पुणे : रस्ते खोदाईमुळे वाहतूक कोंडीत भर : नागरिकांसह वाहनचालकांना मनस्ताप
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिकेच्या पथ विभागाकडून विविध सेवावाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदाईची परवानगी दिल्याने शहरात विविध रस्त्यांवर खोदाईची कामे सुरू झाली आहेत. खोदाईनंतर रस्ते वेळेत पूर्ववत करण्यात येत नसल्याने रेंगाळलेल्या कामांचा नागरिकांसह वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असतानाच पुणे महापालिकेच्या पथ विभागाकडून शहरात वेगवेगळ्या भागांत पूरस्थिती रोखण्यासाठी नव्याने पावसाळी वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. मध्यवर्ती भागातील पेठांच्या भागासह अनेक ठिकाणी मोठ्या आकाराच्या ड्रेनेज वाहिन्या, पावसाळी वाहिन्यांची कामे सुरू आहेत. पेठांसह मुख्य रस्त्यांवर ही खोदाई सुरू आहे. याशिवाय वेगवेगळ्या सेवा वाहिन्या टाकण्यास महापालिकेने सशुल्क परवानगी दिल्याने विविध रस्त्यांवर खोदाईची कामे सुरू आहेत.
या खोदाईमुळे शहरातील अनेक भागांत वाहतूक कोंडी होत आहे. ज्या भागात रस्तेखोदाई सुरू आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खडी, माती, धुळीचे साम्राज्य आहे. पाण्याच्या लाइनमुळे काही भागांत चिखल झाला आहे. त्यामुळे अनेकदा दुचाकी वाहने घसरून अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदाई केल्यानंतर त्वरित रस्ता दुरुस्त केला जात नाही. खोदलेला रस्ता बुजविल्यानंतर जागेवरच राडोराडा पडलेला असतो. अनेकवेळा रस्ता बुजविल्यानंतर तो भाग डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रिटीकरण लवकर केले जात नाही. त्यामुळे रेंगाळलेल्या कामाचा नागरिक आणि वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पर्यायी रस्त्यांचे फलक नाहीत
खोदाई करणारी कंपनी, ठेकेदार, जबाबदार अधिकार्यांचे नाव आणि मोबाईल क्रमांक, काम कधी सुरू केले आणि कधी संपणार, याची माहिती असलेला फलक लावणे, वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेणे, ट्रॅफिक वॉर्डन नेमणे आदी सूचना महापालिकेने दिल्या आहेत. मात्र, अशाप्रकारचे माहिती फलक कोठेही लावण्यात आलेले नाहीत. पर्यायी रस्त्याचे फलक नसल्याने ऐनवेळी माघारी फिरावे लागते.
फडके हौद परिसरात वाहतूक कोंडी
महापालिकेच्या वतीने फडके हौद ते दारूवाला पूल यादरम्यान ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. ड्रेनेजलाइन टाकून तो भाग बुजविण्यात आला आहे. मात्र, मागील अनेक दिवस त्यावर डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे चर तशीच आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही परिस्थिती गेल्या महिनाभरापासून असल्याचे परिसरातील व्यासायिकांनी सांगितले.
हेही वाचा
कोठडीत ठेवण्याची मनमानी पद्धत बंद करा; सुप्रीम कोर्टाने पोलिसांना फटकारले
Pune : कचरा टाकणार्यांचे आधी प्रबोधन नंतर कारवाई !
होलिकोत्सव 2024 : जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी
Latest Marathi News पुणे : रस्ते खोदाईमुळे वाहतूक कोंडीत भर : नागरिकांसह वाहनचालकांना मनस्ताप Brought to You By : Bharat Live News Media.