तडका : टँकरवाडा

तर मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे, टीटीपीपी म्हणजेच ततपप मराठी न्यूज चॅनलवर. मी हर्षदा, आज आपण मराठवाड्यातील राजकारणाचा स्पेशल रिपोर्ट पाहणार आहोत. आपल्याबरोबर जोडले जात आहेत, आमचे वार्ताहर संदेश. संदेश, तू सध्या नेमका कुठे आहेस आणि मराठवाड्यामध्ये राजकारणाची नेमकी कशी परिस्थिती आहे? हर्षदा, मी सध्या छत्रपती संभाजीनगर येथील पवनचक्की समोरून बोलत आहे. मराठवाड्यामध्ये राजकारण खूप … The post तडका : टँकरवाडा appeared first on पुढारी.

तडका : टँकरवाडा

तर मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे, टीटीपीपी म्हणजेच ततपप मराठी न्यूज चॅनलवर. मी हर्षदा, आज आपण मराठवाड्यातील राजकारणाचा स्पेशल रिपोर्ट पाहणार आहोत. आपल्याबरोबर जोडले जात आहेत, आमचे वार्ताहर संदेश. संदेश, तू सध्या नेमका कुठे आहेस आणि मराठवाड्यामध्ये राजकारणाची नेमकी कशी परिस्थिती आहे?
हर्षदा, मी सध्या छत्रपती संभाजीनगर येथील पवनचक्की समोरून बोलत आहे. मराठवाड्यामध्ये राजकारण खूप तापलेले आहे.
संदेश, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याचा थोडक्यात आढावा घेऊन माहिती देशील तर फार चांगले होईल. होय हर्षदा, जालना जिल्ह्यामध्ये रेल्वे राज्यमंत्री आणि खुसखुशीत बोलणारे एक बुद्धिमान नेते यांचे तिकीट फायनल झालेले आहे. त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. ते ग्रामीण भागामध्ये आणि सर्वत्र संवाद साधत असतात. त्यामुळे त्यांना प्रबळ असा विरोधक मिळणे अवघड होत चाललेले आहे. बाजूच्या परभणी जिल्ह्यामध्ये अद्याप तेवढी हवा गरम नाही; परंतु विद्यमान खासदार यांना त्यांच्या पक्षाने तिकीट दिले आहे; मात्र गतवेळचे धनुष्यबाण चिन्ह गमावल्यामुळे यावेळी त्यांना मशाल या चिन्हावर लढावे लागणार. मशाल कशी पेटते आणि तिचा उजेड किती दूरपर्यंत पोहोचतो, हे पाहणे आवश्यक आहे. या उमेदवाराच्या विरोधात घड्याळ किंवा कमळ यापैकी कुणी लढायचे, याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे तशा अर्थाने राजकारणाने अजून गती पकडलेली नाही.
नांदेड जिल्ह्यात एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागला असून, विद्यमान खासदार यांना तिकीट जाहीर झाले आहे. हा मोठा नेता आणि विद्यमान खासदार एकमेकांच्या विरुद्ध लढले होते. ते आता एकत्र आल्यामुळे तशी कमळ पक्षाला ही निवडणूक सोपी जाणार, असे म्हटले जात आहे.
बीड जिल्ह्यामध्ये विद्यमान खासदार बहिणीने आपल्या मोठ्या बहिणीसाठी माघार घेतली असून, मोठी बहीण राष्ट्रीय राजकारणामध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे. अत्यंत प्रभावी अशा मोठ्या बहिणीला कुणी प्रभावी विरोधक मिळेल का, याचा शोध विरोधी पक्षांकडून सुरू आहे. लातूर जिल्ह्यामध्ये खासदारकीच्या निवडणुकीमध्ये कोणालाही रस नाही; कारण सहसा बाहेरचा खासदार निवडून येतो आणि पुन्हा तो पाच वर्षे मतदारसंघाकडे फिरकतही नाही, ही परंपरा गेली कित्येक वर्षे सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये विद्यमान खासदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी अनेकांनी दंड थोपटले आहेत; परंतु अद्याप कुणाचेही तिकीट निश्चित झालेले नाही. संभाजीनगर हा अत्यंत संवेदनशील असा मतदारसंघ आहे. हर्षदा, परंतु ते टँकरचे प्रकरण मात्र मराठवाड्यात सर्वत्र सुरू झाले आहे. तीव्र पाणीटंचाईला मराठवाडा सामोरा जात आहे. सर्वत्र टँकरने पाणीपुरवठा आणि तोही मार्च महिन्यातच सुरू असल्यामुळे या प्रदेशाला भविष्यात टँकरवाडा म्हणावे लागेल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मी तुला थांबवते आहे संदेश. लोकांना पाणीटंचाईपेक्षा राजकारणाच्या बातम्यांमध्ये जास्त रस आहे. तर हा होता आमचा मराठवाडा स्पेशल रिपोर्ट. मी हर्षदा आपला निरोप घेत आहे. धन्यवाद!
Latest Marathi News तडका : टँकरवाडा Brought to You By : Bharat Live News Media.