नंदुरबारच्या जड वाहतुकीने घेतला आणखी एक बळी, भरधाव वाहनाखाली चिरडून तरुणाचा अंत
नंदुरबार – डंपर खाली चिरडली एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेला आठवडा उलटत नाही तोवरच आज (दि. 26)आणखी एका तरुणाचा भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाखाली चिरडला जाऊन जागेवर मृत्यू झाला. नंदुरबार शहरातून बेफाम धावणाऱ्या जड वाहनांनी एकाच आठवड्याच्या अंतराने घेतलेला हा दुसरा बळी असून याबद्दल नागरिकांमधून अत्यंत संतप्त भावना व्यक्त होताना दिसल्या.
दिनांक 17 मार्च 2024 रोजी सकाळी साडेसात वाजता सायकलवरून क्लासला जात असताना 16 वर्षीय डिंपल सतीश पाटील ही विद्यार्थिनी एका बेफाम धावणाऱ्या डंपरच्या चाकाखाली चिरडली जाऊन मरण पावल्याची दुर्घटना नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीवर घडली होती. लोकांच्या जीवावर उठलेल्या अनियंत्रित जड वाहतुकीविषयी त्यावेळी स्थानिक नागरिकांमधून अत्यंत प्रक्षोभक भावना उमटल्या होत्या. आज दि. 26 पुन्हा तशाच प्रकारे वेगाने जाणाऱ्या वाहनाने तरुणाचा बळी घेतला. याविषयी अत्यंत संतप्त भावना आहेत.
प्राप्त माहितीनुसार नंदुरबार शहरातील रहिवासी विशाल हिरामण चौधरी हा तरुण आज (दि. 26 ) दुपारी 1 वाजेच्या दरम्यान स्कुटी वरून शहादा बायपास रस्त्याने करण चौफुलीकडे जात होता. करण चौफुली जवळ असताना एका अज्ञात वाहनाखाली चिरडला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. लोकांना घटना कळायच्या आधीच अपघात घडवणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाल्यामुळे कोणत्या वाहनाने धडक दिली हे घटनास्थळी कोणालाही सांगता येत नव्हते.
एक वर्षांपूर्वीच लग्न, अशातच काळाचा घाला
घटनास्थळी चेहऱ्यासह डोक्याच्या भागाचे विखुरलेले तुकडे बघून जमलेला समुदाय प्रचंड हळहळला. पाच ते सात फुटापर्यंत तो फरपटला गेला असावा, असे दिसत होते. विशाल चौधरी याचे एक वर्षांपूर्वीच लग्न झाले असून एक उत्तम छायाचित्रकार म्हणून नुकताच नावारूपाला आला होता. अशातच काळाने त्याच्यावर घाला घातला. दरम्यान घटना कळताच पोलीस पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. कोणत्या वाहनाने धडक दिली हे सांगू शकणाऱ्या प्रत्यक्षदर्शींचा पोलीस शोध घेत आहेत. अशातच काँग्रेसचे माजी आमदार के सी पाडवी हे त्यांचे चिरंजीव तथा काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या समवेत आपल्या वाहनाने जात असताना ती दुर्घटना पाहून घटनास्थळी थांबले आणि त्यांनी शव वाहिनी येईपर्यंत थांबून परिस्थिती हाताळली.
या अपघातामुळे भरधाव वेगाने धावणाऱ्या जड वाहनांची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे. नवापूर चौफुली पासून धुळे चौफुली पर्यंत आणि धुळे चौफुली पासून करंण चौफुली पर्यंतच्या या वळण रस्त्यावर तसेच धुळे रस्त्यावर सातत्याने डंपर, कंटेनर आणि तत्सम जड वाहन सातत्याने भरधाव वेगाने धावत असतात. ही वाहतूक लोकांच्या जीवावर उठली असून तशा प्रकारच्या अनेक घटना याच्या आधीही घडून गेल्या आहेत. दिवसेंदिवस त्यात वाढ होत असल्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी यावर तातडीने उपाय करणे आता अत्यावश्यक बनले आहे.
हेही वाचा :
Nashik Fraud News : वर्षभरापूर्वी फसवणूक झालेल्या तरुणीची पुन्हा फसवणूक, यावेळी 4 लाखांचा गंडा
Tushar Kapoor : तुषार कपूर ‘डंक’ मधून करणार OTT पदार्पण , लँड माफियावर चित्रपट
Morambaa Serial : मुरांबा मालिकेत नवं वळण; आशय कुलकर्णीची धमाकेदार एन्ट्री
Latest Marathi News नंदुरबारच्या जड वाहतुकीने घेतला आणखी एक बळी, भरधाव वाहनाखाली चिरडून तरुणाचा अंत Brought to You By : Bharat Live News Media.