नेवासानगरीत मनोज जरांगे पाटलांचे क्रेनद्वारे पुष्पवृष्टीने जंगी स्वागत
नेवासा : पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासानगरीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या सभेला हजारोंच्या संख्येने गर्दी उसळली होती. नेवासानगरीच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवरानदीच्या पुलावर समाज बांधवांच्या वतीने क्रेनद्वारे पुष्पवृष्टीने करून जंगी स्वागत करण्यात आले. सत्तर वर्षांपूर्वीच आरक्षण असते तर मराठा समाजातील लेकरं मोठ्या हुद्द्यावर दिसले असते आता तो क्षण जवळ आला आहे त्यासाठी गाफील राहू नका असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
गुरुवारी दुपारी १२ वा.नेवासा नगरीत मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होताच तोफांची सलामी देऊन त्यांच्या क्रेनद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. नेवासा शहरातील श्रीरामपूर रोडवर असलेल्या श्री खोलेश्वर गणपती चौकात सभेच्या स्थळी आगमन होताच डॉ. सौ.मनिषा वाघ,सौ.सुशीलाताई लोखंडे,डॉ.सौ.वैशाली घुले,अँड.सोनल वाखुरे,सौ.सविता निपुंगे यांनी पंचारती ओवाळून जरांगे पाटलांचे स्वागत केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जरांगे पाटील यांनी अभिवादन केले. संत ज्ञानेश्वरांच्या पैस खांबाची मूर्ती भेट देऊन सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटलांचा गौरव करण्यात आला.
यावेळी नेवासा तालुका सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने जेष्ठ विधीतज्ञ अँड.के.एच.वाखुरे यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्याचा निषेध नोंदविणारा ठराव मांडला. सकल मराठा समाजाच्या वतीने भाऊसाहेब वाघ यांनी आलेल्या हजारो मराठा समाज बांधवांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.यावेळी सहा वर्षीय अनामिका जरे,भक्ती शिवाजी जायगुडे,संभाजीनगर येथील व्याख्याते प्रा.बनसोड,प्रदीप सोळुंके,संदीप महाराज जरे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या भावना मनोगतातून बोलताना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘आता आरक्षण प्रश्नासाठी कधी नाही असा मोठा उठाव झाला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव आता करोडोच्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे,ही एकजूट अशीच ठेवा, विजयाचा क्षण आता जवळ आलेला आहे, त्यासाठी गाफील राहू नका, आपल्या लेकरांचे स्वप्न साकार होणार आहे, मराठा आरक्षणाबरोबरच गोरगरीब मराठयांच्या पोरांना न्याय मिळण्यासाठी ही लढाई आहे.’
‘आरक्षण सारखी गोष्ट सत्तर वर्षांपूर्वीच झाली असती तर आज आमचे मराठा समाजातील लेकरं मोठ्या हुद्द्यावर काम करतांना दिसले असते’. इतरांना आरक्षण द्यायचे म्हटले की कोणी ओरडत नाही मात्र मराठयांना आरक्षण द्यायचे म्हटले की विरोध होतो या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.आरक्षण असलेले व आरक्षण नसलेले दोन्ही मराठे आता एक झाले असल्याचे सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले.
मंत्री छगन भुजबळ यांचा नामोल्लेख टाळून समाचार घेतांना व सरकारला विनंती करतांना जरांगे पाटील म्हणाले की आम्ही शांत आहे, आधी याला गप्प करा आम्हाला उचकवू नका नाहीतर जड जाईल, येवल्यात यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत बॅनर फाडले गेले व टार्गेट मराठा समाज केले असे स्पष्ट करतानाच हे ज्या पक्षात जातात तेथे ही वाट लावतो, याचे चिल्लर चाळे बंद झाले नाही तर सरकार डॅमीज होईल, आरक्षण मिळू द्या मग त्यांच्याकडे पाहू असा इशारा दिला.
मराठयांच्या लेकरांसाठी आता पर्यंत मी अपमान पचवला आहे, समाजाच्या न्याय हक्कांसाठी गद्दारी केली नाही, आता विजयाचा क्षण जवळ आलेला असतांना लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होईल ते होऊ देऊ नका,आरक्षण मिळेपर्यंत शांत रहा,जाळपोळ उग्र आंदोलन करू नका असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या सभेमुळे वातावरण भगवेमय झाले होते.”जय भवानी जय शिवाजी””छत्रपती शिवाजी महाराज की जय,”एक मराठा कोटी मराठा,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय रहाणार नाही,”जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”अशा घोषणा यावेळी उपस्थित हजारो समाज बांधवांनी दिल्या या घोषणांनी नेवासनगरी दुमदुमली होती.
मराठा लढयाला यश मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटलांनी नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात जाऊन माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या “पैस”खांबाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
The post नेवासानगरीत मनोज जरांगे पाटलांचे क्रेनद्वारे पुष्पवृष्टीने जंगी स्वागत appeared first on पुढारी.
नेवासा : पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासानगरीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या सभेला हजारोंच्या संख्येने गर्दी उसळली होती. नेवासानगरीच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवरानदीच्या पुलावर समाज बांधवांच्या वतीने क्रेनद्वारे पुष्पवृष्टीने करून जंगी स्वागत करण्यात आले. सत्तर वर्षांपूर्वीच आरक्षण असते तर मराठा समाजातील लेकरं मोठ्या हुद्द्यावर दिसले असते आता तो …
The post नेवासानगरीत मनोज जरांगे पाटलांचे क्रेनद्वारे पुष्पवृष्टीने जंगी स्वागत appeared first on पुढारी.