मंत्र्याचा पीए असल्याचे सांगत दाम्पत्यास ८० लाखांचा गंडा
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा-मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत एकाने दाम्पत्यास सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून तब्बल ८० लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी गंगापूर पाेलिस ठाण्यात संशयित सुशील भालचंद्र पाटील (रा. मधुबन कॉलनी, पंचवटी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताविरोधात याआधीही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
गंगापूर पोलिसांत सुभाष चेवले (३९, रा. गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित सुशिल पाटील यास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यास बुधवारपर्यंत (दि.२७) चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. चेवले हे व्यावसायिक आहेत. पाटील याने आपण मंत्री महोदयाचा स्वीय सहायक असल्याचे सांगत दाम्पत्यांचा विश्वास संपादन केला. सन २०२१ ते १३ मे २०२३ या कालावधीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून संशयिताने चेवले यांच्याकडून ८० लाख रुपये घेतले. त्यानंतर शासकीय नोकरी मिळाल्याचे बनावट नियुक्तीपत्रही संशयिताने दिले. मात्र, काही दिवसांतच हा प्रकार उघड झाला. नियुक्तीपत्रक बनावट असल्याचे उघड होताच चेवले यांनी पैशांची मागणी केली. मात्र संशयिताने पैसे देण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
संशयित सुशील पाटील हा एका राजकीय नेत्याच्या मर्जीतील कार्यकर्ता होता. तत्कालीन गृह राज्यमंत्र्यांचा स्वीय सहायक असल्याची बतावणी करीत त्याने शासकीय नोकरी लावण्याचे आमिष अनेकांना दाखवले. दरम्यान, सन २०२३ मध्ये त्याच्याविरुद्ध नाशिकमध्ये दोन कोटी ७६ लाखांच्या अपहाराचा गुन्हा दाखल आहे. तसेच त्याने चाळीसगावात राष्ट्रीयकृत बँकेसही गंडा घातल्याचे उघड झाले. याआधी देवळाली कॅम्प परिसरातील अनिल आव्हाड यांच्यासह इतरांना संशयित सुशील याने नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक गंडा घातला आहे.
संशयिताचीही फसवणूक
संशयित सुशील याने मार्च २०२२ मध्ये गुजरात आणि राजस्थानच्या बड्या राजकीय नेत्यांसह १५ जणांविरोधात फिर्याद दिली आहे. त्यात राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मुलाचेही नाव त्याने घेतले होते. राजस्थानचे इ-टॉयलेटसह पर्यटन विभागातील जाहिरातींच्या कंत्राटातून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याची सहा कोटी ८० लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप त्याने केला होता.
हेही वाचा –
Nashik Lok Sabha 2024 : साधू, महंतांना लोकसभेचा लळा, निवडणूकीच्या रिंगणात आता नव्या महंतांची एंट्री
Moscow concert hall attack | मॉस्को कॉन्सर्ट हॉल हल्ला: ३ संशयितांनी कोर्टात गुन्हा केला कबूल
Latest Marathi News मंत्र्याचा पीए असल्याचे सांगत दाम्पत्यास ८० लाखांचा गंडा Brought to You By : Bharat Live News Media.