Loksabha election 2024 | वंचित-मराठा संघटनांमुळे चुरस..!

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडी, तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांचे उमेदवार पुणे लोकसभा मतदारसंघात उभे राहिल्यास सध्या भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात दुरंगी दिसणार्या लढतीत चुरस निर्माण होणार आहे.
भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर, काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास तीन आठवड्यानंतर प्रारंभ होणार आहे. त्यामुळे, सध्यातरी पक्षबांधणी आणि भेटीगाठी यावरच भर दिल्याचे दिसून येते. मात्र, महाविकास आघाडीसोबत निवडणुकीत आघाडी करण्याचे टाळत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विदर्भातील काही मतदारसंघात उमेदवारांची नावे घोषित केली.
त्यातच मराठा समाजाच्या संघटनांनीही काल बैठक घेतली. राज्यात त्यांचे उमेदवार ठरविण्याबाबत येत्या शनिवारी (दि. 30) बैठक होणार आहे. या दोन घडामोडींचे परिणाम राज्यातील मतदारसंघांसह पुण्यातही उमटणार आहेत. पुण्यामध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांनी 64 हजार मते मिळविली होती. पुण्यात पन्नास टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्यानंतर, झालेल्या मतदानापैकी सव्वासहा टक्के मते त्यांनी मिळविली होती. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही या आघाडीच्या मतदानाचा परिणाम शहरातील निवडणूक निकालावर झाला होता. वंचित बहुजन आघाडीचा कोण असेल आणि कोणत्या भागातील असेल, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मनोज जरांगे यांनी प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांच्या समर्थकांच्या कालच्या बैठकीत इच्छुकांचे अर्ज गोळा करण्यास सुरुवात झाली. येत्या शनिवारी सर्व अर्ज जरांगे यांच्याकडे सुपूर्त करण्यात येतील. त्यानंतर, ते एक नाव निश्चित करतील, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
उलटसुलट दावे
वंचित किंवा मराठा उमेदवारांमुळे प्रमुख उमेदवारांपैकी कोणाला फटका बसणार, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ते चित्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात स्पष्ट हाईल. दरम्यान, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते यासंदर्भात उलटसुलट दावे-प्रतिदावे करू लागले आहेत.
हेही वाचा
पुणेकरांसाठी खुशखबर ! स्वारगेटसह पाच एसटी डेपो होणार इलेक्ट्रिक
राज्यात भाजप 21 हजार नमो संवाद सभा घेणार
पेन्शनला ‘डीएसएम’चा अडथळा! डीएसएम आहे तरी काय?
Latest Marathi News Loksabha election 2024 | वंचित-मराठा संघटनांमुळे चुरस..! Brought to You By : Bharat Live News Media.
