
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्र सरकारने एप्रिल महिन्यासाठी 25 लाख टन साखरेचा कोटा खुला केलेला आहे. मुबलक कोट्यामुळे साखर दरात क्विंटलमागे 25 ते 30 रुपयांनी घसरण होण्याचा अंदाज व्यापार्यांकडून वर्तविण्यात येत आहे. एकतर उन्हाळ्यामुळे राहणारी वाढती मागणी लक्षात घेऊन आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखर दरवाढीस आळा बसून दर स्थिरावण्यासाठी साखरेचा मुबलक कोटा जाहीर केल्याचे सांगण्यात येत आहे. मार्च महिन्यासाठी केंद्र सरकारने 23.50 लाख टन साखरेचा कोटा दिलेला होता, तर गतवर्षी मे महिन्यासाठी 23 लाख टन साखर खुली केली होती.
या काळात साखरेची निर्यातही सुरू असल्याने दर तेजीत स्थिरावल्याचे चित्र गतवर्षी दिसून आले. दरम्यान, घाऊक बाजारात एस 30 ग्रेड साखरेचा क्विंटलचा दर 3700 ते 3750 रुपयांवर स्थिर आहेत. तर, गेल्या आठवड्यात साखर निविदा क्विंटलला 3400 ते 3450 रुपयांपर्यंत जात होत्या. नव्या कोट्यातील साखर निविदा 1 एप्रिलनंतर सुरू होण्याची अपेक्षा आहे. लग्नसराई, यात्रा-जत्रा, गुढीपाडवा, श्रीरामनवमी तसेच आइस्क्रीम, थंडपेये उत्पादकांकडून साखरेला मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, मुबलक कोट्यामुळे निविदांमध्येही क्विंटलला 25 ते 30 रुपयांनी घसरण अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.
…हा तर ‘इलेक्शन कोटा’
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे रण तापू लागले आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ न होता दर स्थिरावण्यासाठी आयात-निर्यात धोरणात बदल करून ग्राहकांना आर्थिक झळ पोहोचणार नाही, यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. त्याचाच प्रत्यय मुबलक साखर कोटा जाहीर करण्यातून दिसून आला आहे. एप्रिल महिन्यातील घोषित कोट्याबाबत हा तर ‘इलेक्शन कोटा’ असल्याची चर्चा घाऊक बाजारात आहे. देशात साखरेचा मुबलक साठा आहे. त्यामुळेही साखरेचे दर आटोक्यात ठेवण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
हेही वाचा
पुण्यात दहशतखोर घटनांचा टक्का वाढला; टोळक्याकडून तिघांना मारहाण
सावध व्हा! वाहतूक नियम, सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
वर्षभरानंतर मालवाहतुकीचे उड्डाण : फेब्रुवारीत पाच मेट्रिक टन मालवाहतूक
Latest Marathi News एप्रिलसाठी साखरेचा 25 लाख टन कोटा; साखर दराबाबत ‘ही’ शक्यता Brought to You By : Bharat Live News Media.
