पंड्याच्या नावावर लाजिरवाणा विक्रम! चाहत्यांना आठवला 2008 चा IPL सीझन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Hardik Pandya IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामात मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 2 सामने खेळले असून या दोन्ही सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. गतवर्षी एमआयने अचानक रोहित शर्माला हटवून पंड्याला संघाचा नवा कर्णधार बनवले. फ्रँचायझीच्या या धक्कादायक निर्णयानंतर चाहत्यांमध्ये याबाबत नाराजीचा सूर उमटला होता. अशातच आता पहिले 2 सामने गमावल्यानंतर कर्णधार म्हणून पंड्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.
मुंबई इंडियन्स संघाने 2008 चा आयपीएल हंगाम हरभजन सिंगच्या नेतृत्वाखाली खेळला होता. त्या हंगामातील पहिल्या तीन सामन्यांत एमआयचा पराभव झाला होता. यानंतर, हार्दिक हा मुंबई इंडियन्स संघाचा दुसरा कर्णधार बनला आहे, ज्याने प्रथमच या फ्रँचायझीचा कर्णधार म्हणून आयपीएल हंगामातील पहिले 2 सामने गमावले आहेत. (Hardik Pandya IPL 2024)
पंड्याने पहिल्यांदा 2022 च्या हंगामात आयपीएलमध्ये कर्णधार पद भूषवले. गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करताना त्याने पहिल्याच प्रयत्नात संघाला चॅम्पियन बनवले. यानंतर, 2023 च्या मोसमातही जीटी संघाने अंतिम फेरी गाठली. यंदाच्या आयपीएल हंगामात, पंड्या त्याच्या जुन्या मुंबई इंडियन्स संघात परतला, ज्यामध्ये त्याला रोहित शर्माच्या जागी संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले. मात्र, पहिले दोन सामने पाहिले असता त्यात संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नसल्याची ओरड चाहते करत आहेत. रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवा अशी मागणीही केली जात आहे. (Hardik Pandya IPL 2024)
पंड्या बॅट आणि बॉलमध्ये फ्लॉप
आयपीएल 2024 च्या हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये हार्दिक पंड्या कर्णधारपदाच्या आघाडीवर पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये काही विशेष करू शकलेला नाही. पहिल्या सामन्यात त्याने 30 धावा खर्च केल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. तर फलंदाजीत तो केवळ 11 धावा करू शकला.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या दुस-या सामन्यत सामन्यात हार्दिकची जोरदार धुलाई झाले. त्याने 4 षटकात 46 धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याला फक्त 1 बळी मिळाला. त्यानंतर 278 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना एमआय कर्णधार 20 चेंडूत 24 धावांची संथ खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला.
Latest Marathi News पंड्याच्या नावावर लाजिरवाणा विक्रम! चाहत्यांना आठवला 2008 चा IPL सीझन Brought to You By : Bharat Live News Media.
