सोलापुरातील रेशन दुकानांची तपासणी पथकामार्फत होणार झाडाझडती

सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील रेशन दुकानाबाबत शासनाकडे गंभीर तक्रारी दाखल झाल्याने प्रत्येक परिमंडलातील दहा अशा एकूण 40 रेशन दुकानांची झाडाझडती करण्यात येणार आहे. यात दोषी आढळणार्या रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे विभाग पुरवठा उपायुक्तांच्या आदेशावरून प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी रेशन दुकानांच्या तपासणीसाठी विविध चार पथके स्थापन केली असून या पथकात दोन अधिकार्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक अचानक धाडी टाकून रेशन दुकानांची तपासणी करणार आहे.
यात रेशन दुकानात आलेला एकूण माल, पॉस मशिनवर वितरित झालेला माल व दुकानात शिल्लक असलेला साठा यांचा हिशोब जुळतो का? हे तपासण्यात येणार आहे. या तपासणीत पॉस मशिनवर नोंद असलेला माल व दुकानात शिल्लक असलेला साठा यात तफावत आढळल्यास रेशन दुकानदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
परिमंडळ अ विभागातील तपासणीसाठी परिमंडळ अधिकारी एन.एस.वाघ, पुरवठा निरीक्षक एस.डी. देशमुख, परिमंडळ ब विभागातील तपासणीसाठी परिमंडळ अधिकारी आर.एस.यमपुरे, अव्वल कारकून बी.व्ही.कासे, परिमंडळ क विभागातील तपासणीसाठी परिमंडळ अधिकारी एन.एस.वाघ, पुरवठा निरीक्षक एल.बी. पवार, परिमंडळ ड विभागातील तपासणीसाठी परिमंडळ अधिकारी ए.आर. गवळी, पुरवठा निरीक्षक एस.बी.निटुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Latest Marathi News सोलापुरातील रेशन दुकानांची तपासणी पथकामार्फत होणार झाडाझडती Brought to You By : Bharat Live News Media.
