तडका : ढळलेला तोल
सध्या राज्यातील आणि देशातील राजकारणाने चांगलाच वेग पकडला आहे. कारण, लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. अशावेळी राजकीय नेते परस्परांवर विविध आरोप करत आहेत. त्यामध्ये विरोधी पक्षाचा कोणा एखाद्याचे मानसिक संतुलन ढळले आहे, असा दुसर्याने आरोप करणे सर्रास सुरू आहे. तसे पाहायला गेले, तर राजकारणामध्ये मानसिक संतुलन कोणाचे मजबूत आहे, हाच प्रश्न पडण्याची शक्यता आहे.
राजकीय लोकांना मोठी खुन्नस असते. गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा कधी ना कधीतरी बदला घेण्याची खुमखुमीसुद्धा असते. पश्चिम महाराष्ट्रमधील विजय नावाचे एक भावी उमेदवार गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी पछाडलेले आहेत. सदरील गृहस्थांनी मागील निवडणुकीमध्ये म्हणजे पाच वर्षांपूर्वी मी कार्डियाक अॅम्ब्युलन्समधून प्रचार केला, असे स्वतः सांगितले आहे.
आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडतो की, पाच वर्षांपूर्वी काही एक वैद्यकीय कारणामुळे रुग्णवाहिका वापरावी लागली, आता त्या घटनेलाही पाच वर्षे होऊन गेली आहेत. म्हणजे ते आता ठणठणीत झालेले दिसतात; पण खरं तर राजकारण हीच अशा राजकारण्यांची ऊर्जा असते. आपल्या वयाची त्यांना अजिबात पर्वा नसते आणि एक ना एक दिवस बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, ही खुन्नस आणि खुमखुमी मात्र कायम असते.
पराभूत झालेले उमेदवार पुढील निवडणूक येईपर्यंत म्हणजे पाच वर्षे जनतेची कामे करतील की नाही, हे माहीत नाही; परंतु पराभवाचे शल्य मात्र आपल्या मनामध्ये धगधगते ठेवत असतात. निवडणुका जाहीर झाल्या की, मग असे लोक वाटेल तसे बोलायला लागतात. अशा व्यक्तींवर मानसिक संतुलन ढळले आहे, असे आरोप व्हायला लागतात. खरे तर, अशा बर्याच उमेदवारांमुळे आणि राजकीय नेत्यांमुळे जनतेचे मात्र मानसिक संतुलन ढळण्याची वेळ आली आहे की काय, अशी शंका येते. आधीच अनेक पक्षांचा गोंधळ, युती, आघाडी त्याचबरोबर आता तिसरी आघाडीसुद्धा आकाराला येऊ घातली आहे. तिसरी आघाडी म्हणजे ज्यांची कोणाबरोबरच बोलणी यशस्वी झाली नाहीत, त्या सर्वांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करणे आणि एकमेकांचे प्रचार करणे. यामुळे मतदारांच्या मनातील गोंधळ मात्र वाढत चालला आहे.
आम्ही याबद्दल सातत्याने मार्गदर्शन करत असतो. या निवडणुकीसाठी एवढाच सल्ला आहे की, राजकीय बातम्या फार वेळ पाहू नका. त्यात गुंतून तर अजिबात जाऊ नका. कोणाबरोबर कोणते वाद घालू नका. नाही तर निवडणूक लढणारे लढतील, निवडून येणारे निवडून येतील, पुढे काय व्हायचे ते होईल; परंतु आपल्या मनाचा तोल मात्र ढळलेला असेल. हरवलेले मानसिक संतुलन पुन्हा जागेवर आणणे यासारखी वैद्यकीय क्षेत्रामध्ये अवघड गोष्ट कोणतीही नाही. एकवेळ तुमचे हृदय खराब झाले असेल, तर त्याची दुरुस्ती करता येईल, किडनी बदलता येईल. आजकाल लिव्हरपण बदलले जाते; पण ढळलेले मानसिक संतुलन परत आणणे ही अत्यंत धिम्या गतीने होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपली स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
Latest Marathi News तडका : ढळलेला तोल Brought to You By : Bharat Live News Media.