विद्यापीठाच्या शिक्षणक्रमाची घडी बसली ! उन्हाळी सत्राची परीक्षा 10 एप्रिलपासून

विद्यापीठाच्या शिक्षणक्रमाची घडी बसली ! उन्हाळी सत्राची परीक्षा 10 एप्रिलपासून

गणेश खळदकर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे विस्कळीत झाले. त्यामुळे 2020 पासून आत्तापर्यंत परीक्षा तसेच, प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला. परंतु विद्यापीठाने आता शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार मार्च 2024 च्या उन्हाळी परीक्षा 10 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहेत. 30 जूनपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. तर जून-जुलैमध्येच नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापीठाचे शैक्षणिक गाडे रुळावर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यापीठातील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा आणि निकालावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे नियमित सुरू असलेले शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले. यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाने सुरू केला आहे. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने विविध घटकांशी चर्चा करून परीक्षा आयोजनाचा कालावधी कमी केला. त्यासाठी कोणत्याही अभ्यासक्रमाचे पेपर सुरू असताना प्रत्येक पेपरला देण्यात येत असलेली दोन दिवसांची सुटी आता बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा समकक्ष विषयानुसार आयोजित करण्यात येणार आहेत. निकाल लवकर तयार करण्यासाठी तालुकानिहाय केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प तयार करण्यात आले आहेत.
महाविद्यालयीन पातळीवर कला, वाणिज्य, विज्ञान शाखांच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावरच आयोजित करण्यात येणार आहेत. केंद्रीय मूल्यमापन प्रकल्पामध्ये मूल्यमापन झालेल्या उत्तरपत्रिकांच्या गुणनोंदणीची सुविधा संरक्षित अंतर्गत गुणदान प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष विस्कळीत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे तसेच निकाल वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत आहेत. त्याचबरोबर दोन सत्रांमध्ये योग्य कालावधी मिळत नसल्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊन विद्यार्थ्यांच्या निकालावर त्याचे थेट परिणाम होत असल्याचे दिसून आले. यंदा शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होणार असल्यामुळे नवीन प्रवेशित विद्यार्थी तसेच सध्या पुढच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार एप्रिल-मे महिन्यात परीक्षा पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच जूनमध्ये दुसरे वर्ष आणि जुलैमध्ये पहिले वर्ष सुरू करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. नवीन वर्षाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा पूर्ण करून तातडीने यंदा शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विस्कळीत झालेले शैक्षणिक वर्ष यंदा सुरळीत करण्यावर आमचा भर आहे.
– डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

हेही वाचा

पुणेकरांचा हवाई प्रवास सुसाट! दुबई, सिंगापूरचा चकरा वाढल्या..
सावधान ! आक्षेपार्ह पोस्ट पडतील महागात; प्रशासनाचा मोठा निर्णय
पैठण : आडुळ येथे समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

Latest Marathi News विद्यापीठाच्या शिक्षणक्रमाची घडी बसली ! उन्हाळी सत्राची परीक्षा 10 एप्रिलपासून Brought to You By : Bharat Live News Media.