अमली पदार्थप्रकरणी विदेशी महिलेला जामीन
पणजी; Bharat Live News Media वृत्तसेवा : अटकेत असलेल्या विदेशी नागरिकांना जामीन मिळणे कठीण असते. कारण, जामीन मिळताच तो फरार होण्याची शक्यता अधिक असते. ज्याची पाळेमुळे गोव्यात नाहीत अशांना जामीन दिला जाऊ नये असा पवित्रा नेहमी न्यायालयात घेतला जातो. पण, अमली पदार्थ विरोधी न्यायालयाने सरकारी अभियोक्त्याचा हा मुद्दा फेटाळून लावून अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित विदेशी आरोपीला ५० हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला आहे.
संशयित आरोपी महिला असून, ऑगस्ट प्रिसिला असे तिचे नाव आहे. ती २६ वर्षे वयाची असून, लायबेरिया देशाची नागरिक आहे. ती विदेशी नागरिक आहे. या एकाच मुद्द्यावर जामीन फेटाळला जाऊ शकत नाही, तर न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात योग्य पुरावा आहे की नाही, आरोप उथळ आहेत, की त्या प्रकरणात संशयिताला शिक्षा होऊ शकते, याची चाचपणी करूनच जामीनअर्जावर विचार होऊ शकतो, असे मत मांडण्यात आले आहे.
तिला दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. त्यावेळी तिच्यापाशी २२० ग्रॅम गांजा सापडला होता. तिला जामीन मंजूर केला गेला असला तरी न्यायालयाने कडक अटी घातल्या असून, तिचा पासपोर्ट खरा आहे की नाही, याचा तपास करण्याचा आदेश गुन्हे अन्वेषण विभागाला देण्यात आला आहे.
तिने आपला ठावठिकाण, मोबाईल क्रमांक सादर करावा, त्यात बदल झाल्यास त्वरित न्यायालयाला कळवायला हवे, न्यायालयाच्या मान्यतेशिवाय राज्याबाहेर जाता येणार नाही, सुनावणीच्या वेळी नियमित हजर राहायला हवे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :
Goa News : गोव्यातील ‘आप’ आमदारांची होणार चौकशी ?
Goa Police: २१५ हून अधिक हिस्ट्री शीटर्सवर पोलिसांची नजर
Goa News : इंधनावरील व्हॅट वाढवल्याने विमान प्रवास महागणार
Latest Marathi News अमली पदार्थप्रकरणी विदेशी महिलेला जामीन Brought to You By : Bharat Live News Media.