विद्यमान सत्ताधार्यांच्या हाती देशाचे भविष्य चिंताजनक : शाहू महाराज
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : सध्याच्या सत्ताधार्यांच्या हातात भारताचे भविष्य चिंताजनक आहे. देशाला योग्य दिशा देण्यासाठी इंडिया आघाडीला विजयी करावे, असे आवाहन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांनी केले.
जिल्ह्यातील इंडिया आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. संविधान धोक्यात आणणार्या व देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू ठेवलेल्या शक्तीविरोधात लोकशाहीची आता खरी लढाई असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. लोकशाहीच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी शाहू महाराज यांना मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धारही करण्यात आला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी, शाहू महाराज यांची उमेदवारी सर्वसामान्य जनतेच्या मनातून आलेली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी त्यांनी संसदेत जाणे महत्त्वाचे असल्याने त्यांच्या विजयासाठी आपण सर्वजण जीवाचे रान करू, असे सांगितले.
गेल्या 35 वर्षांत सामाजिक काम करताना, तसेच अडचणीत असलेल्या घटकांसाठी मदत करताना शाहू महाराज यांनी कधीही सत्तेचा विचार केला नाही. आता समाजकारणाला ताकद देण्यासाठी भीती दाखवून पक्ष फोडणार्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे आमदार पी. एन. पाटील यांनी सांगितले.
शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार अडचणीत येत असताना रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्णय शाहू महाराज यांनी घेतला आहे. या संघर्षाला ताकद देण्याची जबाबदारी आपली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जनता दलाच्या स्वाती कोरी, श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई यांचीही भाषणे झाली.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी स्वागत केले. मेळाव्यास आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगावकर, आ. जयश्री जाधव, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, संध्यादेवी कुपेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, जनता दलाचे प्रदेश पदाधिकारी प्रताप होगाडे, शिवाजीराव परुळेकर, लाल निशाण पक्षाचे अतुल दिघे, माकपचे उदय नारकर, सुभाष जाधव, भाकपचे सचिव सतीशचंद्र कांबळे, चंदगडचे गोपाळ पाटील, समाजवादी पार्टीचे रवी जाधव, शेकापचे बाबुराव कदम आदी उपस्थित होते.
Latest Marathi News विद्यमान सत्ताधार्यांच्या हाती देशाचे भविष्य चिंताजनक : शाहू महाराज Brought to You By : Bharat Live News Media.