अवघे वातावरण शिवमय; फुलांची उधळण व मर्दानी खेळांचे सादरीकरण
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला… रांगोळीच्या पायघड्या व फुलांची उधळण, मर्दानी खेळांचे सादरीकरण… पालखीसह रथावर विराजमान झालेली शिवरायांची भव्य मूर्ती… अशा शिवमय झालेल्या वातावरणात शहरात शिवजयंती सोहळा शुक्रवारी (दि. 28) उत्साहात पार पडला. शहरासह उपनगरांमध्ये विविध सांस्कृतिक, स्पर्धा कार्यक्रमांसह भव्य मिरवणुकांमुळे अवघे शहर भगवेमय झाले होते, तर सायंकाळनंतर डीजेच्या दणदणाटाने परिसर दुमदूमून गेला होता.
शहरासह उपनगरांत स्वयंस्फूर्तीने असंख्य शिवप्रेमींनी मंडळांसह महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी अभिवादनासाठी गर्दी केली होती. या वेळी फेटे, धोतर, नऊवारी, नथ अशा पारंपरिक वेशभूषेत येणारे शिवप्रेमी पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होते. काही शिवप्रेमींकडून मंडळाच्या ठिकाणापासून ते सिंहगडापर्यंत पायी मशाल ज्योत नेण्यात आली. यामध्ये, तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. साहसी खेळांची प्रात्यक्षिके दाखवणार्या व ढोल- ताशा पथकांच्या जल्लोषपूर्ण वादनाच्या सादरीकरणाने शिवभक्तांची मने जिंकली. या प्रात्यक्षिकांना आणि वादनाला वेळोवेळी टाळ्यांच्या उत्स्फूर्त गजरात दाद मिळत होती. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
न्यायालयात उलगडले शिवकाळातील वकिलांचे महत्त्व
वकिलांची संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयातील अशोका सभागृहात व्याख्यानपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी शिवव्याख्याते बहि चिंचवडे यांनी शिवकालीन इतिहासाची साधने व शिवकाळातील वकिलांचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले. या वेळी वकिलांनी काळ्या कोटावर भगवे फेटे परिधान केल्याने वातावरण भगवेमय झाले होते. कार्यक्रमाला असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संतोष खामकर, उपाध्यक्ष अॅड. कुमार पायगुडे, सचिव अॅड. मकरंद मते, अॅड. चेतन हरपळे, सदस्य अॅड. सोमनाथ पोटफोडे यांसह अन्य पदाधिकारी व वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभात मित्रमंडळ
गुरुवार पेठेतील प्रभात मित्रमंडळातर्फे पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा आयोजित केला होता. सोहळ्याच्या सुरुवातीला शिवप्रतिमेचे पूजन साध्वी प्रज्ञा भारती यांच्या हस्ते झाले. त्यानंतर फुलांची उधळण करत स्थानिक महिला व कार्यकर्त्यांनी मिरवणुकीचे स्वागत केले. या वेळी कसबा पेठेतील त्र्यंबकेश्वर मर्दानी आखाडामधील कलाकारांनी सादर केलेले मर्दानी खेळ पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. तसेच, केशव शंखनाद पथक, श्री गजलक्ष्मी ढोल-ताशा पथक व ओम श्री हलगी पथकाच्या तालावर उपस्थितांनी ठेका धरला. या वेळी वेडात दौडले वीर मराठे सात या स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानावर आधारित जिवंत देखावादेखील सादर करण्यात आले.
साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर
साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील शिवाजी महाराजांच्या शिवमंदिरात हा कार्यक्रम पार पडला. सरदार घराण्याच्या कुसूम पायगुडे व थोपटे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, धनंजय काळे, शिवाजी माळवदकर, गिरीष साळुंखे आदी उपस्थित होते.
हेही वाचा
तलाठी भरती 2023 | ऑनलाइन परीक्षेत हायटेक कॉपी, डमी परीक्षार्थी
ड्रग्ज तस्करीत आंतरराष्ट्रीय कनेक्शन ! दोन आंतरराष्ट्रीय माफियांची नावे निष्पन्न
उन्हाळ्यात प्रशासनाची होणार दमछाक : मार्चमध्येच पाणी समस्या; एप्रिल, मे बाकी
Latest Marathi News अवघे वातावरण शिवमय; फुलांची उधळण व मर्दानी खेळांचे सादरीकरण Brought to You By : Bharat Live News Media.