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे नागपूरची लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नागपुरात केंद्रीय महामार्ग मंत्री, भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांना तिसर्‍यांदा उमेदवारी दिली आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या 195 जणांच्या यादीमध्ये त्यांचे नाव … The post गडकरी यांची हॅट्टिकची तयारी; पाच लाख मतांनी निवडून येण्याचा विश्वास appeared first on पुढारी.

गडकरी यांची हॅट्टिकची तयारी; पाच लाख मतांनी निवडून येण्याचा विश्वास

राजेंद्र उट्टलवार

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हॅट्ट्रिकच्या तयारीत आहेत, तर काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनीही जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे नागपूरची लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नागपुरात केंद्रीय महामार्ग मंत्री, भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांना तिसर्‍यांदा उमेदवारी दिली आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या 195 जणांच्या यादीमध्ये त्यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात होते. अखेर भाजपच्या दुसर्‍या यादीत गडकरी यांचे नाव आल्याने अनेकांना हायसे वाटले. काँग्रेसकडून शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे गडकरी यांच्याशी दोन हात करणार आहेत.
कधी नव्हे ते कट्टर विरोधक माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, डॉ. नितीन राऊत यांनी एकदिलाने ठाकरे यांचे नाव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामार्फत हायकमांडला पाठविले. याच एकजुटीत काँग्रेसने राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत ‘है तयार हम..’ रॅली नागपुरात घेतली. कोण किती तयार याची कसोटी आता लागणार आहे. अशा स्थितीत हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत असलेल्या नितीन गडकरी यांच्या जम्बो कार्यालयाचे उद्घाटन झाले. पाच लाख मतांनी निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेसने 13 वेळा हा मतदारसंघ काबीज केला. भाजपला केवळ तीनदा हा मतदारसंघ जिंकता आला. यात रामजन्मभूमी आंदोलनाच्या नावावर काँग्रेसचा राजीनामा देत भाजपकडून लढलेले बनवारीलाल पुरोहित यांनी पहिल्यांदा भाजपसाठी विजय मिळविला, तर गडकरींनी दोनदा विजय मिळविला. 2014 मध्ये माजी केंद्रीय मंत्री व या मतदार संघात तीनदा विजय मिळविणारे विलास मुत्तेमवार यांचा, तर 2019 साली नाना पटोले यांचा त्यांनी पराभव केला. गेल्यावेळी पटोलेंना वेळेवर उमेदवारी मिळून साडेचार लाख मते घेतल्याने यावेळीही गडकरी पायाभूत सुविधा विकासाच्या नावावर हमखास जिंकणार, असे चित्र असले तरी पाच लाख मतांनी जिंकणार का, हा प्रश्न कायम आहे. दलित, मुस्लिम मतांवर हे समीकरण ठरणार आहे.
पदवीधर निवडणुकीत आ. अभिजित वंजारी, शिक्षक मतदार संघात आ. सुधाकर अडबाले यांचा विजय काँग्रेसच्या एकजुटीचा तितकाच भाजमधील अंतर्गत संघर्ष, गडकरी-फडणवीस या दोन सत्ता केंद्रांचाही परिणाम होता, हे पाहता गेल्यावेळी 54 टक्के मतदानाचा फटका बसून मताधिक्य कमी झालेल्या गडकरी यांना पाच लाखांचे मताधिक्य मिळणार का, हाच खरा प्रश्न आहे.
यावेळी मतदान 75 टक्के करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न सुरू असताना हा वाढलेला टक्का कुणाला साथ देणार, यावर सारा खेळ असणार आहे. मध्यंतरी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचे वेळी आ. विकास ठाकरे, आ. राजू पारवे यांची नावे चर्चेत होती. मात्र, त्यांनी इन्कार केला. आता पारवे शिवसेनेतून, तर ठाकरे काँग्रेसचे लोकसभेला उमेदवार झाले, कुणाचे नशीब फळफळणार, हे देखील 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. नागपूर शहरातील सहापैकी दोन विधानसभा काँग्रेस, तर चार विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. नागपुरात आमदार विकास ठाकरे यांचे विविध भागात संघटन आहे. बूथ, ब्लॉक पातळीवर त्यांच्या या नेटवर्कचा, भाजपविरोधात असलेल्या नाराजीचा काँग्रेसला फायदा मिळू शकतो. गडकरी आज हायटेक प्रचारात पुढे आहेत. दुसरीकडे मी ताकदीने लढणार आणि जिंकणार, या निवडणुकीत लोकशाही संरक्षणाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे, असा दावा काँग्रेसचे उमेदवार आ. विकास ठाकरे यांनी केला असून, ही लढत जोरदार होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Latest Marathi News गडकरी यांची हॅट्टिकची तयारी; पाच लाख मतांनी निवडून येण्याचा विश्वास Brought to You By : Bharat Live News Media.